esakal | Video : सकारात्मक कवितांचा आनंद घेण्याचा छंद 
sakal

बोलून बातमी शोधा

amruta-kolatkar

अमृता कोलटकरसारखी संवेदनशील गायिका - अभिनेत्री जर सादर करत असेल तर माहौल क्षणात बदलून जातो. अमृताने सकारात्मक कवितांमधील आनंद घेण्याचा छंद जोपासला आहे. 

Video : सकारात्मक कवितांचा आनंद घेण्याचा छंद 

sakal_logo
By
नीला शर्मा

सकारात्मक कविता मनाला उभारी देतात. त्यातून प्रसन्नतेचे बहर फुलवणाऱ्या, कवी बा. भ. बोरकर यांच्या कविता असतील तर त्या वाचणारा, ऐकणारा तल्लीन होऊन जातो. या कविता अमृता कोलटकरसारखी संवेदनशील गायिका - अभिनेत्री जर सादर करत असेल तर माहौल क्षणात बदलून जातो. अमृताने सकारात्मक कवितांमधील आनंद घेण्याचा छंद जोपासला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमृता कोलटकर ही तरुणी जेव्हा मधुर स्वरांत कविता गाऊ लागते, तेव्हा विश्‍वास बसत नाही की, गणितासारख्या तर्कशुद्ध विषयात रमणारी हीच का? स्वप्नमय विश्‍व जिच्या सुरेल स्वरलहरींमधून प्रकटतं आहे, तीच ही अमृता अर्थशास्त्र व व्यवस्थापनशास्त्रातील पदवी मिळवून अर्थशास्त्रविषयक एका नामांकित संस्थेत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून वावरली, हे पचवणं जरा कठीण जातं. 

अमृता म्हणाली, ""आधी मुंबई आणि नंतर दिल्लीत कामगिरी पार पाडत असताना माझं गाणं मागं पडलं होतं. शास्त्रीय गाण्याची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. दोन मुलांच्या जन्मानंतर नोकरी सोडली. पुण्यात स्थिरावून मुलांना वाढवताना गाणंही जोपासता आलं. कवी अरुण कोलटकर हे माझे काका. अनेक कवींच्या वेगवेगळ्या भावछटा मांडणाऱ्या कविता वाचणं, गुणगुणणं हे खूप आवडू लागलं. मग मी रंगमंचीय कार्यक्रमांमधून काही कवितांचं वाचन तर काहींचं गायन सादर करू लागले. माझा हा छंद श्रोत्यांनाही आनंदित करतो आहे, हे लक्षात आल्यावर मी याबाबत जास्तीत जास्त सजग होत गेले.'' 

चोवीस वर्षांपासून अमृता काव्यगायनात रमते आहे. तिच्या काकांच्या वास्तववादी कवितांचं मंचावर वाचन करताना तिला ऐकणं ही पर्वणी असते. कित्येक कवींच्या छंदबद्ध कवितांचं गायन ती तन्मयतेने करते. इतर गायकांनी गाऊन आधीच लोकप्रिय केलेलं भावगीत अथवा नाट्यगीत या प्रकारांतील काव्य अमृता त्यातील मूळ गाभा तसाच ठेवून, मात्र जमेल तेथे स्वतःचा स्पर्श दर्शवत सादर करते. काही भावकविता खास तिच्या आवाजात ध्वनिमुद्रित आहेत तर काही कवितांना खुद्द तिनं चाल लावून कित्येक कार्यक्रमांतून सादर करून दाद मिळवली आहे. मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, ग्रेस, इंदिरा संत, शांता शेळके, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, बहिणाबाई चौधरी आदींच्या रचनांसह संत ज्ञानेश्‍वर व संत कबीर यांचं काव्यही अमृता सुरेल स्वरांत सादर करत असते. 

अमृताने सांगितलं की, शास्त्रीय गाण्याचे माझ्यावरील संस्कार मला सुगम व नाट्यगीत गाताना उपयुक्त ठरतात.