पंचगंगा मंडळाची भक्तिसेवेतून प्रदूषणमुक्ती...

राजेश मोरे
शनिवार, 13 जानेवारी 2018

कोल्हापूर - ‘भक्तिसेवेतून प्रदूषणमुक्ती’... हे ब्रिदवाक्‍य घेऊन पंचगंगा भक्तिसेवा मंडळ नऊ वर्षे काम करते. रोज सायंकाळी पंचगंगा नदीची आरती करून त्याद्वारे नदी प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जातो. 

कोल्हापूर - ‘भक्तिसेवेतून प्रदूषणमुक्ती’... हे ब्रिदवाक्‍य घेऊन पंचगंगा भक्तिसेवा मंडळ नऊ वर्षे काम करते. रोज सायंकाळी पंचगंगा नदीची आरती करून त्याद्वारे नदी प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जातो. 

‘दक्षिणकाशीदेशी कोल्हापूरग्राम शोभे मुक्तापूर जे विश्वेश्वरी धाम
अपारसुरवर शोभति, मुनिगण निष्काम अनंततीर्थ भोवति, श्रीपतिहृद्धाम
जयदेवी जयदेवी जय पंचगंगे तापत्रितया वारी, तवजल भवभंगे’

पंचगंगा घाटावर सूर्यास्तावेळी सायंकाळी सहाला आरतीचे हे स्वर कानी पडतात. ही आरती म्हणजे पंचगंगा नदीमातेची आरती. ही आरती करण्यामागे खूप काही दडले आहे. राजाभाऊ कुंभार व पांडुरंग गणपत चिले हे दोघे २००८ मध्ये हरिद्वारला गेले. तेथील गंगेच्या आरतीचा अनुभव घेतला. त्यात एक लाख लोक कसे सहभागी होतात, हे जवळून पाहिले. त्यानंतर त्यांच्या डोक्‍यात पंचगंगा नदीची आरती करण्याची संकल्पना आली. त्यांनी ती करवीर पीठाचे शंकरराचार्य स्वामी नृसिंहभारती महाराजांना बोलून दाखवली.

शंकराचार्य महाराजांनी ग्रंथातून पंचगंगा आरती त्यांना शोधून दिली. कुंभार, चिले यांच्या विचारांशी जोडलेले महेश कामत, स्वप्नील मुळे, विजय ससे, रमाकांत आंग्रे, सुनीलकुमार सरनाईक, बापू पाटील, सुनंदा वायचळ, आर. एन. जाधव, अरिहंत जाधव, गजानन (बापू) लिगंम, हनुमंत हिरवे ही मंडळी एकत्र आली. त्या सर्वांनी पंचगंगा नदीची रोज आरती करायची, भक्तिसेवेतून नागरिकांचे नदी प्रदूषण मुक्तीबाबत प्रबोधन करायचे असा निश्‍चय केला.

या भक्तिसेवेतून प्रदूषणमुक्तीची सुरवात १४ जानेवारी २००९ ला झाली. त्या सायंकाळी सहाला पंचगंगा नदीमातेची आरती केली. 
ज्येष्ठ, नवदांपत्यांना आरतीचा मान नदीमातेची रोज सायंकाळी आरती करण्याची परंपरा आजअखेर मंडळाने जपली. गणपती, श्रीकृष्णानंतर पंचगंगामातेची आरती होते.

उपस्थित नागरिकांना नदीचे महत्त्व, नदीचे आपल्यावर असणारे ऋण, नदीचे प्रदूषण रोखा, नदीत निर्माल्य टाकू नका, नदी स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी व्हा, असे आवाहन केले जाते. आरतीवेळी येणारे पर्यटक, ज्येष्ठ व्यक्ती, नवदांपत्य अशांना आरतीचा मान मंडळाकडून दिला जातो. नदीला पूर आला की आरती पाण्याचा काठ जिथे येतो, तेथे केली जाते. ज्यावेळी महापूर येतो, त्यावेळी ती पात्राचे पाणी जेथे असेल तेथे केली जाते.  रविवारी (ता. १४) हा उपक्रम दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. 

स्वतःचा, मुलाचा, लग्नाचा वाढदिवस अशा मंगल प्रसंगी वर्षातून एक दिवस नागरिकांनी पंचगंगा नदीमातेचे पूजन करावे. सायंकाळी सहाला नदीच्या आरतीत सहभागी होऊन नदीप्रदूषण मुक्तीच्या उपक्रमात सहभागी व्हावे. 
- राजाभाऊ कुंभार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Panchaganga Mandal work for no pollution