esakal | कलावंत सख्यांचा अभिव्यक्तीतून विरळा संवादसेतू 
sakal

बोलून बातमी शोधा

snehal-devshri

देवश्री वैद्य व स्नेहल जोशी या आर्किटेक्‍ट मैत्रिणींची कलेच्या माध्यमातून एकत्र वाटचाल सुरू आहे. यांच्या अभिव्यक्तीच्या गुंफणीतून साकारलेल्या कलाकृती समाजमाध्यमांमध्ये रसिकांची दाद मिळवत आहेत.

कलावंत सख्यांचा अभिव्यक्तीतून विरळा संवादसेतू 

sakal_logo
By
नीला शर्मा

देवश्री वैद्य व स्नेहल जोशी या आर्किटेक्‍ट मैत्रिणींची कलेच्या माध्यमातून एकत्र वाटचाल सुरू आहे. स्नेहलची रंगचित्रं, छायाचित्रं आणि देवश्रीचे भावगर्भ शब्द हातात हात घालून प्रवास करतात. यांच्या अभिव्यक्तीच्या गुंफणीतून साकारलेल्या कलाकृती समाजमाध्यमांमध्ये रसिकांची दाद मिळवत आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कलेच्या प्रवासाबद्दल देवश्री वैद्य म्हणाली, ""मी आणि स्नेहल जोशी पहिलीपासून एकाच वर्गात होते. आर्किटेक्‍टला गेल्यावर मात्र विषयांनुसार गट वेगळे झाले. मी लॅंडस्केपिंग तर स्नेहल इंटिरिअरचा अभ्यास करत होती. तरीही संपर्क सातत्याने होताच. घेतलेल्या शिक्षणाव्यतिरिक्त स्नेहलला कलेची ऊर्मी स्वस्थ बसू देईना. उत्तम चित्रकार ती आहेच, पण छायाचित्रणकलेनेही तिचं लक्ष वेधलं. बघता बघता ती निसर्ग व वन्यजीव छायाचित्रणात रमली. तिने काढलेलं कुठलंही छायाचित्र समाजमाध्यमावर मी पाहिलं की, माझ्याकडून आपसूकच कवितेतून प्रतिक्रिया व्यक्त व्हायची. हा संवाद अनेक परिचितांना आवडायचा. ते कळवायचे. मग आम्ही ठरवून तिची छायाचित्रं आणि माझी शब्दचित्रं एकत्रितपणे पोस्ट करू लागलो. पाहणाऱ्यांकडून या संवादाला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आयुष्यातील चढउतारांना तोंड देताना मी कळत-नकळतच लिहू लागले. भावनांना वाट मिळाली आणि मला त्यातून अभिव्यक्तीची नवी वाट गवसली. स्नेहल वैविध्याच्या ओढीने छायाचित्रणात नवनवे प्रयोग करू लागली. त्या छायाचित्रांमधून तिला जे मांडायचं असतं त्याचं भाषांतर माझ्या शब्दांत जणू होऊ लागलं. मैत्रीचा ही सर्जनशील वाटचाल आमच्यातली सकारात्मकतेची ऊर्जा चेतवणारी ठरते आहे.'' 

स्नेहलने सांगितलं की, एखादा छंद जडणं आणि त्याने आपल्याला अकल्पितपणे भरभरून आनंद व आत्मविश्‍वास देणं हे देवश्री आणि मी आपापल्या प्रस्तुतीतून अनुभवतो आहोत. आमचे हे छंद आम्हाला अंतर्मुख करतात. निसर्गासमोर नतमस्तक व्हायला लावतात. नित्य नवी ऊर्जा पुरवतात. मोकळ्या श्‍वसाचा अनुभव देतात आणि सळसळत्या उत्साहाची कुमक पुरवतात. देवश्री आई झाली आणि निषादबरोबरच तीही जणू वाढू लागली. इकडे निसर्ग आणि वन्यजीवांना छायाचित्रणबद्ध करताना मला त्या सगळ्याचा लळा लागला. आपापल्या अनुभूतींचा मनात न मावणारा खजिना आम्ही एकमेकींना देत-घेत असतो. जाणिवा विस्ताणारं हितगूज आमच्या कलाकृतींमधून करत असतो.