परिस्थितीशी झुंजले; पण यश मिळवलेच!
संधी मिळाली की त्याचं सोनं करायचं असं काही जणांचं ध्येय असतं. उमराणी (ता. जत) येथील अन्नपूर्णा आवटी यांच्याबाबत असंच घडत आहे. वकील होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणाऱ्या अन्नपूर्णा यांनी न्यायाधीशपदापर्यंत मजल मारली आहे. जतसारख्या दुष्काळी तालुक्यातील पहिल्या महिला न्यायधीश बनल्या आहेत. दुष्काळाचा शिक्का दाखवून निराश होणाऱ्या तालुक्यातील नव्या पिढीच्या त्या प्रेरणास्रोत ठरल्या आहेत.
संधी मिळाली की त्याचं सोनं करायचं असं काही जणांचं ध्येय असतं. उमराणी (ता. जत) येथील अन्नपूर्णा आवटी यांच्याबाबत असंच घडत आहे. वकील होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करणाऱ्या अन्नपूर्णा यांनी न्यायाधीशपदापर्यंत मजल मारली आहे. जतसारख्या दुष्काळी तालुक्यातील पहिल्या महिला न्यायधीश बनल्या आहेत. दुष्काळाचा शिक्का दाखवून निराश होणाऱ्या तालुक्यातील नव्या पिढीच्या त्या प्रेरणास्रोत ठरल्या आहेत.
जतच्या दक्षिणेला १७ किलोमीटवर कर्नाटक सीमेवर असलेल्या उमराणी येथे जन्म झाला. उमराणी तसं शिवकालीन. सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी मुघलांशी केलेली अखेरची लढाई याच गावात झाली. संघर्ष मातीचा गुण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा गावात अन्नपूर्णा यांचा जन्म ईश्वर आणि कस्तुरी या दांपत्याच्या पोटी झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वडील मजुरीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चिप्री येथे गेले.
बोलीभाषा कन्नड असली तरी मराठीत शिक्षणाचा निर्णय घेतला. वडिलांनी मेहनत करून अन्नपूर्णाला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. लेकीनं घराण्याचं नाव मोठं करावं, असं त्यांना नेहमी वाटत होतं. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मेहनत केली. कायद्याची पदवी मिळवली. घरची परिस्थिती हलाखीची असताना त्याचं भांडवल न करता तिला धैर्यानं तोंड देत आलेल्या संकटांचा सामना करीत त्यांनी पदवी घेतली.
वकील झाल्यानंतर प्रॅक्टीससाठी कोल्हापूर न गाठता त्यांनी मातीला प्राधान्य दिले आणि जतमध्ये ॲड. श्रीपाद अष्टेकर यांच्याकडे प्रॅक्टीस सुरू केली. प्रॅक्टीस करीत असताना त्यांना लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अँड सिव्हील जज्ज परीक्षेला बसण्याची संधी मिळाली. संधीचं सोनं करण्याचा निर्धार त्यांनी केला. पुणे येथे वर्षभर राहून जिद्दीने अभ्यास केला. परीक्षेत यश मिळवून न्यायाधीश होण्याचा बहुमान प्राप्त केला.
अपर्णा यांनी तरुण वयात न्यायाधीश होण्याचा मान मिळवला आहे. त्या तालुक्यातील पहिल्या महिला न्यायाधीश झाल्या आहेत. मुलगी न्यायाधीश झाल्याने आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना. जतसारख्या दुष्काळी तालुक्यात जेथे पाण्यापासूनच समस्यांचा डोंगर पाचवीला पूजल्यासारखा असतो. अशा ठिकाणी जिद्दीने परिस्थितीवर मात करता येते हे अन्नपूर्णा यांनी दाखवून दिले. न्यायाधीशसारख्या जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या पदावर कामाची संधी मिळाली. त्याचा उपयोग समाजातील अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांना करून देण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी करणार आहे, असे त्या आत्मविश्वासाने सांगतात.
- प्रदीप कुलकर्णी