वनराई संस्था, देसाई ब्रदर्स उभारणार ' नवचैतन्य' त स्वच्छतागृह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नवचैतन्य हायस्कूलमध्ये नुकताच मान्यवरांच्या हस्ते विविध कामांचा प्रारंभ करण्यात आला.

गोंदवले : विद्यार्थ्यांना बौद्धिक वाढीसाठी चांगल्या भौतिक सुविधा मिळाव्यात व आरोग्य टिकून राहावे, यासाठी देसाई ग्रुप व वनराई संस्थेने चालवलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथे वनराई संस्थेच्या माध्यमातून व देसाई ब्रदर्स यांच्या वतीने येथील नवचैतन्य हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज स्वच्छतागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात निंबाळकर बोलत होते. या वेळी देसाई ब्रदर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका शीतल नवानी, वनराई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धारिया, जयवंत देशमुख, नितीन दोशी, हेमंत रानडे, अरविंद निकम, आनंदराव भोसले, डॉ रज्जाक तांबोळी, सयाजीराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 
शीतल नवानी म्हणाल्या,"" विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम स्वच्छतागृहाची गरज ओळखून संस्थेच्या फंडातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. माजी विद्यार्थी देखील शाळेच्या विकासासाठी पुढे येत आहेत, हे कौतुकास्पद आहे.'' 
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते स्वच्छतागृहाच्या भूमिपूजनाबरोबरच पाण्यासाठी नव्याने घेण्यात येणाऱ्या बोअरच्या कामाची तसेच पेव्हर ब्लॉक कामाचीही सुरवात करण्यात आली. या वेळी माजी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. प्राचार्य डी. बी. कट्टे यांनी स्वागत केले. प्रतापराव पाटील यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Desai Brothers to set up a sanctuary in high school