गेमिंगचा बादशाह

गेमिंगचा बादशाह

नोकरीच्या मागे न लागता, उद्योजकच व्हायचं, असं अगदी शालेय वयातच त्यानं ठरवलं. मुंबईतून अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना तिसऱ्या वर्षातच सहकाऱ्यांच्या मदतीनं सॉफ्टवेअर विकसित करणारी कंपनी सुरू केली. बदललेलं तंत्रज्ञान अन्‌ भविष्यातील बदलांचा अचूक वेध घेत, त्यानुसार वेळीच बदल स्वीकारत त्यानं मोबाईल ऍप विकसित करणारं "झबुझा लॅब्ज‘ हे स्टार्टअप सुरू केलं. पाच वर्षांहून कमी कालावधीत "अँग्री बर्डस्‌‘सारख्या नामांकित गेमला गुगल रॅंकिंगमध्ये मागे टाकणारा "बलून बो ऍरो‘ हा गेम विकसित केल्यानं, त्याच्या स्टार्ट अपला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या अल्पशा काळात गेमिंगच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सहभागापासून बक्षिसापर्यंत त्यानं मजल मारली. तरुणाईला मार्गदर्शक ठरणाऱ्या या यशस्वी उद्योजकाचं नाव आहे, मानस गाजरे.

मानसचा जन्म जळगावचा असला, तरी त्याचं शिक्षण मात्र नाशिकला झालं. वडील दिलीप गाजरे अभियंता असल्यानं ते नाशिकला कार्यरत होते. यादरम्यान मानसचं दहावीपर्यंतचं शिक्षण विद्या प्रबोधिनी प्रशाला इथून झालं. दहावीत 84 टक्‍के मिळविण्यानंतर त्यानं आरवायकेत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीमध्ये गणित विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवून 88 टक्‍के गुणांनी घवघवीत यश मिळवलं. अभ्यासात हुशार असलेल्या मानसनं कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच नोकरीच्या मागे न लागता, व्यवसाय, उद्योग करायचा निश्‍चय केला होता. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी 2005 मध्ये मुंबई (अंधेरी) इथल्या सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला अन्‌ 2009 मध्ये संगणक शाखेतून अभियांत्रिकी शिक्षण पूर्णदेखील केलं. मुंबईत शिक्षण घेतल्यानं या मायानगरीत अफाट जग, माणसाचे विविध पैलू अनुभवता आले. चांगली वैचारिक बैठक प्राप्त झाल्याचं मानस सांगतो.

यादरम्यात तृतीय वर्ष अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना मानसनं आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं "डेक्‍स्टर ऍडव्हायझरी‘ ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी सुरू केली. मग थोडे दिवस महाविद्यालयात शिक्षण अन्‌ थोडे दिवस कंपनीसाठी व्यवसाय करण्यास सुरवात केली. कंपनीचं दोन वर्षं कामकाज सुरळीतपणे चाललं पण सॉफ्टवेअर क्षेत्रात फारशी मजा न दिसून आल्यानं अन्‌ अपेक्षेप्रमाणं वाढ नसल्यानं कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला.

...अन्‌ "झबुझा लॅब्ज‘ला सुरवात!
कंपनी बंद केल्यानंतर मानसनं सप्टेंबर 2011 मध्ये "झबुझा लॅब्ज‘ या नावानं स्वत:च्या स्टार्ट अपला सुरवात केली. भविष्यात यशस्वी होणार की नाही, याबद्दल फार काळजी न करता आपल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास त्यानं सुरवात केली. बघता बघता त्याच्या या स्टार्ट अपनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली. एकट्या मानसपासून सुरवात झालेल्या या स्टार्ट अपमध्ये आज तब्बल सोळा अभियंते नोकरी करतायत. स्वतः सेबी क्‍युबमध्ये आंतरराष्ट्रीय रॅंकिंग मिळवल्याला मानसचा स्टाफदेखील या खेळात अत्यंत कुशल असाच आहे. काम करताना भाऊ जयेश गाजरे याच्याकडून खूप शिकायला मिळाल्याचं तो सांगतो.

