देशाला देव मानून उभारले भारतमातेचे मंदिर

उदयकुमार जोशी 
रविवार, 28 जानेवारी 2018

सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी एकत्रित यावे. आपसांतील गैरसमज व मतभेद दूर व्हावे, याच हेतूने भारत मातेच्या मंदिराची उभारणी केली आहे. यापुढे या ठिकाणी स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनी मोठा कार्यक्रम घेण्याचा मानस आहे.
- ॲड. सुनील केंद्रे, हिंगणगाव

अहमदपूर - सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी देश हाच देव मानून हिंगणगाव (ता. अहमदपूर) येथे ॲड. सुनील केंद्रे या ध्येयवेड्या वकिलाने स्वतःच्या जागेत भारत मातेच्या मंदिराची उभारणी केली आहे.

प्रजासत्ताकदिनी शुक्रवारी (ता.२६) या मंदिरात भारत मातेच्या मूर्तीचे मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले. 

शहरापासून १९ किलोमीटर अंतरावर ॲड. केंद्रे यांचे हिंगणगाव आहे. साडेतीनशे घरांच्या या गावाची लोकसंख्या एक हजार एवढी आहे. अहमदपूर येथील न्यायालयात श्री. केंद्रे वकिली करतात. दरम्यान, समाजातील मतभेद विसरून लोक एकत्र यावे, सर्व जाती-धर्मामध्ये सलोखा वाढावा या उद्देशाने त्यांनी भारत मातेचे मंदिर उभारण्याचा निश्‍चय केला. दहा वर्षांपूर्वीच ॲड. केंद्रे यांनी हिंगणगावमध्ये जागा विकत घेतली होती. या ठिकाणी त्यांनी भारत मातेचे मंदिर उभारण्याचा निश्‍चय केला. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी स्वखर्चाने मंदिराचे काम सुरू केले. नुकतेच हे काम पूर्ण झाले असून धर्मापुरी (ता. अंबाजोगाई) येथे सहशिक्षिका असणाऱ्या त्यांची पत्नी पद्मजा मुंडे-केंद्रे यांनीही या कामात त्यांना मोलाची साथ दिली. ही कल्पना पटल्याने ग्रामस्थ श्रीहरी घुले यांनीही भारत मातेच्या मंदिरालगतची स्वतःची एक गुंठा जागा मंदिरासाठी दान दिली. प्रजासत्ताकदिनी भारत मातेच्या प्रतिमेचे येथे थाटात पूजनही झाले. भारतमाता मंदिरात झालेल्या कार्यक्रमाला दीलदार शेख, सरपंच सूर्यकांत फड, ॲड. डी. एम. कांबळे, अरिफ देशमुख, डॉ. कैलास देशमुख, सुलोचना दराडे, नंदा दराडे, सोमाबाई दराडे, यमुना घुले, धनराज गिरी, मन्मथ स्वामी, अफजल मोमीन, तुकाराम घुले, श्रीरंग पत्की, नाथराव घुले यांच्यासह अनेकांच्या हस्ते पूजन करण्यात आले. ‘वंदे मातरम, भारत माता की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ahmadpue news bharatmata temple in hingangav