साठीच्या आडूरकरांनी किडनी दान करूनही केला लिंगाणा सर

सुधाकर काशीद
गुरुवार, 4 जानेवारी 2018

आजाराला घाबरून घरात कुढत बसलो तर जग खूप छोटं दिसणार आहे; पण योग्य खबरदारी घेत घराबाहेर पडलो तर जगाचं खूप मोठं क्षितिज आपल्याला खुणावणार आहे, याचा साक्षात्कार त्यांनी अनुभवला. शिवाजी आडूरकर हे त्यांचं नाव.

कोल्हापूर - ‘‘खिडकीत बसून बाहेरच्या जगाकडे पाहत बसले की, खिडकीच्या पलीकडचं जगच आपल्याला कळत नाही...’’ हे एका पुस्तकातील वाक्‍य त्यांच्या ठळक लक्षात राहिलं होतं आणि एक वेळ अशी आली की, एका किडनीवरच त्यांचं शरीर चालू होतं, अशी स्थिती झाली... 

सहा महिन्यांपूर्वी सौम्य हृदयविकाराचा झटकाही येऊन गेला. त्यांचं वय ६०. त्यामुळे आता खरोखरच खिडकीत किंवा गॅलरीत बसून आयुष्य काढण्यासारखी परिस्थिती होती. पण पुस्तकात वाचलेले वाक्‍य त्यांना बळ देत गेलं आणि या माणसाने एक किडनी नसताना, 

हृदयविकाराचा त्रास असताना केवळ जिद्दीवर रायगडाजवळचा खडतर लिंगाणा कडा सर केला. आणि आजाराला घाबरून घरात कुढत बसलो तर जग खूप छोटं दिसणार आहे; पण योग्य खबरदारी घेत घराबाहेर पडलो तर जगाचं खूप मोठं क्षितिज आपल्याला खुणावणार आहे, याचा साक्षात्कार त्यांनी अनुभवला. शिवाजी आडूरकर हे त्यांचं नाव. उत्तरेश्‍वरात जिजामाता गर्ल्स हायस्कूलजवळच्या छोट्या गल्लीत ते राहतात. त्यांच्या मित्राचे मूत्रपिंड खराब झाले, आणि त्यांनी एका क्षणात निर्णय घेऊन आपले एक किडनी मित्रासाठी दान केली. 

गोष्ट एवढ्यावरच थांबली नाही. एक मूत्रपिंड नसलेल्यांना थकवा खूप येतो, त्यांचा उत्साह मावळतो, असे अनेक जण म्हणायचे. पण, शिवाजी आडूरकर यांनी ठरवलं, की एक मूत्रपिंड दान केले तर एका मूत्रपिंडावर व्यवस्थित चालू शकते, हे जगाला दाखवून द्यायचं. आणि तसंच झालं. आडूरकर सकाळी रोज पाच किलोमीटर चालू लागले. दर रविवारी कुशिरे ते जोतिबा चालत जाऊ लागले. सहा महिन्यांपूर्वी चक्क एव्हरेस्ट बेस कॅम्प करून आले. आणि चार दिवसांपूर्वी म्हणजे ३१ डिसेंबरच्या सकाळी चक्क खडतर असा लिंगाणा कड्याचा सुळका दोरीवरून चढत पार करून गेले.

विशेष हे, की हा कडा पार करायला ते एकटे गेले नाहीत. आपल्याबरोबर कोल्हापुरातील २१ जणांना तयार केले. त्यात दोन मुलीही होत्या. सर्वांना घेऊन ते लिंगाण्याच्या पायथ्याला गेले. ‘‘आपण आपले एक मूत्रपिंड दान करूनही ठणठणीत आहे. तसेच तुम्हीही राहणार.’’ हा अवयवदानाचा संकल्प उंच अशा सुळक्‍यावर जाऊन जाहीर करण्याचे त्यांनी ठरविले. आणि एक हजार फुटाचा खडा सुळका दोराच्या आधारे चढून त्यांनी आपल्याबरोबर २१ जणांना लिंगाण्याच्या माथ्यावर गेले. सायंकाळी २०१७ चा मावळता सूर्य पाहत सर्वजण सुखरूप खाली उतरले.

कृतीतून इतरांना संदेश
लिंगाण्याचा सुळका गिर्यारोहक व गड-किल्लेप्रेमींना सतत खुणावतो. या लिंगाण्यावरून रायगड दिसतो. लिंगाणा सुळक्‍यावर काही अंतरावर गुहा व पाण्याचे टाके आहे. या गुहेत शिवकाळात खतरनाक कैदी त्याकाळी ठेवत असत, असे सांगितले जाते. पळून जायचा कोणी प्रयत्न केला तर बाजूच्या दरीतून त्याची हाडेच गोळा करायची, इतकी त्याची चढण व उतरण धोकादायक आहे. आव्हान म्हणून गिर्यारोहक लिंगाण्यावर चढाई करतात. आडूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हेच केले. त्यामुळे घराबाहेर पडा, चौकटीबाहेरचं जग जमेल तेवढं तरी पाहा, हाच संदेश ते कृतीतून देऊन गेले.

मोहिमेतील सहभागी 
शिवाजी आडूरकर, सुजय पाटील, दीपक सावेकर, कस्तुरी सावेकर, किरण गवळी, विनोद माने, अशोक करांडे, स्वरूप वाटवे, संतोष कांबळे, दिनकर कांबळे, एम. पी. शिंदे, अनिल भोसले, किशोर कारंडे, विक्रम कुलकर्णी, ओंकार गाडगीळ, धनश्री दाते, प्रशांत पाटील, मानसिंग जाधव, डॉ. रामानुजन ओडियार, गणेश बाटे, हणमंत नलवडे, जलराज जाधव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Lingana track after donation of Kidney