नागपूरचा मिलिंद बनला संगीतकार  

केवल जीवनतारे 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

नागपूर - नागपूरच्या गल्लीबोळातून मिळेल ते काम करणारा मिलिंद आज मुंबईत संगीतातून गाजतोय. शेकडो मराठी, हिंदी, चित्रपटात ढोलक वाजवली. एवढ्यावरच न थांबता उत्तुंग ध्येयशक्तीतून, बिकट परिस्थितीच्या अग्निदिव्यातून मार्ग शोधत मिलिंदने ‘भिकारी’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले. ‘एनर्जेटिक’ संगीतकार म्हणून मिलिंदची ओळख आहे. 

नागपूर - नागपूरच्या गल्लीबोळातून मिळेल ते काम करणारा मिलिंद आज मुंबईत संगीतातून गाजतोय. शेकडो मराठी, हिंदी, चित्रपटात ढोलक वाजवली. एवढ्यावरच न थांबता उत्तुंग ध्येयशक्तीतून, बिकट परिस्थितीच्या अग्निदिव्यातून मार्ग शोधत मिलिंदने ‘भिकारी’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले. ‘एनर्जेटिक’ संगीतकार म्हणून मिलिंदची ओळख आहे. 

मिलिंद वानखेडे मूळचा नागपूरचा. वडीलही आंबेडकरी चळवळीतील महागायक नागो पाटणकर यांच्या तालमीत ढोलक  वाजवत होते. लहानपणापासून ढोलक वाजवण्यासाठी त्याचे चिमुकले हात थरथरत असत. अचानक वडिलांचे छत्र हरवले आणि नशिबी आले दुःखात भिजलेले आयुष्य. नागपूरच्या रस्त्यावर त्याने फिंगर विकले. मिलिंदच्या आवडीच्या क्षेत्रात उंच उडण्याचे बळ त्याला आईने दिले. परिस्थितीनेच जगणे-जगवणे शिकवले. वडिलांनी दिलेला ढोलक वाजवण्याचा ‘गुण’ नागपुरात डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सादर झालेल्या नाटकातून, पथनाट्यातून रंग भरत असतानाच हाताला मिळेल ते काम करत थोडेसे पैसे जमवून मिलिंद मुंबईला नशीब आजमावण्यासाठी निघून गेला. 

झोपडपट्टीत जगण्याचे अर्थशास्त्र  
मिंलिदने ‘नाथा’ नावाचा अल्बम केला असून ‘भिकारी’ चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. इंडियन आयडॉल सीझन- ६ च्या अंतिम फेरीत संगीत दिग्दर्शन केले. तसेच गोविंदाच्या एका अल्बमसाठी अरेंजर म्हणून काम केले आहे. झोपडपट्टीतूनच त्याला जगण्याचे अर्थशास्त्र सापडले. कष्टाच्या तपश्‍चर्येतूनच मिलिंद पडद्याच्या मागे संगीतकार म्हणून टिकून आहे. एका अनामिक चित्रपटाचेही संगीत तो देत असल्याची माहिती त्याने दिली.

वडापाव खाऊन काढले दिवस
फाटलेल्या लक्तरातील जिंदगीला शिवण्यासाठी सुई-दोरा घेऊन धारावीच्या झोपडपट्टीत संधीची प्रतीक्षा मिलिंद करीत होता. रात्री झोपडपट्टीतील मित्रांसमोरच ढोलकी वाजवून पोटासाठी मिळेल ते खाण्यापलीकडे काही जमत नव्हते. परंतु, जिद्द सोडली नाही. एकदा एका शोमध्ये ढोलकी वाजवण्यासाठी ४० रुपये मिळाले. ढोलकीवर थुई-थुई नाचणाऱ्या मिलिंदच्या बोटांची जादू एकाने ऐकली. हॉटेलमध्ये बॅंड वाजवणाऱ्यांमध्ये ढोलक वाजवण्याची संधी मिळाली. पुढे १९९६ याच शोमध्ये देशाबाहेर ‘शो’ करण्याची संधी मिळाली. मुंबईच्या रस्त्यावर वडापाव खाऊन ढोलकी वाजवण्याचे काम करणाऱ्या मिलिंदने मुंबईत शेकडो चित्रपटांत ढोलकी वाजवली. आता मराठी चित्रसृष्टीत तो चांगलाच स्थिरावला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milind wankhede became the musician of Nagpur