esakal | ‘वंचितांची शाळा’; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुणाची अनोखी समाजसेवा!
sakal

बोलून बातमी शोधा

Anu and Prasad Mohite from Solapur

‘वंचितांची शाळा’; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तरुणाची अनोखी समाजसेवा!

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नवरा रिक्षा चालवतो, तर पत्नी लोकांना जेवणाचे डबे पुरवते. वंचित मुलांना शिक्षण देण्यासाठी हवा तसा वेळ मिळावा, म्हणून या दोघांनी आपापल्या नोकऱ्या सोडल्या.

सोलापुरातील अनु व प्रसाद मोहिते या जोडप्याने भिक्षेकरी व स्थलांतरित मुलांसाठी‘प्रार्थना बालग्राम’उभं केलं आहे. विशेष म्हणजे प्रसाद हे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील आहेत. स्वतःच्या दारिद्र्य व दुखाःवर मात करून त्यांनी हलाखीची धग सोसणाऱ्या मुलांना शिक्षण देऊन सक्षम करण्याचा ध्यास घेतला आहे.

प्रसाद म्हणाले, ‘‘पाच वर्षांपूर्वी हे काम आम्ही हाती घेतलं. स्थलांतरित व भिक्षेकरी मुलांना शिक्षण देण्यासाठी ‘वंचितांची शाळा’सुरू केली.

प्रथम दहा मुलांना शिकवत होतो. तेव्हा निवासी व्यवस्था नव्हती. मग लक्षात आलं की, भिक्षेकरी मुलं एखाद्या नातेवाइकाकडे राहतात. ती मंडळी यांना जबरदस्तीने भीक मागायला लावते. त्यातून सुटका करायची, तर यांना हक्काचं घर हवं. भाडे तत्त्वावर यासाठी जागा घेऊन दहा मुलांची सोय केली. मी बार्शी तालुक्यातील इरलेवाडी गावचा. तिथली पाच एकर जमीन विकून सोलापूरजवळच्या मोरवंची गावात तीन एकर जमीन घेतली. मुलगी झाली, तर तिचं नाव प्रार्थना असं ठेवायचं आधीच ठरवलं होतं. मुलगी झाली, पण जन्माला येताच तत्काळ हृदयविकाराने मरण पावली. आम्ही तिचं देहदान केलं. तिच्या आठवणी जपण्यासाठी ‘प्रार्थना बालग्राम’ हे नाव अनाथाश्रमाला दिलं.’’

प्रसाद यांनी असंही सांगितलं की, माझ्या वडिलांनी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या केली होती. मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांचा होतो. आपण खूप शिकायचं आहे. आपल्यासारख्या इतर गरीब मुलांना अंधारातून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या हाती शिक्षणाचा दिवा द्यायचा आहे, हा विचार कळत-नकळत मनात खोलवर रुजला. शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट पडले. प्रसंगी अपमान सोसावा लागला. समाजसेवेतील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी सोलापुरात आलो. तेव्हा आईने तिच्या गाठीशी असलेलं मंगळसूत्र विकून पैसे दिले. पुढे शिकत असतानाच अनुची ओळख झाली. तीही माझ्यासारखाच एमएसडब्ल्यूचा अभ्यास करत होती.

एका सामूहिक विवाह सोहळ्यात आम्ही लग्न केलं. दोघेही आधी नोकरी करत होतो. पण वंचित मुलांच्या शिक्षणाचा ध्यास पुरा करताना नोकरीमुळे वेळेचं गणित जुळेना. मग मी रिक्षा घेतली. ती चालवून पैसे आणि हवा तसा वेळ मिळवू लागलो. अनु मेस चालवून पैसे उभे करू लागली. निवासी शाळा व बिगरनिवासी शाळेसाठी लोकांकडून आर्थिक मदत मिळत गेली. आता अनाथाश्रमात राहून दहा मुलं शिकत आहेत. बिगरनिवासी पद्धतीने अडीचशे मुलांना आम्ही दोघे शिकवतो आहोत. अनुची भक्कम साथ आहे. अनाथाश्रमाचं बांधकाम करताना पैसे खुंटल्याने काम थांबलं. त्यावेळी अनुने तिचं मंगळसूत्र गहाण ठेवून वीस हजार रुपये दिले. आमच्याकडे शिकणारी मुलं उद्या स्वतःच्या पायांवर उभी राहिली आणि त्यांनी इतर वंचितांचं दु:ख निवारायला पुढाकार घ्यावा, हीच आमची प्रार्थना.

loading image
go to top