दररोज होतेय ३ लाख लिटर पाण्याची बचत

कुंडलिक पाटील
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

कुडित्रे - पंचगंगा नदी प्रदूषणात करवीर तालुक्‍यातील ३९ गावे आघाडीवर आहेत. याउलट काही गावांत पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र असताना दररोज तीन लाख लिटर, तर चार वर्षांत १ कोटी लिटर पाण्याची बचत केली आहे. सांडपाणी व्यवस्थापन होऊन नदीचे प्रदूषणही थांबले आहे.

कुडित्रे - पंचगंगा नदी प्रदूषणात करवीर तालुक्‍यातील ३९ गावे आघाडीवर आहेत. याउलट काही गावांत पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र असताना दररोज तीन लाख लिटर, तर चार वर्षांत १ कोटी लिटर पाण्याची बचत केली आहे. सांडपाणी व्यवस्थापन होऊन नदीचे प्रदूषणही थांबले आहे. कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) ग्रामपंचायतीचे जलव्यवस्थापन जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील ग्रामपंचायतींसमोर आदर्शवत ठरले आहे. 

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर १२७५ लोकसंख्या असणारे कळंबे गाव. येथे २८८ नळ कनेक्‍शन आहेत. २०१४ ला पेयजल योजनेतून ५६ लाख खर्चातून पाणी योजना झाली. रोज ४ लाख लिटर पाणी पिण्यासाठी सोडूनही ग्रामस्थांची तहान भागत नव्हती. तंटेही वाढले होते. याचा बारकाईने अभ्यास करून ग्रामसेवक एस. एस. दिंडे यांनी पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन नळांना मीटर बसवण्याचे फायदे सांगितले. मागील पंचवार्षिक निवडणुकीतील सरपंच मधुकर गुरव, उपसरपंच कृष्णात पाटील, सदाशिव आडिसरे, आबास कांबळे, सारिका चौगुले, पोपट माने, सुनंदा कांबळे व कर्मचाऱ्यांनी ही बाब मनावर घेतली.

जिल्हा ग्रामविकास निधीतून तीन लाख ५० हजार रुपये कर्ज काढले. दीड लाख स्वनिधी उभारून नवीन मीटर बसवण्यास सुरुवात केली. नळांना मीटर बसवलीत. यापूर्वी प्रतिकुटुंब हजार-दोन हजार पाणी बिल भरावे लागत होते. मीटरने आठ पैसे दराने प्रतिलिटर आकारणी सुरुवातीला केली. कमीत कमी पाणी वापर करणाऱ्या कुटुंबाला महिन्याला २० रुपये येऊ लागले. सायफन पद्धतीने पाणी सोडलेले २४ तास केव्हाही नळाला पाणी मिळू लागले. महिलांची पाण्यासाठी वणवण थांबली.

ग्रामपंचायतीचा खर्चाचा मेळ बसत गेला. पाण्याचा दरही पुढे चार तर आता सहा पैसे प्रतिलिटर दर केला. मीटर बसविल्यानंतर उपसा पंपाचे २० हजारऐवजी केवळ चार हजार प्रतिमहिना बिल येऊ लागले. विजेच्या खर्चाची बचत झाली, वापरापुरतेच पाणी नागरिक घेऊ लागल्याने सांडपाणी शंभर टक्के बंद झाले. यामुळे नदीप्रदूषणला आळा बसला. योजनेला सरपंच धनश्री कांबळे, उपसरपंच पोपटराव देसाई, सदस्य मधुकर गुरव, रवींद्र कांबळे, शालन पाटील, सुनीता आडीसरे, छाया सुतार, बाबूराव देसाई आदी मंडळी प्रोत्साहन देत आहेत. कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी गावात फिल्टरसाठी आराखड्यात समावेश केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: successful Water management in Kale special