बेवारस मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी माणुसकीची फुंकर! 

बेवारस मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी माणुसकीची फुंकर! 

औरंगाबाद -आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविणाऱ्या निष्ठुर मुलांच्या कहाण्या ऐकून माणुसकी संपत चालल्याची चर्चा आपण करतोय. अशा काळात रस्त्यावर ओंगळवाण्या अवस्थेत बेवारस फिरणाऱ्या भारतीयांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचे काम करतोय एक जिगरबाज युवक. योगेश मालखरे असे त्याचे नाव. त्याचे हे कार्य पाहिले की "अजूनही वाहतोय माणुसकीचा झरा' याची प्रचीती येते. बेवारसांवर माणुसकीची फुंकर घालण्याचे त्याचे हे काम सुरूच आहे. आता त्याला गरज आहे ती समाजातील मदतीच्या हातांची... 

मळकट कपडे, वाढलेले केस, किटलेल्या शरीराचा माणूस दिसला की, अनेकांचे मन हेलावते. हे चित्र पाहिल्यानंतर थबकलेले लोक इच्छा असूनही त्यांच्याजवळ जाऊ शकत नाहीत. कारण त्यात बहुतांश बेवारस मनोरुग्णच असतात. त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस उस्मानाबादच्या योगेशने केले. योगेश सोनवणे, प्रमोद मुळे, इरफान पठाण, फैजल खान, नितीन शेलार, महेश बागडे, विशाल चव्हाण, कार्तिक जाधव आदी तरुणांच्या साथीने "स्माईल प्लस सोशल फाउंडेशन'च्या माध्यमातून 2007 पासून त्याचे हे कार्य सुरू आहे. राज्यातील शहरे "बेवारस'मुक्‍त झाली पाहिजेत, हा निर्धार त्याने केलाय. त्यानुसार सध्या मुंबई, नागपूर, पुण्यात त्याने कार्याची मुहूर्तमेढ रोवली आहे. त्याने आतापर्यंत 400 पेक्षा अधिक बेवारस व मनोरुग्णांचे पुनर्वसन केले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून हे कार्य रेटताना गेल्या दोन वर्षात 300 मनोरुग्णांना पुण्यातील येरवड्याच्या रुग्णालयात पोहचवण्याचे काम फत्ते केले आहे. तर 32 जणांना कुटुंबांच्या स्वाधीन केल्याचे योगेश मालखरे सांगतो. आता त्याचे लक्ष औरंगाबादवर आहे. जात-धर्म, पक्ष-संघटना, गाव-शहरांच्या भिंती तोडून समर्पित आणि निःस्वार्थ भावनेचे "स्माईल'चे काम राज्यातील तरुणांना भावतेय. या कार्याला सोशल मीडियातून हातभार लागतो आहे. 

आपुलीचा संवाद 
रस्त्यावर फिरणारे बेवारस किंवा भिकारी, निराश्रित दिसल्यास त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधण्याचे काम "स्माईल प्लस' करते. संबंधिताचा विश्‍वास संपादन करून त्याच्या ओंगळवाण्या रूपाला माणुसकीची साथ दिली जाते. पुढे त्याचे पुनर्वसन करून आधार देण्याचे काम केले जाते. वैद्यकीय तपासण्या, औषधोपचाराचा खर्चही केला जातो. 

शासनाचे वाचविले पैसे 
मनोरुग्णांबाबत अशा किचकट प्रक्रियेसाठी 11 दिवस लागायचे. देखरेख आणि इतर खर्चाकामी एकासाठी शासनाला 50 हजार इतका खर्च येतो. "स्माईल प्लस'च्या कामाने शासनाची आतापर्यंत दीड कोटीहून अधिक रुपयांची बचत झाली आहे. यासाठी पोलिस, आरोग्य यंत्रणेची मदत मिळत असल्याचे योगेश मालखरे व नितीन शेलार यांनी सांगितले. 

"भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत' ही प्रतिज्ञा शाळेत म्हणायचो. मात्र, कॉलेज जीवनातून बाहेर पडल्यावर, तीच प्रतिज्ञा पुन्हा आठवली ती रस्त्यावर दिसणाऱ्या बेवारस मनोरुग्णांच्या विदारक वास्तवाने. हेच वास्तव स्वीकारत महाराष्ट्र "बेवारस'मुक्तीचा संकल्प केला आहे. 
- योगेश मालखरे  संस्थापक, स्माईल प्लस सोशल फाउंडेशन 

औरंगाबादेत 28 ला माणुसकीची रॅली 
बेवारस मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कोणताही कायदेशीर पर्याय नाही. याच कारणाने, बेवारस महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्‍न गंभीर बनलेला आहे. अशा महिलांचा "स्माईल'ची टीम शोध घेत आहे. त्यासाठी रविवारी (ता. 28) सकाळी नऊला येथील क्रांती चौकातून "माणुसकीची रॅली' काढण्यात येणार आहे. त्यानंतर मनोरुग्णांना उचलून त्यांना नीटनेटके करून कायदेशीर प्रक्रियेद्वारे मनोरुग्णालयात पाठवले जाणार आहे. बेवारस मनोरुग्ण निदर्शनास आल्यास 8600000806 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन योगेशने केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com