केवळ दहा लाख रुपयांत दांपत्याने उभारली निफा द्राक्ष वायनरी

ज्ञानेश उगले
Monday, 24 April 2017

आपण मोठे वायनरी युनिट पाहिले की पाहूनच धडकी भरते. वाटते, ही अपने बसकी बात नही. पण इच्छाशक्ती असेलच तर आपण थोड्या गुंतवणुकीतदेखील काही घडवू शकतो.सध्याच्या संकटाच्या गर्तेत आलेल्या शेतकऱ्यांना हेच सांगायचे आहे की अशक्य काहीही नसते. फक्त इच्छाशक्ती अभेद्य ठेवा.
- अशोक सुरवाडे

नाशिक जिल्ह्यातील रामाचे पिंपळस येथील अशोक व जोत्स्ना या सुरवाडे युवा दांपत्याने केवळ आठ ते दहा लाख रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये ‘स्थानिक फॅब्रिकेटेड’ यंत्रसामग्रीचा वापर करीत द्राक्ष वाईन निर्मिती यशस्वी केली आहे. अलीकडील काळात शेतीतील समस्या वाढून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशा वेळी इच्छाशक्ती, निर्धार, सकारात्मक मानसिकता आणि कौशल्य यांचा वापर करून शेतीत आपण कोणतीही गोष्ट घडवू शकतो असा विश्वास देण्यात सुरवाडे यशस्वी झाले आहेत. त्यांचे कमी खर्चातील वाईन निर्मिती युनिट युवा शेतकऱ्यांसाठी रोलमॉडेल आहे. 

तुम्ही परिस्थितीकडं कसं पाहता? "आउट ऑफ बॉक्‍स'' 
विचार करण्याचं धाडस तुम्ही दाखवता का? एखाद्या गोष्टीचा अभ्यास करून जोखीम (कॅलक्‍युलेटेड रिस्क) स्वीकारता का? जर असं करीत असाल तर व्यवसायात यशस्वी होण्याची संधी तुम्हाला अधिक आहे. निफाड तालुक्यातील (जि. नाशिक) येथील रामाचे पिंपळस येथील अशोक व ज्योत्स्ना सुरवाडे यांनी असाच वेगळा विचार केला. 

त्यातूनच "निफा वायनरी'' हे शेती पूरक उद्योगाचं "मॉडेल'' म्हणून उभं राहिलं आहे. पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेजमधून एमएस्सी (जैवविविधता) ही पदवी अशोक याने घेतली. त्यानंतर भारत सरकारच्या ‘नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्‍टिक ॲण्ड ओशन रिसर्च'' संस्थेंतर्गत अभ्यासवृत्तीसाठी अंटार्क्‍टिका (दक्षिण ध्रुवावर) मोहिमेसाठी त्याची निवड झाली. दोन वेळा त्याने ही मोहीम अनुभवली. 

अशोकचा प्रवास 
अंटार्क्‍टिका मोहिमेनंतर पुण्यातील शिक्षण वगैरे संपल्यानंतर अशोक आपल्या गावी परतला.

अशोक म्हणाले की, नोकरी करायची नव्हती. संधी खूप होत्या, पण ब्रेनड्रेन'' होऊ द्यायचं नव्हतं. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या परिसराला, आपल्या कुटुंबाला करून द्यायचा होता. गावी म्हणजे रामाचे पिंपळसला घरच्या शेतीत भरडधान्ये, कांदे, ऊस, द्राक्षे ही पिके होती. रसायनांचा जास्त वापर व्हायचा. मी जैवविविधतेचा विद्यार्थी असल्याने ते खटकत होतं. अभ्यास, चिंतन सुरू होतं. वाइन द्राक्षे हा पर्याय योग्य वाटला. मात्र त्या काळात म्हणजे २००८ ते १० या वर्षात हा उद्योग संकटात सापडला होता. नव्याने आलेले उद्योजक आणि वाइन द्राक्ष उत्पादक यांच्यातील करार मोडले जात होते. द्राक्ष उत्पादकांपुढील संकट वाढलं होतं. माझ्यातील उद्योजकतेला ही परिस्थिती आव्हान देणारी वाटली.

