धुऱ्यावरील अंबाडीला मिळवून दिली प्रतिष्ठा

प्रशांत रॉय
रविवार, 6 मे 2018

नागपूर - आहारातील वेगळेपण टिकविण्यासाठी कधी भाजी तर कधी तोंडी लावायला चटणी एवढ्यापर्यंतच सीमित असलेले ग्रामीण भागातील दुर्लक्षित पीक म्हणजे अंबाडी. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात, एवढाच काय तो उपयोग सर्वसाधारणपणे लोकांना माहीत आहे. परंतु अंबाडीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, उपपदार्थ तयार करणे शक्‍य आहे. तसेच मानवी आरोग्याला पोषक अशी घटकही अंबाडीतून मिळतात हे लक्षात आल्याने प्रगतिशिल शेतकरी अनंत भोयर (मु. पो. कचारी सावंगा, ता. काटोल) अनेक वर्षांपासून आपल्या शेतीमध्ये अंबाडीची लागवड करीत आहेत.

नागपूर - आहारातील वेगळेपण टिकविण्यासाठी कधी भाजी तर कधी तोंडी लावायला चटणी एवढ्यापर्यंतच सीमित असलेले ग्रामीण भागातील दुर्लक्षित पीक म्हणजे अंबाडी. अंबाडीचे खोड मुळाशी धरून झोडपतात आणि वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात, एवढाच काय तो उपयोग सर्वसाधारणपणे लोकांना माहीत आहे. परंतु अंबाडीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ, उपपदार्थ तयार करणे शक्‍य आहे. तसेच मानवी आरोग्याला पोषक अशी घटकही अंबाडीतून मिळतात हे लक्षात आल्याने प्रगतिशिल शेतकरी अनंत भोयर (मु. पो. कचारी सावंगा, ता. काटोल) अनेक वर्षांपासून आपल्या शेतीमध्ये अंबाडीची लागवड करीत आहेत. धुऱ्यावर क्वचितपणे दिसणाऱ्या या अंबाडीच्या लागवडीस प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भोयर यांनी महत्वपूर्ण वाटा उचलला आहे.

भोयर म्हणाले, की अंबाडी ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. तसेच अंबाडीच्या इतर भागांपासूनही विविध पदार्थांची निर्मिती शक्‍य आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही  हवामानात येणारे हे पीक मोनोकल्चर आणि नगदी पिकांच्या ओझ्याखाली दुर्लक्षिले गेले आहे. याचा औषधी उपयोग मला लक्षात आल्याने गेली अनेक वर्ष मुख्य पिकामध्ये आंतरपीक म्हणून अंबाडीची लागवड  करीत आहे.

पावसाळ्यातली आर्द्रता अंबाडीच्या वाढीसाठी पोषक असते. अंबाडीच्या पानांची भाजी, बिया आणि फुलांपासून विविध प्रक्रीया केलेली उत्पादने यापासून शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ शक्‍य आहे. माझ्या शेतातील अंबाडी आणि त्यापासून तयार केलेले पदार्थांना पाहण्यास, विकत घेण्यास अनेक शेतकरी तसेच नागरिकही स्वतः उत्सुक आहेत. सुजाण आणि आरोग्याप्रती जागरूक असलेली मंडळी राज्यभरातून याबाबत मला विचारणा करतात. अनेक पदार्थांची मागणीही नोंदवितात. 

थोडेसे अंबाडीबद्दल
अंबाडीचे सर्वांत जास्त उत्पादन चीनमध्ये होते. ही सुमारे १.५ ते २ मीटर उंच वाढणारी वनस्पती आहे. हे झाड सरळ वाढते. याची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असताना याच्या पाल्याची भाजी करतात. याच्या बियांपासून तेल काढतात. त्यास ‘हॅश ऑइल’ असे म्हणतात. यात टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल (टीएचसी) या रसायनाचे प्रमाण जास्त असते. त्यात मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.

आयुर्वेदानुसार उपयोग
पित्त, जळवात, अजीर्ण इत्यादी रोगांवर लाभदायक आहे.
अंबाडीच्या फुलांमधले जैविक गुण हायपर टेन्शन, कोलेस्टेरॉल, मधुमेह, मूत्रविकारावरही गुणकारी. 
अंबाडीत व्हिटॅमिन सी आणि आयर्नची मुबलक मात्रा असते.

अंबाडी आहे कल्पवृक्षाप्रमाणेच उपयोगी
कोवळ्या पानांची होते भाजी
फुलांपासून चटणी, जॅम, जेली, सरबत पावडर आदी पदार्थ
काडी वा दांडीपासून शो पिसेस तयार होतात
बियांपासून लाडू बनविले जातात
अवर्षणाला तोंड देण्यास समर्थ
दोऱ्या, सतरंज्या, कागद करण्यास उपयुक्त
घरगुती सोलर ड्रायर पध्दतीने वाळवून ठेवल्यास वर्षभर वापरता येते

एकल पीक पध्दती आणि हरितक्रांतीच्या प्रभावामुळे पारंपरिक औषधीयुक्त पिके मागे पडली आहेत. बाजारकेंद्रित व्यवस्थेमुळे बाजारात जे विकता येईल अशी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा भर आहे. अशावेळी मी विचार केला की अंबाडीसारख्या कमी खर्चाच्या आणि चांगले उत्पादन, उत्पन्न देणाऱ्या पिकाच्या लागवडीवर भर दिला पाहिजे. कालौघात जे विकल्या जाते ते पेरावे असा समज दृढ झाला आणि शेतकरी डाळीपासून भाजीपाल्यापर्यंत सर्वच बाबतीत परावलंबी होऊ लागला आहे.
- अनंत भोयर, शेतकरी, कचारी सावंगा, जि. नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambadi plantation agriculture success