केरळमधील तरुणाच्या पुढाकारामुळे दुर्गम वाकीघोलात २२ वर्षांपूर्वीच कॉम्प्युटर

सुधाकर काशीद
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

कोल्हापुरातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कॉम्प्युटर विषय नव्हता; पण वाकीघोलातल्या धरमा, सोनबा, बबन्या, किसन्या, कौसल्या, अनूबाई, शकुंतला यांच्या तोंडात कॉम्प्युटरच्या भाषेतील शब्दांचा वापर सुरू होता. 

कोल्हापूर - साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वीचा काळ. काळम्मावाडी धरणाच्या काठाकाठाचा भाग म्हणजे वाकीघोल. घनदाट झाडी, वन्य प्राण्यांचा वावर आणि अंतरा-अंतरावर पन्नास-शंभर घरांच्या वसलेल्या छोट्या छोट्या वाड्या. दिवस मावळला, की वाकीघोलातून जायचं म्हणजे धाडसच. अशा वातावरणात या भागात विकास खूप लांब राहिलेला, पण या भागात १९९२ मध्ये डाई सबॅस्टियन हा एक तरुण आला आणि त्यावेळी खुद्द कोल्हापूर शहरातही कॉम्प्युटरचा वापर अगदी जेमतेम असताना या वाकीघोलात मात्र वाड्या-वस्तीवरील सर्व मुलांच्या हातात कॉम्प्युटरचा माउस नित्य सरावाचा झाला.

कोल्हापुरातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कॉम्प्युटर विषय नव्हता; पण वाकीघोलातल्या धरमा, सोनबा, बबन्या, किसन्या, कौसल्या, अनूबाई, शकुंतला यांच्या तोंडात कॉम्प्युटरच्या भाषेतील शब्दांचा वापर सुरू होता. 

डाई सबॅस्टियन हा केरळमधला तरुण ग्रामीण दुर्गम भागात काही तरी भरीव वेगळे काम करायच्या तयारीने १९९२ ला वाकीघोलात आला. आजचा वाकीघोल परिसर व त्यावेळचा परिसर यात खूप फरक. त्यावेळी पक्का रस्ता नव्हता.

वीज काही भागांत पोचलेली. टेलिफोन किंवा संदेश दळणवळणाचे साधन नाही. दिवसातून एसटीच्या दोन फेऱ्या व्हायच्या. त्यानंतर रात्री-अपरात्री काही घडले तर घराबाहेर पडायचीही सोय नाही, अशी जंगल शांतता. येथे डाई सबॅस्टियन आला आणि लोकांशी विकासावर बोलू लागला. सुरवातीला हा फादर आहे आणि लोकांचे धर्मांतर करायला आला आहे, अशी चर्चा सुरू झाली. लोक शंकेने बघू लागले. 

पण डाई विकासाच्या विचाराने झपाटलेला होता. रेग्युलर शालेय शिक्षण मुलांना आवश्‍यक आहेच; पण भविष्यकाळातील शिक्षणाची ओळख आताच या वाड्यावस्तीवरील मुलांना करून देण्याची गरज त्याने ओळखली. या मुलांना कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्‍यक आहे, हे वीस-बावीस वर्षांपूर्वी ठरवले. पण पहिली अडचण गावात टेलिफोन नाही. त्यामुळे आधुनिक दळणवळण यंत्रणा नाही. तो कोल्हापूरला आला. त्याने तेथील दूरसंचारचे प्रबंधक गुप्ते यांची भेट घेतली व वाकीघोलात ऑप्टिकल फायबर केबलद्वारे टेलिफोन एक्‍स्चेंजची विनंती केली.