तंत्रज्ञान आणि भांडवल 
स्वतः वाईननिर्मितीत उतरायचं ठरवलं. त्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती घेणं आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात फारसं अवघड गेलं नाही. बऱ्याच वायनरी पाहिल्या. तज्ज्ञांच्या भेटी घेतल्या. पुस्तके वाचली. इंटरनेट विशेषत: यूट्यूबचा उपयोग केला. मजूरबळ कमीतकमी वापरायचं ठरवलं. त्यातून भांडवलाची बचत करायची होती. विशेष म्हणजे स्वत: गुंतून जाण्यातला आनंद घेता येतो असं अशोक सांगत होता. 

ग्राहककेंद्रित वायनरीचा पसारा 
अशोक सांगू लागले. सुरवातीला साडेतीन एकरांत वाईन द्राक्षांची लागवड केली. शार्डोने, मस्कत, सोविनॉन, सिराज हे वाण निवडले. आज सात एकरांत लागवड आहे. मोठ्या वायनऱ्यांची १-उत्पादक २- वितरक ३- किरकोळ विक्रेता त्रिस्तरीय मार्केट व्यवस्था असते. माझ्यासारख्या छोट्या शेतकऱ्याला ही परवडणारी नव्हती. ग्राहकच आपल्या बागेत, वायनरीत कसा येईल यावर लक्ष केंद्रित केलं. पर्यटन केंद्र विकसित करायला सुरवात केली. फार मोठ्या सुविधा पुरवू शकत नसलो तरी शहरातील ग्राहकांना वाइन बनते कशी? या विषयी उत्सुकता असते. त्यांना शेतावर बोलावून माहिती देऊ लागलो. यातून व्यावसायिक मॉडेल विकसित होत गेलं. वाइनची चव, स्वाद याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती मिळाल्यानंतर प्रतिसाद वाढला. गेल्या तीन वर्षांच्या काळात पुणे, मुंबईतील नियमित ग्राहकांचे सुंदर नेटवर्क तयार झाले आहे. नाशिक येथील पर्यटन व्यावसायिकांशी ‘लिंक अप’ केले. ते पर्यटकांना माझ्या वायनरीचे नाव भेटीसाठी सुचवू लागले.   

रेड आणि व्हाईट वाईन 
द्राक्ष उत्पादन- वाणनिहाय एकरी चार ते आठ टनांपर्यंत 
रेड आणि व्हाईट अशा दोन वाईन बनतात.
व्हाईट प्रकारात साल, देठे काढून द्राक्षातील ज्यूस केवळ वापरला जातो. त्यानंतर यीस्टद्वारे फर्मेटेंशन करून वाईन बनवली जाते. 
रेड प्रकारात फळाची साल व ज्यूस दोन्ही वापरले जातात. साल असल्याने ही वाईन थोडी तुरट होते. मात्र वैद्यकीयदृष्ट्या ती अधिक उपयोगी ठरते. 

प्रकल्प क्षमता व गुंतवणूक 
अशोक यांचे १२ हजार लिटर क्षमतेचे वाईन युनिट आहे. त्यासाठी साहित्य, यंत्रे असा मिळून आठ ते दहा लाख रुपये खर्च आला आहे. याच जागेचा खर्च वेगळा आहे. शेतातील एक गुंठा जागाही पुरते. दरवर्षी खेळतं भांडवल म्हणून सहा ते सात लाख रुपये लागतात. यात वीज बिल, परवान्यांचे नूतनीकरण, यीस्ट, बॉटल्स, लेबल आदी खर्च असतो. 

दर- ब्रॅण्डनुसार प्रति साडेसातशे मिलीसाठी १६० ते ५०० रुपये.   

आत्तापर्यंतच्या अभ्यासानुसार वाईन उद्योगात ३३ टक्के खर्च कच्च्या मालाला व ३३ टक्के खर्च एकूण वाइन निर्मितीला येतो. यानंतर ३३ टक्के निव्वळ उत्पन्न मिळते असे अशोक यांना दिसून आले आहे. 

अनुदान 
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाचे (एनएचबी) ३३ टक्के अनुदान वाईन उद्योगाला मिळते. मात्र अशोक यांनी कमी खर्चात, विना कर्जात अनुदान न घेता वायनरी उभी केली अाहे. केवळ अनुदान आणि ग्लॅमरसाठी या उद्योगाकडे वळू नये. असे असंख्य प्रकल्प अडचणीत आले आहेत. स्वत:च्या बीज भांडवलावर कमीत कमी क्षमतेत उद्योग सुरू करावा, असा कळकळीचा सल्ला अशोक देतात. 

