लाखो लिटर पाणी मुरविले जमिनीत

अशोक तोरस्कर
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

घरावर पडणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन करीत दरवर्षी लाखो लिटर पाणी जमिनीत मुरवित आहे. आपण जमिनीची तहान भागविली तर ती आपली तहान भागवेल, हे साधे सूत्र त्यामागे आहे. चिमणे (ता. आजरा) येथील अशोक शिवणे या प्राथमिक शिक्षकाने राबविलेला हा उपक्रम दुष्काळाच्या सावटाखाली जगणाऱ्या सर्वांना दिशादर्शक आणि अनुकरणीय असाच आहे.

उत्तूर -  दरवर्षी पावसाचे प्रमाण घटत आहे. त्यामुळे पाणीटंचाई जाणवते. त्यावर चर्चा झडते. उपाययोजनांचे सल्ले दिले जात आहेत; पण प्रत्यक्ष कृतीचे काय? या पातळीवर मात्र दुष्काळच आहे. अशा परिस्थितीत एक शिक्षक गेल्या आठ-नऊ वर्षांपासून पाऊस गोळा करण्याचे काम करीत आहे. घरावर पडणाऱ्या पावसाचे योग्य नियोजन करीत दरवर्षी लाखो लिटर पाणी जमिनीत मुरवित आहे. आपण जमिनीची तहान भागविली तर ती आपली तहान भागवेल, हे साधे सूत्र त्यामागे आहे. चिमणे (ता. आजरा) येथील अशोक शिवणे या प्राथमिक शिक्षकाने राबविलेला हा उपक्रम दुष्काळाच्या सावटाखाली जगणाऱ्या सर्वांना दिशादर्शक आणि अनुकरणीय असाच आहे.

नोकरी. तीही सरकारी, प्राथमिक शिक्षकाची. पाच आकडी पगार. आर्थिक व कौटुंबिक पातळीवर निवांतपणा. अशा परिस्थितीत जगणे कोणालाही हेवा वाटावे असेच. पण एखादा छंद असेल तर मात्र तो तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. असेच काहीसे श्री. शिवणे यांचे झाले. त्यांना वृक्षसंवर्धनाची आवड. त्यातूनच त्यांनी नव्याने खरेदी केलेल्या शेतामध्ये झाडे लावली. ती जगवायची म्हटले तर पाण्याची नितांत गरज. यासाठी एक-दोन नव्हे तर तीन विंधन विहिरी खोदल्या. त्याला पावसाळ्यात चांगले पाणी मिळत होते. पण, उन्हाळ्यातील शेवटचे दोन महिने पाण्याचा ठणठणाटच.

गरजेतूनच नवनिर्मितीला चालना मिळते, असे म्हणतात. तेच इथेही झाले. वर्षांनुवर्षे आपली तहान भागविणाऱ्या जमिनीच्या घशालाच कोरड पडल्याचे श्री. शिवणे यांनी जाणले. घराच्या छतावरील, शेतातील वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरविण्याचा निर्णय घेतला. घराच्या पन्हाळीचे पाणी एकत्र केले. तीन हजार लिटर क्षमतेच्या टाकीमध्ये साठविले. तेथून पाईपद्वारे एका विंधन विहिरीत सोडले. घराच्या मागून येणारे पाणी चर मारून स्वत:च्या भाताच्या वाफ्यात सोडले. याच ठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या विंधन विहिरीच्या किसिंग पाईपला जमिनीपासून अर्धा फूट वर छिद्रे मारली. त्यामुळे वाफ्यातील अतिरिक्त पाण्यातून विंधन विहिरीचे पुनर्भरण होऊ लागले.

तिसऱ्या विंधन विहिरीपासून पाच फूट अंतरावर तीन मीटर बाय तीन मीटरचा खड्डा काढला. त्यामध्ये साठणारे पावसाचे पाणी मुरून विंधन विहिरीत जाऊ लागले. विंधन विहीर पुनर्भरणाचे चांगले परिणाम दिसू लागले. त्यामुळे श्री. शिवणे यांचा उत्साह वाढला. सुमारे सात लाख लिटर साठवण क्षमतेचे शेततळे काढले. घराच्या छतावरील गोळा केलेले पाणी या शेततळ्यात सोडले. पण हे शेततळे भरून वाहू लागले. त्यामुळे त्याशेजारीच दुसरे विनापॉलिथिन शेततळे काढले.

या माध्यमातून लाखो लिटर पाणी जमिनीत मुरू लागले. श्री. शिवणे यांच्या या साऱ्या कष्टाचे चीज झाले. पाणीटंचाईच्या ठिकाणी पाणीच पाणी मिळू लागले. सध्या शेततळ्यातील पाण्यावर ठिबकद्वारे अडीच एकर शेतीतून विविध पिके ते घेतात. विंधन विहिरींना पाणी वाढले आहे. पाण्याअभावी झाडे जगविण्याची मारामार असलेल्या ठिकाणीच आज विविध जातींची दोनशेहून अधिक झाडे डौलदारपणे वाढत आहेत. एका प्राथमिक शिक्षकाने गरजेतून उभारलेला पाणी गोळा करण्याचा उपक्रम आदर्शवत असाच आहे.

पाण्यासाठी तीन विंधन विहिरी मारल्या. तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च करूनही पदरात निराशाच आली होती. मात्र, पाऊस गोळा करण्यास सुरवात केली अन्‌ पाणीच पाणी उपलब्ध झाले. यासाठी अवघे ३० हजार रुपये खर्च केले. विंधन विहिरीला पाणी लागले नाही किंवा कालांतराने कमी झाले तरी निराश होऊ नये. परिसरातील पावसाच्या पाण्याने तिचे पुनर्भरण केल्यास कोरड्या विंधन विहिरीतूनही मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते.
- अशोक शिवणे, प्राथमिक शिक्षक, चिमणे, आजरा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Ashok Shivane success project special