दहा महिन्यांनंतर तिची वडिलांशी भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

माळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून पुन्हा वडलांची छत्रछाया मिळाली. या घटनेतील मुलीचे नाव आहे अलिशा अमिदअली खातून (वय २३, रा. गोहालीभंगा, आसाम).

माळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून पुन्हा वडलांची छत्रछाया मिळाली. या घटनेतील मुलीचे नाव आहे अलिशा अमिदअली खातून (वय २३, रा. गोहालीभंगा, आसाम).

अलिशा ही युवती अशिक्षित असून, ती १० महिन्यांपूर्वी आसाम राज्यातील गोहालीभंगा येथून हरविली होती. बस, रेल्वेच्या माध्यमातून ती सुरवातीला कर्नाटक राज्यात भरकटली. त्यानंतर ती महाराष्ट्रात आली. पूर्णतः पत्ता व्यवस्थित सांगता येत नसल्याने अलिशा बसद्वारे प्रवास करीत ती बारामतीमध्ये पोचली. सुरवातीला औद्योगिक वसाहतीमध्ये तिचे वास्तव्य झाले, नंतर ती शहरालगत वंजारवाडी भागात बेवारसरीत्या फिरत असल्याची माहिती येथील निर्भया पथकाला मिळाली. बारामतीचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या पोलिस नाईक अमृता भोईटे, महिला पोलिस अर्चना बनसोडे यांनी सदर युवतीला बारामतीच्या शासकीय प्रेरणा महिला वसतिगृहात दाखल केले. त्यानंतरच्या कालावधीत या निर्भया पथकाने वसतिगृहातील प्रशासनाच्या मदतीने तिच्या पालकांशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला नुकतेच यश आले आणि अलिशा यांचे वडील नबीबुल्ला शेख ऊर्फ अमिदअली खातून यांच्याशी संपर्क झाला. साहजिकच पोलिस यंत्रणेबरोबर अलिशाचाही आनंद द्विगुणित झाला. तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अलिशाचे वडील अमिदअली खातून हे बारामतीत आले आणि पोलिस ठाण्यातच दोघांची गळाभेट झाली. हा आनंददायी क्षण उपस्थितांनी टाळ्या वाजवून द्विगुणित केला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After ten months meet her father