काडीकचरा कुजवून उत्पन्नात दीडपट वाढ

परळी वैजनाथ - शेतातील काडीकचरा शेतातच कुजवून सुपीकता वाढल्याने देशमुख टाकळी येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख यांनी या जमिनीत घेतलेले गव्हाचे पीक.
परळी वैजनाथ - शेतातील काडीकचरा शेतातच कुजवून सुपीकता वाढल्याने देशमुख टाकळी येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख यांनी या जमिनीत घेतलेले गव्हाचे पीक.

परळी वैजनाथ - शेतातला काडीकचरा शेतातच कुजवून रासायनिक खताची मात्रा केवळ वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांवर आणत शेतीचा पोत सुधारला आणि शेतीच्या उत्पन्नात दीडपट वाढ केली. हा अभिनव प्रयोग परळी तालुक्‍यातील देशमुख टाकळी येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख यांनी शेतात राबवून एक आदर्श निर्माण केला आहे.

पंचवीस ते तीस वर्षांपासून श्री. देशमुख शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात. झेंडू, शेवग्याची शेती करून त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलेले आहे. केशर आंबा व इतर फळपिकेही आधुनिक पद्धतीने घेऊन विक्रमी उत्पादन मिळविले आहे. यापूर्वी तुरीचे एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पादन घेऊन त्यांनी विक्रम नोंदविलेला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांत त्यांच्या शेतातातील उत्पादित फुले, फळे विक्रीसाठी गेली आहेत. आज अधिकाधिक रासायनिक खते, औषधांचा मारा शेती, पिकांवर करून अधिक उत्पादन काढण्यावर अनेक शेतकरी भर देत असताना पंचवीस वर्षांपूर्वी शिवाजीराव देशमुख सेंद्रिय शेतीकडे वळले. शेतात तयार होणारे उसाचे पाचट, कापसाची पऱ्हाटी, तुरीची तुऱ्हाटी, गव्हाचे काड, ज्वारी, हायब्रिड पिकांची धसकटे, विविध वेलवर्गीय भाजीपाला, इतर भाजीपाल्याची टाकाऊ पाने, फुले, शेंगांची टरकले, पालापाचोळा, गाजरगवत व इतर तण असा काडीकचरा जाळून किंवा फेकून न देता तो ट्रॅक्‍टरच्या मदतीने रोटव्हेटरद्वारे मशागत करून शेतात कुजवायला सुरवात केली. परिणामी शेतीचा पोत वाढला. जमीन भुसभुशीत झाली. 

जमिनीत सेंद्रिय कर्ब तसेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली. पेरल्या जाणाऱ्या, लागवड होणाऱ्या पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ झाली. या प्रयोगामुळे रासायनिक खताची मात्रा वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांवरच आली. सोयाबीन, मूग, हरभरा व इतर काही पिकांना तर रासायनिक खताची गरजही भासत नाही. 

शेतातील एक काडीही ते बाहेर फेकत किंवा जाळत नाहीत. जनावरांचे शेण, उकिरड्यावरचा कचरा ते शेतात टाकतात. या प्रयोगामुळे रासायनिक खते, औषधांचा खर्च वाचला आणि शेतीच्या उत्पन्नात दीडपट वाढ झाली.

शेती विषमुक्त करण्याचा विडा 
सेंद्रिय पद्धतीचा वापर करून शेती विषमुक्त करण्याचा विडा शिवाजीराव देशमुख यांनी उचलला आहे. रासायनिक खताच्या वापरामुळे गुरे, वनस्पती, जमीन व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे सर्व शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com