डाई याची विनंती, त्यामागची भावना गुप्ते यांना आवडली. त्यांनी महाराष्ट्र दूरसंचारच्या वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला व कोल्हापुरात ऑप्टिकल फायबर केबलचे काम सुरू असतानाच वाकीघोलातही त्याच तंत्राचे टेलिफोन एक्‍स्चेंज सुरू झाले व कॉम्प्युटर जुळणीचे काम सोपे झाले. डाई याचा मित्र डोमेनिक डिसोझा, रिचर्ड पाईप यांनी कॉम्प्युटर सेटसाठी मदत केली. १९९८ मध्ये २० कॉम्प्युटर संच वाकीघोलात आले. कॉम्प्युटरचे ज्ञान सोडाच; पण कॉम्प्युटर हे नावही कधी कानावर न पडलेली मुले सुरवातीला लांबूनच कॉम्प्युटर पाहू लागली.

नंतर कॉम्प्युटर फक्त चालू-बंद करू लागली. हळूहळू माउस हाती घेऊ लागली. सुरवातीला कॉम्प्युटरवर चित्रे काढता येतात म्हणून खूश झाली. पहिले वर्षभर फक्त रेषांचा खेळच करीत राहिली. त्यांची शाळा सुटली, की डाईच्या दोन खोल्यांच्या घरात येऊ लागली. डाईने पहिल्यांदा मुलांना कॉम्प्युटरमध्ये रमू दिले आणि नंतर अगदी सोप्या भाषेत इतर धडे दिले. याबरोबरच या परिसरातील वाड्यावस्तीवर होणाऱ्या गणेश चतुर्थी, नवरात्र, होळी, दिवाळी, दसरा या सणांतही डाई सहभागी होत राहिला. १९९५ ला त्याच्या पुढाकाराने वाकीघोलात सार्वजनिक गणेश उत्सव सुरू झाला. 

डाई सबॅस्टियनला राधानगरी तालुक्‍यातले राजकारणी लोक, बिद्री सहकारी साखर कारखाना, त्यावेळचे आमदार, खासदार यांचे जरूर सहकार्य मिळाले. लोकांनीही त्याच्यावर विश्‍वास ठेवून पाठबळ दिले. नंदकिशोर सूर्यवंशी-पनोरीकर यांनी तर भावाप्रमाणे डाईला आसरा दिला. २००८ ला डाई सबॅस्टियनने वाकीघोल सोडले. आज तो डहाणू (पालघर)मधील वाड्यावस्तीत काम करतो आहे. पण कोल्हापुरातल्या दुर्गम भागात कॉम्प्युटरचा पहिला धडा देणारा डाई आजही सर्वांच्या स्मरणात आहे. 

मोठ्या शहरात शिक्षणाच्या सुविधा आहेत; पण दुर्गम भागातील मुला-मुलींनी काय करायचे, या विचाराने मी अस्वस्थ होतो. त्यातूनच मी वाकीघोलला आलो व काही मुलांना तरी कॉम्प्युटर शिकवू शकलो, याचे मला समाधान आहे. वाकीघोलात माझ्याकडून मुले कॉम्प्युटर शिकली; पण मी त्यांच्याकडून विश्‍वासाची ताकद व निर्व्याज प्रेम शिकलो. 
- डाई सबॅस्टियन

नोकऱ्याही मिळाल्‍या
वाकीघोलात कॉम्प्युटर शिकलेल्या मुलांना कॉम्प्युटरमधील कोणतीही पदवी मिळायची सोय नव्हती आणि तशी मिळणारही नव्हती, पण इथली मुले जेव्हा दहावी, बारावी होऊन मुंबई, पुण्याला मिळेल त्या कामावर गेली तेव्हा त्यांच्याकडे कॉम्प्युटर ज्ञान होते. या ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना कॉम्प्युटर चालवता येतो, हे पाहून झटपट नोकरीची संधी मिळत गेली. फार मोठ्या पगाराच्या नोकऱ्या या मुलांना मिळाल्या नाहीत; पण मुंबईत कोठे तरी हॉटेलात किंवा किरकोळ काम मिळू शकणाऱ्या या मुलांना कॉम्प्युटरच्या प्राथमिक ज्ञानामुळे पंधरा वर्षांपूर्वी नोकऱ्या मिळाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 years ago computer education in inapproachable Wakighol