शेतीत रमलेल्या बहिणी

- नीला शर्मा
Tuesday, 7 March 2017

जीवन उत्तम प्रकारे जगण्यासाठी त्यांना औपचारिक शिक्षण पुरेसं वाटेना. चौकटीतलं जगणं तथाकथित स्थैर्य, सुरक्षितता मिळवून देण्यासाठी काहीसं सोईस्कर वाटलं तरी ते आत्मविकासासाठी तोकडं वाटू लागलं. म्हणून आदिती व अपूर्वा संचेती या दोघी बहिणी शेती करू लागल्या. सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्यापासून सुमारे पाच किलोमीटर आत गेल्यावर सणसवाडी हे गाव लागतं. तिथून अर्धा किमी अंतरावर या बहिणींचं शेत आहे. अडीच एकर जागेतल्या या त्यांच्या जीवनानुभव कार्यशाळेत त्या रात्रंदिवस राबत असतात. तिथं राहण्यासाठी त्यांनी स्वत: राबून दगडमातीचं घर उभारलं.

ही जमीन आठ वर्षांपूर्वी घेतली तेव्हा नुसतीच पडीक आणि निकृष्टच नव्हे तर कुठं खड्डे, कुठं उंचवटे अशीही होती. ती शेतीसाठी तयार करण्यात पहिली चार वर्षं खर्ची पडली. पुण्यात बाजीराव रस्त्यावरील घराजवळच्या भाजीविक्रेत्यांकडचा ओला कचरा सातत्यानं तिथं नेऊन टाकला. भाजीपाला लावण्यापासून सुरवात करून हळूहळू इतर पिकंही घेऊ लागल्या. आता त्या तांदूळ, नाचणी, हरभरा, मूग, भुईमूग, तूर, जवस, हुलगा, मोहरी, तीळ वगैरे घेतात. त्यातलं स्वत:ला पुरेल एवढं ठेवून बाकी धान्य, भाज्या व प्रक्रिया केलेले पदार्थ विकतात.

आदिती सांगते, ‘‘मी बी.एस्सी. करून वर्षभर गॅप घेतली. काही सामाजिक संस्थांची कामं पाहिली. नंतर बाहेरून एम.एस्सी. करताकरता शेतीचा प्रयोग सुरू केला. अपूर्वा बारावीनंतर वर्षभर काही संस्थांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेऊन आलेली होतीच. मी शिकत असताना अन्नमलाईच्या जंगलात एका प्रकल्पात सहभागी असताना माझ्या मनात काही तरी अर्थपूर्ण करीत जीवन जगण्याच्या विचारानं उचल घेतली. शिक्षण व सामाजिक कार्यासोबतच प्रयोगशील जगत असलेली आमची आई कल्पना पाठीशी उभी राहिली. वडील सुरेशही हरकत न घेता उलट आर्थिक बळ पुरवू लागले.’’

अपूर्वा म्हणते, ‘‘शेती ही जीवनशैली निसर्ग व माणसाला जोडणारी आहे. प्रत्यक्ष शेती करण्यातून आपल्याला मिळणारं शिक्षण अधिक समृद्ध करणारं आहे. हे सोपं नाहीच, पण ‘विकत घ्या, वापरा, फेका’ या विचारहीन वागण्याऐवजी बरंच काही शिकवणारं आहे. अधिक जबाबदार करणारं आहे. मी बारावीनंतर बाहेरून तत्त्वज्ञान विषयात पदवी घेतली, मात्र मला शेतीच्या प्रयोगात तत्त्वज्ञानाचं अंतरंग अधिक चांगलं गवसतं.’’

आता या बहिणींनी पत्र्याची एक शेड अवजारं ठेवण्यासाठी तयार केली आहे. सिमेंट वापरून एक मजबूत घरही  कारागिरांच्या मदतीनं उभारलं आहे. इथं कार्यशाळा घेण्याची सोय झाली आहे. काम बघायला येणारे, शिकू पाहणारे तिथं राहू शकतात. त्यांचं शिकणं-शिकवणं सुरू आहे. शेतकरी आत्महत्या का करतात, याची कारणं त्यांच्या थोडीफार लक्षात येत आहेत. तरीही या जीवनशैलीचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे. नियोजनपूर्वक सेंद्रिय शेतीचं यशस्वी मॉडेल निर्माण करण्यात त्यांना यश मिळू शकेल, असं त्यांची जिद्द पाहून नक्की वाटतं.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aditi & apurva sancheti