esakal | ...अन् तो बनला निराधार आजोबांसाठी देवदूत
sakal

बोलून बातमी शोधा

सुतारदरा - दोन बहिणी आणि पुतण्या शंकर तोंडे यांच्या समवेत  किसन तोंडे.

मनोरुग्णांना वेडे समजून कुटुंबापासून दूर ठेवण्याने त्यांचा मानसिक आजार वाढतो. मानसोपचार केले, आपुलकी कायम ठेवली तर मनोरुग्ण सुध्दा सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगतात. त्यांना माणुसकीच्या ओलाव्याने जपले तर आनंद वाढतो.
- लक्ष्मण चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता

...अन् तो बनला निराधार आजोबांसाठी देवदूत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोथरुड - बिघडलेले मानसिक संतुलन… हलाखीची परिस्थिती आणि पोटच्या गोळ्याने सांभाळायला नकार दिल्याने हतबल झालेल्या आजोबांनी थेट रस्ताच गाठला. भीक मागून त्यांचा उदरनिर्वाह चालू होता. अशातच सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण चव्हाण हा देवदूत म्हणून त्यांच्या आयुष्यात आला आणि त्याने सोशल मीडियाच्या सहाय्याने त्यांच्या कुटुंबाचा शोध लावून त्यांच्याकडे सुपूर्त केले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही कहानी आहे किसन तोंडे (वय ६०, रा. सुतारदरा) यांची. घरगुती विसंवादामधून त्यांनी गेले दहा महिन्यांपूर्वी राहते घर सोडले आणि कोथरूड बस डेपोच्या थांब्याला त्यांनी आपला निवारा केला. ते मूळचे वांद्रे पिंपरी (ता. मुळशी) येथील आहेत. वेदभवन येथील सोसायटीत ते सुरक्षारक्षक म्हणून काम करत. चांदणी चौक उड्डाण पुलाच्या कामासाठी सोसायटी पाडली. त्यांचे कामही बंद झाले. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे. ते मनोरुग्ण असल्याने मुलानेही त्यांना सांभाळण्यास नकार दिला. 

भुसारी कॉलनीत राहणारे चव्हाण हे लॉकडाउनमुळे चाळीस गरजूंना दररोज अन्नदान करतात. त्यांना तोंडे नेहमी कोथरूड बस डेपोच्या थांब्यावर दिसत असत. त्यामुळे त्यांनी तोंडे यांनाही डबा द्यायला सुरुवात केली. चव्हाण यांनी फेसबुकवर फोटो टाकून तोेंडेंच्या कुटुंबाचा शोध सुरू केला. त्यानुसार तोंडे हे कोथरूडमधील सुतारदऱ्यात राहणारे असल्याचे समजले. त्यांच्या मुलाने कामामुळे मला येता येणार नाही असे सांगितले, मात्र पुतण्या शंकर तोंडे याने त्यांना घरी घेऊन जाण्यास पुढाकार घेतला. चव्हाण यांनी पोलिस उपनिरिक्षक अमोल घोडके , पोलिस उपनिरिक्षक भैरवनाथ शेळके यांच्या सहकार्याने शंकर याची आजोबांशी भेट घडविली.