इस्लामपूरात मळकट, कळकट भिंती सजल्या संदेश लेखनाने

धर्मवीर पाटील
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

इस्लामपूर -  शहरातील कळकट, मळकट भिंती सजल्या आहेत. त्यांना नवा लूक मिळाला आहे. शहर सौंदर्यात भर पडते आहे. मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी ‘भिंती रंगवा, शहर सजवा’ ही अभिनव संकल्पना राबवली आहे.

इस्लामपूर -  शहरातील कळकट, मळकट भिंती सजल्या आहेत. त्यांना नवा लूक मिळाला आहे. शहर सौंदर्यात भर पडते आहे. मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी ‘भिंती रंगवा, शहर सजवा’ ही अभिनव संकल्पना राबवली आहे. रस्त्यालगतच्या भिंती ‘बोलक्‍या’, ‘रंगीबेरंगी’ झाल्या आहेत. लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत नागरिकांचे प्रबोधन करण्यात निर्जीव भिंतीही महत्त्वाची भूमिका बजावू लागल्यात. 

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्य पातळीवर क्रमांक मिळावा यासाठी प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. शहर, परिसरातील चित्रकारांना सोबत घेऊन रस्त्यालगतच्या मोठ्या भिंती रंगवल्या जात आहेत. भिंतींना केवळ रंग दिला नाही, तर सामाजिक संदेश लेखनही केले आहे. स्वच्छता, आरोग्य तसेच नागरिकांसाठी नियम पाळण्याबद्दलचे आवाहन करणारे संदेश याला प्राधान्य दिले आहे. 

सुका व ओला कचरा स्वतंत्रपणे ठेऊन योगदान देण्याचे आवाहन प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी करीत आहेत. कचरा विलगीकरणास प्रोत्साहनासाठी बकेट देण्याचे नियोजनदेखील करण्यात आले आहे. स्वतंत्र  निधी उपलब्ध होणार नसल्याने प्रायोजक शोधण्याची खटपट सुरू होती. त्यात यशही आले. 

सप्तपदी स्वच्छतेची, पाणी गरजेइतके वापरून पाण्याची बचत करणे, चला इस्लामपूर हागणदारीमुक्त करूया, स्वच्छतेला साथ-विकासाला साथ अशा संदेशांनी भिंती लक्ष वेधून घेताहेत. इस्लामपूर हायस्कूल, महात्मा फुले विद्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, आदर्श बालक मंदिर, वाळवा शिक्षण संस्था, यशवंत हायस्कूल आदींसह शहरातील अनेक भिंती रंगल्या आहेत.

शहर स्वच्छता, सौंदर्यीकरण प्रक्रियेत सर्वच नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न आहेत.
- निशिकांत पाटील-भोसले, 
नगराध्यक्ष.

भिंती रंगविल्याने शहरातील रस्त्यांना नवा लूक आला आहे. या सर्वच ठिकाणी स्वच्छता राखली जाणे अपेक्षित आहे. सर्व नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.
- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News increase in beauty of Islampur by wall painting