पत्नीचा मोठा वाटा 
निफा वायनरी उद्योगात अशोक यांना पत्नी सौ. ज्योत्स्ना यांची मोलाची मदत होते. संपूर्ण व्यवस्थापन दोघेच पाहतात. सौ. ज्योत्स्ना यांनी मानसशास्त्रात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. प्रशासकीय कामांची, कागदपत्रांच्या पूर्ततेची जबाबदारी अशोक तर वायनरीत येणाऱ्या पर्यटकांचे व्यवस्थापन ज्योत्स्ना सांभाळतात. द्राक्षाचे गाळप करण्यापासून ते टॅंक भरणे, लेबलिंग ही सर्व कामे दोघे मिळून करतात. कृषी पर्यटनावर अधिक लक्ष केंद्रित करून भविष्यात हा उद्योग वाढविण्याचा त्यांचा मनोदय आहे. 

निफा वायनरीची वैशिष्ट्ये
शेतातील छोटेखानी वायनरी, कमी जागेचा वापर.
कर्जाशिवाय उभारलेला उद्योग. 
स्थानिक कारागिरांच्या मदतीने बहुतांश 
यंत्रांची निर्मिती. 
कमीत कमी मजूर बळाचा वापर. 
 अशोक सुरवाडे, ७०६६००३७४०. 

छोटी वायनरी उभारतानाचे महत्त्वाचे टप्पे 
कच्चा माल : द्राक्षे स्वत:च्या शेतातील असणे महत्त्वाचे. 
मंजुरी- राज्य उत्पादन शुल्क, फूड सेफ्टी विषयातील संस्था (एसएसएसएआय) आदींच्या मंजुरी आवश्‍यक. 
प्रकल्प उभारणी - क्षमतेनुसार मशिनरी, टॅंक या बाबी आवश्‍यक. मार्केट : स्थानिक, मोठी शहरे, निर्यात यापैकी पर्याय आवश्‍यक. 

वाईन युनिट तंत्रज्ञान 
आर्थिक संस्था सुमारे ६५ हजार ते एक लाख लिटर क्षमतेच्या प्रकल्पांना कर्ज देतात. छोट्या व्यावसायिकांना कर्ज देण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले. अशोक यांना मोठा उद्योग करायचा नव्हता. थोड्या भांडवलावर सुरवात केली.

द्राक्ष गाळप, ज्यूस काढण्यासाठी ‘न्यूमॅटिक प्रेस मशिनरी’चा खर्च मोठा असतो. इटलीहून आयात होणाऱ्या या सयंत्राना प्रत्येकी १५ ते २० लाख रुपये खर्च येतो. त्या यंत्रांची यू ट्यूबवरून माहिती घेतली. गावातील स्थानिक फॅब्रिकेटरच्या (कारागिराच्या) मदतीने ती कमी खर्चात तयार केली. 

न्यूमॅटिक प्रेसच्या एेवजी बास्केट प्रेसचा वापर केला.

वाईन साठवणुकीसाठी स्टेनलेस स्टीलचे टॅंक स्थानिक स्तरावर अंबड एमआयडीसीमधून कमी खर्चात बनवून घेतले. त्यासाठीचे व्हॉल्व्ह व टॅंकचे दरवाजे (आतील स्वच्छता आदी कारणांसाठीचे) या बाबी आयात केल्या. 

बाटल्या पॅकबंद करण्यासाठी (सिलिंग) सिंगल हेड मशिन, बेल्ट यांचाही स्थानिक स्तरावरीलच वापर केला. 

सरकारच्या निकषांनुसार प्रयोगशाळा उभारली. त्यात वाइनमधील सामू, साखर, आम्लता, अल्कोहोल या बाबी तपासल्या जातात.  

आपण मोठे वायनरी युनिट पाहिले की पाहूनच धडकी भरते. वाटते, ही अपने बसकी बात नही. पण इच्छाशक्ती असेलच तर आपण थोड्या गुंतवणुकीतदेखील काही घडवू शकतो.सध्याच्या संकटाच्या गर्तेत आलेल्या शेतकऱ्यांना हेच सांगायचे आहे की अशक्य काहीही नसते. फक्त इच्छाशक्ती अभेद्य ठेवा.
- अशोक सुरवाडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok surwade family story