मनगटात पेन धरून ‘ती’ लिहितेय पेपर!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

पाटण/मोरगिरी - पंधरा वर्षांपूर्वी बोबडे बोल बोलण्याच्या वयात दोन्ही हातांच्या बोटांसह मनगटापर्यंत तळहात चुलीच्या निखाऱ्यात जळाल्याने दिव्यांग झालेल्या सावित्रीच्या लेकीने जिद्द न हारता दोन्ही मनगटात पेन धरून दहावीचा परीक्षा दिली. अर्चना यमकर हिचा जिद्दीचा हा प्रवास पाहिला तर परिस्थितीलाही गुडघे टेकायला लावण्याचे तिचे कर्तृत्व नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे. 

पाटण/मोरगिरी - पंधरा वर्षांपूर्वी बोबडे बोल बोलण्याच्या वयात दोन्ही हातांच्या बोटांसह मनगटापर्यंत तळहात चुलीच्या निखाऱ्यात जळाल्याने दिव्यांग झालेल्या सावित्रीच्या लेकीने जिद्द न हारता दोन्ही मनगटात पेन धरून दहावीचा परीक्षा दिली. अर्चना यमकर हिचा जिद्दीचा हा प्रवास पाहिला तर परिस्थितीलाही गुडघे टेकायला लावण्याचे तिचे कर्तृत्व नव्या पिढीसाठी आदर्शवत आहे. 

पाटण तालुक्‍याच्या मोरणा विभागातील कोकिसरे गावाच्या पश्‍चिमेला डोंगरमाथ्यावरील धनगर समाजाच्या वस्तीचे गवळीनगर हे तिचे गाव. अठराविश्व दारिद्य्र असणाऱ्या सिदू धुळा यमकर यांच्या कुटुंबात तिचा जन्म झाला. रांगायला लागलेली व बोबडे बोल बोलण्याचे अर्चनाचे वय असताना भावंडांच्या आधारावर अर्चनाला सोडून आई-वडील मोलमजुरीसाठी गेले होते. घरी खेळताना ती चुलीजवळ गेली अन्‌ आयुष्याचे अपंगत्व घेऊन बसली. रखरखते विस्तवाचे निखारे असलेल्या चुलीत हात गेले आणि दोन्हीही हातांची बोटे जळाली. घरच्या परिस्थितीने घरगुती उपाय केले. मात्र, हाताची बोट कायमची निकामी झाली. वय वाढत गेले तसे तिने शालेय शिक्षणाचा अभाव असणाऱ्या गवळीनगरमध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा केला.

पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गवळीनगरला झाल्यानंतर इयत्ता आठवीला ती मोरगिरीतील मोरणा विद्यालयात जून २०१६ साली दाखल झाली. गेली तीन वर्षे दळणवळणाची सोय नसल्याने गवळीनगर ते मोरगिरी हा दीड तासांचा प्रवास ती दररोज जिद्दीने पायी चालत करत होती.

शाळेबरोबर घरातील तांदूळ निवडणे, भाकरीचे पीठ मळून देणे अशी छोटी-मोठी कामे करून कुटुंबाला मदतही ती करते. सहा महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन झाले असतानाही नशिबी आलेल्या परिस्थितीचे रडगाणे न गाता या सर्व परिस्थितीवर मात करीत सध्या अर्चना मोरणा विद्यालयात दहावीची परीक्षा देत आहे. नियमाप्रमाणे सहायक घेण्याची सुविधा असतानाही ती नाकारून दोन्ही मनगटात पेन धरून ती पेपर लिहीत आहे. मनगटापर्यंत जळालेले हात, घरची हलाखीची परिस्थिती, दररोज तीन तास पायी प्रवास करून दहावीची परीक्षा देण्यापर्यंत अर्चनाने मारलेली मजल सावित्रीच्या लेकींनी आदर्श घ्यावा, अशीच आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वैभवशाली कार्याचा वसा अर्चना चालवीत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Archana Yamkar Student Handicapped Exam Motivation