पंक्‍चर काढण्याचे आगळे वेगळे दुकान

पंक्‍चर काढण्याचे आगळे वेगळे दुकान

कोल्हापूर - ‘हे पंक्‍चर काढायचे दुकान आहे का, खुळ्याची चावडी’, असे काही लोक मुद्दाम चेष्टेने म्हणायचे... पंक्‍चर काढणाऱ्यांच्या हालचाली चेहऱ्यावरचे भाव पाहून कुत्सितपणे हसायचे. पण हे आठ जण मात्र समोरच्याकडे लक्ष न देता, शांतपणे काम करत राहायचे. एकजण पंक्‍चर झालेले चाक काढायचा. दुसरा पंक्‍चर शोधायचा. तिसरा पंक्‍चर काढायचा. चौथा हवा भरायचा. सुरुवातीला ते थोडे गोंधळायचे. हळूहळू त्यांचा जम बसला आणि आज पंक्‍चर काढायचे हे दुकान एकदम फास्ट आहे. विशेष हे की, येथे काम करणारे हे आठही जण मतिमंद, गतिमंद, मूकबधिर आहेत. पण शहाण्या धडधाकट माणसाला लाजवतील असा त्यांचा या कामात हात बसला आहे. 

फुलेवाडी पहिल्या बसस्टॉपजवळच्या पंक्‍चर काढण्याच्या एका आगळ्या वेगळ्या दुकानाची ही कथा आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ या म्हणीप्रमाणे कामे टाळून फिरणाऱ्या तरुणांनी या दुकानातील मतिमंद मुले कशी मन लावून कामे करतात, हे पाहण्याची गरज आहे.

‘राबणाऱ्याला क्षितिज खूप मोठं’ हा संदेश
कामात रमल्याने या मुलांचे औषधही बंद झाले. सकाळी नऊला ही मुले कामाला येतात. आल्या आल्या कामाला सुरुवात करतात. दुपारी पंगत करून जेवायला बसतात. आपल्या आपल्यात हसतात, गंमत करतात. अधूनमधून खोड्या करतात. पण काम मनापासून करतात. राबणाऱ्याच्या हाताला क्षितिज खूप मोठं अतिं, हाच जणू संदेश ते आपल्या कृतीतून देतात.


श्रावण टायर अँड सर्व्हिसिंग सेंटर या दुकानाचे मालक महेश शामराव सुतार हे स्वतः एम.ए.बी.पी.एड आहेत. नोकरीच्या शोधात फिरत राहिले. पण नोकरी मिळण्यासाठी पदवीबरोबर ‘इतरही’ काही लागते हे लक्षात आल्यानंतर नोकरीचा नाद 
सोडला आणि वडिलांच्या पंक्‍चर काढण्याच्या दुकानात हवा भरण्याचे काम करू लागले. ते हळूहळू सर्व काम शिकले व त्यांनी आपल्याला नोकरी नाही मिळाली तरी इतरांना आपल्या व्यवसायात नोकरी द्यायचे व त्यासाठी त्यांनी मूकबधिर, अपंग व मतिमंदांना प्राधान्य द्यायचे ठरवले. कारण धडधाकट माणसाला कोणीही नोकरी देईल; पण अपंग, मतिमंदांना शक्‍यतो कोणी नोकरीवर ठेवत नाही. त्यांनी संभाजी रामचंद्र दिवसे, अभय गणेश केसरकर, अनिल मोहन खटावकर, अमिर गुलाब खान, संकेत सपकाळे, सुजित सुतार, किसन मुरलीधर कदम व ओंकार राजू मोरे या मतिमंद, मूकबधिर, अपंगांना कामावर घेतले.

खाणाखुणांनी गिऱ्हाईकाशी संवाद

ही मुले काम कशी करणार? त्यांना काम कसे समजणार, ते गिऱ्हाईकाशी कसा संवाद करणार हा प्रश्‍न होता. पण महेश सुतार यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी या मुलांना काम शिकवणे सुरू केले. सुरुवातीला थोडा त्रास झाला. पण त्यांनी सर्व मुलांना काम शिकवले. त्यांच्या दुकानात ही मतिमंद, मूकबधिर अपंग मुले पाहून काही लोक कुचेष्टा करायचे. हे दुकान आहे की खुळ्याची चावडी आहे असे म्हणायचे. पण हळूहळू ही मुले मनापासून काम करू लागली. अगदी हौसेने पंक्‍चर काढणे, हवा भरणे, गाडी धुणे, स्वच्छ करणे यात गुंग होऊन गेली. खाणाखुणांनी गिऱ्हाईकाशी संवाद करू लागली.

आज दुकानातली सर्व कामे ही मुले आनंदाने करतात. कधीही कामाला दांडी मारत नाहीत, कामात चूक करत नाहीत; काम करताना तोंडात तंबाखू, मावा, पानपराग असली भानगड करत नाहीत. ही मुले इतके चांगले काम करतात हे त्यांच्या घरातल्यांनाही पटत नाही. कारण काम करण्यापूर्वी ही मुले त्यांच्या घरात अधूनमधून विक्षिप्त वागून घरच्यांना त्रास देत होती. आता ही मुले कामात रमली आहेत. ही मुले घरात पगार किती आणतात यापेक्षा ही मुले कामात रमली याचे त्यांच्या घरातल्यांना खूप समाधान आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com