शिकणं अन्‌ शिकवणं एकाच वेळी
झबुझा लॅब्जमध्ये कार्यरत असताना गणितात आवड असल्यानं या विषयात एम.एस्सी.चं शिक्षण घेण्यासाठी केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेतला. एकीकडे शिकणं सुरू असताना दुसरीकडे विद्यार्थिदशेतच एम.एस्सी. (टेक.) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं कामदेखील केलं. नंतर 2012 मध्ये एम.एस्सी. शिक्षण पूर्ण केलं. इंदिरा गांधी मुक्‍त विद्यापीठातून पॉलिटिकल सायन्स या विषयासाठी प्रवेशदेखील घेतला, परंतु कामाच्या व्यापामुळे हा शिक्षणक्रम पूर्ण करता आला नाही.

"बलून बो ऍरो‘ अन्य गेम्स
जागतिक पातळीवर ठरले अव्वल

"बलून बो ऍरो‘ या गेमने अत्यंत लोकप्रिय अशा ऍग्री बर्डस्‌ला गुगल रॅंकिंगमध्ये मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला. याशिवाय "दहीहंडी‘ हा गेम भारतात आठवा, एटीव्ही रेस, बलून स्मॅश, फ्रूट स्लॅश या खेळांनी पंधरा ते वीस देशांमध्ये अव्वल पाचशे गेमिंग ऍपमध्ये स्थान मिळविले.

मराठीच्या प्रसारासाठीही भरपूर ऍप्स
मराठी भाषेची गोडी डिजिटल व्यासपीठावर अबाधित राहावी, चिमुरड्यांना मराठी विषयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध ऍप्स विकसित करण्यात आली. यात मराठी शब्दकोडे "मराठी क्रॉसवर्ड‘ने चांगली लोकप्रियता मिळवली. मराठी शब्दकोश हे ऍपदेखील लॉन्च केलं. चिमुरड्यांसाठी मराठी "किड्‌स बालवाडी‘ या ऍपद्वारे बाराखडी अगदी सहजरीत्या समजेल, तर "लर्न मॅथ फॉर मराठी किड्‌स‘ याद्वारे गणित समजण्याची व्यवस्था केली आहे.

आंतरराष्ट्रीय परिषद, स्पर्धांमध्ये सहभाग
सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे दर वर्षी होणाऱ्या गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स (जीडीसी)मध्ये सुमारे तीस हजार तज्ज्ञ जगभरातून सहभागी होतात. अशा या "जीडीसी‘मध्ये मानसनं दोन वेळा सहभाग नोंदवलाय. फेब्रुवारी 2015 मध्ये शिष्यवृत्ती मिळवून या उपक्रमात सहभाग नोंदवल्यानंतर मार्च 2016 मध्ये याच परिषदेत मार्गदर्शक म्हणून मानसला आमंत्रित करण्यात आलं होतं. तत्पूर्वी ऑगस्ट 2015 मध्ये सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील "कॅज्युअल कनेक्‍ट‘ या उपक्रमात तीन गेम्सची निवड झाल्यानं सहकारी ललित भावसार यांच्यासोबत सहभागी होण्याची संधी मिळाली. यादरम्यानच शिष्यवृत्तीच्या सहाय्यानं जर्मनीतील "जीडीसी‘मध्ये मानसनं सहभाग नोंदवला. नोव्हेंबर 2015 मध्ये पुण्यात झालेल्या गेम्स बॉड स्पर्धेत "फिल डॉट्‌स‘ या गेमिंग ऍपनं तीन हजार डॉलरचं पारितोषिक पटकावलं.

कुठलंही क्षेत्र असो, स्वत:ला सिद्ध करा
प्रत्येक जण उद्योजकतेकडे वळेल असं नाही अन्‌ प्रत्येकाला नोकरी करणंच आवडेल, असंही सांगता येत नाही. म्हणून युवकांनी कुठल्याही क्षेत्रात काम करताना स्वत:ला सिद्ध करायला हवं. आपला स्वभाव, स्वप्न अन्‌ आवड याचा अंदाज घेऊन करिअरची दिशा निवडायला हवी. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायला हवी, असं मानस सांगतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com