आडगावच्या अमोलची अनमोल शिक्षण भरारी

व्यंकटेश कल्याणकर
बुधवार, 15 मार्च 2017

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मी माझे शिक्षण पूर्ण केले. शिष्यवृत्तींमुळे मला आर्थिक ताण जाणवला नाही. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सहकार्य, मित्रांच्या शुभेच्छा आणि शिकण्याची जिद्द यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. भविष्यात मला कृषी क्षेत्रात संशोधन करण्याची इच्छा आहे. मात्र, सध्या तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला नोकरी करणे अनिवार्य आहे. 

- अमोल शिंदे

खाणीत काम करणारे माय-बाप... घरात शिक्षणाची पार्श्‍वभूमी नाही... दोन वेळच्या जेवणाची भ्रांत... अशा परिस्थितीत अमोल विलासराव शिंदे या विद्यार्थ्याने कृषी विषयात उत्तर प्रदेशमधील फैजाबाद येथील कृषी महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी (M.Sc.) परीक्षेत सुवर्णपदक मिळवून प्रतिकुलतेवर मात करण्याचा संदेश समस्त तरुणाईला दिला आहे. 

अमोल (वय 27) बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्‍यातील खरात आडगावचा. तीन बहिणी, आई, वडील असे कुटुंब. ऊन, पावसापासून रक्षण करणारे वडिलोपार्जित घर सोडले तर स्वत:चे असे काही नाही. घरात कोणाचेही शिक्षण नाही. वडिलांच्या अंगावर चार अपत्यांची जबाबदारी. घरात दोन वेळच्या उदरनिर्वाहाची भ्रांत. खाणीत जाऊन काम करणे आणि मिळेल तेवढ्या पैशातून उदरनिर्वाह करणे हा कुटुंबाचा पारंपारिक व्यवसाय. काही वर्षांपूवी खाण बंद पडली. त्यामुळे दोघे पती-पत्नी दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करू लागले. त्यातून मिळणाऱ्या पैशातून घराचा गाडा ओढायचे. 

अशातच दोन मुलींचे लग्न लावून दिले. या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अमोलने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. घरातूनही त्याला शिकण्यासाठी पुरेसे बळ मिळाले. परिस्थितीत नसतानाही वडिलांनी नातेवाईकांच्या सहकार्याने शक्‍य तेवढी आर्थिक मदत केली. बारावीनंतर त्याने शिष्यवृत्तीसह वडिलांच्या मदतीने बारामती येथे 73 टक्‍क्‍यांसह त्याने कृषी विषयात पदवी घेतली. दरम्यानच्या काळात त्याला विद्यापीठ स्तरावरील संशोधनपर स्पर्धांमध्ये बक्षिसेही मिळाली. त्यानंतरही त्याने शिक्षणाची जिद्द सोडली नाही. 

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संशोधन शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेच्या (ICAR-JRF) गुणवत्ता यादीत अमोल चमकला. त्याने उत्तर प्रदेशमधील फैजाबाद येथील कृषी महाविद्यालयात कृषी क्षेत्रातील सूत्रकृमी शाखेत पदव्युत्तर पदवी (M.Sc.) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला. यावर्षी त्याने या अभ्यासक्रमात सुवर्णपदक पटकावले असून उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

हलाखीच्या परिस्थिीतीमुळे पोटच्या पोराचा हा सन्मान सोहळा पाहण्यासाठी त्याच्या आई-वडिलांना उपस्थित राहता आले नाही. अमोलला नुकतीच एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली आहे. कृषी क्षेत्रात संशोधन करण्याची त्याची तीव्र इच्छा आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी सध्यातरी नोकरी पत्करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. 

"प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मी माझे शिक्षण पूर्ण केले. शिष्यवृत्तींमुळे मला आर्थिक ताण जाणवला नाही. आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सहकार्य, मित्रांच्या शुभेच्छा आणि शिकण्याची जिद्द यामुळे मी इथपर्यंत पोचलो. भविष्यात मला कृषी क्षेत्रात संशोधन करण्याची इच्छा आहे. मात्र, सध्या तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मला नोकरी करणे अनिवार्य आहे."

- अमोल शिंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agriculture education success of Amol Shinde by Vyankatesh Kalyankar