बहिणीला ‘किडनी’... दान नव्हे ‘ओवाळणी’

प्रताप मेटकरी
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

विटा -  वडिलाेपार्जित मालमत्तेसाठी भावा-बहिणींतील संघर्षकथा या समाजात नव्या नाहीत, त्याच वेळी बहिणीच्या राखीचं मोल आपल्या प्राणापेक्षा मोठे असल्याचे सिद्ध करणारे पाठीराखे भाऊही कमी नाहीत. अशीच एक हृदयस्पर्शी घटना वडियेरायबाग (ता. कडेगाव) येथे घडलीय.

विटा -  वडिलाेपार्जित मालमत्तेसाठी भावा-बहिणींतील संघर्षकथा या समाजात नव्या नाहीत, त्याच वेळी बहिणीच्या राखीचं मोल आपल्या प्राणापेक्षा मोठे असल्याचे सिद्ध करणारे पाठीराखे भाऊही कमी नाहीत. अशीच एक हृदयस्पर्शी घटना वडियेरायबाग (ता. कडेगाव) येथे घडलीय. दोन्ही किडन्या निकामी झालेल्या बहिणीला आपली किडनी देऊन भावाने ‘दान’ नव्हे तर ‘ओवाळणी’ दिली आहे. नात्याची वीण घट्ट करणारा हा प्रसंग शहारा आणणारा आहे.

वडियेरायबाग येथील सुरेश जगताप आणि त्यांची बहीण सुनीता सुर्वे यांच्यातील अतूट नात्याची ही कहाणी आहे. सुनीता यांचा विवाह खंबाळे भा. (ता. खानापूर) येथील गलई व्यावसायिक बजरंग सुर्वे यांच्याशी ३० वर्षांपूर्वी झाला. सुर्वे कुटुंब गलई व्यवसायासाठी कर्नाटकातील मेंगलोरला राहते. एक मुलगा, दोन मुली, पती असे चौकोनी कुटुंब असलेल्या सुनीता यांना आजाराने गाठले. दोन वर्षे उपचारानंतर किडनी निकामी झाल्याचे निदान समोर आले. सुर्वे कुटुंबावर आभाळच कोसळले. जगतापांना धक्का बसला. 

डॉक्‍टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. किडनीचा दाता कोण? सारे वैद्यकीय निकष जमले पाहिजेत, हे अधिक महत्त्वाचे. शक्‍यतो रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचीच किडनी कामी येते, असा आजवरचा अनुभव. भाऊ सुरेश पुढे आले. बहिणीच्या आयुष्यापुढे त्यांनी अन्य मोहांचा विचार केला नाही. स्वतःची एक किडनी बहिणीला देण्याचा निर्णय घेतला. पुरेशा वैद्यकीय चाचण्यांनंतर मेंगलोर येथील के. एस. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया पार पडली.

१० जानेवारीला सुनीता यांचा पुनर्जन्म झाला. आता दोघांच्याही प्रकृतीत व्यवस्थित हळूहळू सुधारणा होत आहे. कलियुगात वडिलोपार्जित संपत्तीसाठी बहीण-भावाच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र सतत दिसते. त्याला छेद देणारी आणि नात्यांची वीण घट्ट करणारी ही  सत्यकथा डोळ्यात पाणी आणणारी आहे. सुरेश जगताप यांनी तर मी किडनी दान केली नाही तर ओवाळणी  दिलीय, अशा भावनेतून हे केले. त्यांचा मोठेपणा अनेक स्त्रीला... एका आईला... पत्नीला जीवदान देणारा  ठरलाच, शिवाय नाती मजबूत असतील तर ती काळही परतावून लावू शकतात, हे सिद्ध करणारा ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Kidney Donation special story