एक संगणक, एक माणूस ते तीनशे जणांना रोजगार

शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

वर्ष २००२ मध्ये भागीदारीत सुरू केलेला व्यवसाय फार काळ टिकला नसल्याने अवघ्या दोन वर्षांतच नव्याने सुरवात करावी लागली. वाट्याला आलेले एक ड्रील मशिन, एक संगणक, एक लेथ मशिन यांच्या साहाय्याने एका कर्मचाऱ्याच्या सोबत आरंभिलेला उद्योग आज एवढा मोठा झाला आहे की, त्यावर तीनशे जणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उदरनिर्वाह अवलंबून आहे. ही यशोगाथा आहे टूल-टेक टुलिंग आणि किर्दक ऑटोकॉमचे सर्वेसर्वा सुनील किर्दक यांची...

पेशाने प्राध्यापक असल्याने आपला मुलगा प्रशासकीय सेवेत जावा, असे सुनील किर्दक यांचे वडील रामभाऊ किर्दक यांना वाटे. पण सुनील यांनी मनाशी अभियंता होण्याची खूणगाठ बांधली होती. ते ध्येय बाळगून सुनील यांनी घरात विज्ञान शाखेची निवड करण्याचा हट्ट धरला. याचदरम्यान सुनील यांनी आयएएस नाही, तर किमान डॉक्‍टर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली कारण त्यांचे दोन्ही भाऊ हे डॉक्‍टरच. वडिलांच्या आणि सगळ्यांच्याच इच्छेविरोधात जात त्यांनी विज्ञान शाखेची निवड करत आपल्या महाविद्यालयीन शिक्षणाला आरंभ केला. त्यात डॉक्‍टरीकडे वळावे लागू नये म्हणून दहावीत मेरिटचे विद्यार्थी राहिलेले सुनील यांनी इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या विषयाची निवड करत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. 

अभियंत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी आपला जोर लावला आणि मेटलर्जीच्या इंजिनिअरिंगसाठी पुण्यातील प्रतिष्ठेच्या अशा सीओईपी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. या पात्रतेचा मात्र त्यांना फायदा झाला नाही. त्यांनी जेएनईसी महाविद्यालयातून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. या पदवीच्या आधारे औरंगाबादेतील बडवे इंजिनिअरिंग या कंपनीत सुनील किर्दक नोकरीला लागले; पण अवघ्या आठवड्याभरातच त्यांना हे लक्षात आले की, हे काम आपल्यासाठी नाही. सकाळी बाबा पेट्रोलपंपापर्यंत येणे आणि तेथून बसने जाताना आणि काम करताना दिवसातील एक एक मिनीट त्यांना एक एक तासासारखा वाटू लागला होता. मनाशी केलेला निर्धार अचानक विरघळला आणि त्यांनी आपण आयएएसकडे जाऊ इच्छितो, असे घरात जाहीर केले. चार वर्षांची पदवी घेतल्यावर हाती असलेली नोकरी सोडून नव्याने शिक्षणाला सुरवात करायची हे मात्र रामभाऊ किर्दकांना काहीसे रुचले नाही. त्यांनी सुनील यांची समजूत काढून अभियांत्रिकी क्षेत्रात काम करण्याचे सुचवले. मग फैसला झालाच, अभियांत्रिकी हे आपले क्षेत्र आहे, त्यातच आता आपल्याला राहायचे असल्याने या क्षेत्राला पॅशन म्हणून स्वीकारत आणि त्यावर प्रेम करत किर्दक यांनी आपले पंख पसरवायला सुरवात केली. बडवे इंजिनिअरिंगमध्ये सुरू असलेली नोकरी चार वर्षे केली. चार वर्षे नोकरी केली आणि बाहेर पडून उद्योगात उतरण्याचा निर्णय घेतला. नोकरीदरम्यान अनेक कामे त्यांनी हातावेगळी केली आणि त्यातून अनेक उत्पादने घडवल्याचा अनुभव त्यांच्या हाताशी होता. दरम्यान, बडवे इंजिनिअरिंगनेही वेगवेगळे पार्ट तयार करण्याचे काम आपल्यावर विश्वासाने सोपवले. साधारण ज्या कंपनीशी आपले संबंध कागदोपत्री संपतात तेथील संपर्कही नंतर विषेश असा राहत नाही, अशी प्रथा कॉर्पोरेट जगतात आहे. पण बडवे कंपनी आणि सुनील यांच्यातील संबंध काही वेगळेच सांगणारे होते. 

श्रीकांत बडवे यांचा सुनील यांच्यावरील हा विश्वास एवढा दृढ होता की, नोकरी सोडल्यावरही त्यांनी किर्दक यांना अनेक कामांमध्ये लक्ष घालण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर सुनील यांनी उद्योगात येण्याचे ठरवले. त्यावेळी औरंगाबादेत येणाऱ्या अनेक मशिन आणि यंत्रणा पुणे, बंगळुरु येथून आणल्या जायच्या. ज्यांच्यासाठी अनेकांना दांडगी रक्कम आणि ने-आण करण्यासाठी मोठी खर्चही करावा लागायचा. या महागड्या मशिन येथेच तयार करणे शक्‍य आहे आणि त्यातून पैसेही वाचतील, असे वाटल्याने सुनील किर्दक यांनी मशिन निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. वर्ष २००२ मध्ये भागीदारीत केलेला उद्योग दोन वर्षांतच थांबवला. या भागीदारीतून फारसे काही हाती आले नाही. मात्र जे आले तीच होती पुढील उद्योगाची गुंतवणूक आणि त्याच्या साथीला होता अनुभव, काहीतरी करण्याची जिद्द. जुन्या उद्योगातून हाती आला तो एक संगणक आणि अवघी एक लेथ मशिन. मशिन निर्मितीचा प्राण मानल्या जाणाऱ्या लेथ मशिनच्या साथीने प्रगतीचा आलेख पहिल्या महिन्यात काहीसा वरच्या दिशेला गेला. संगणक, ड्रील मशिन आणि लेथ मशिनसह एक माणूस हाती घेतला आणि ६०० चौरस फुटांच्या भाडेतत्वावर घेतलेल्या शेडमध्ये नव्याने श्रीगणेशा केला. या लहानशा अशा शेडमध्ये आरंभिलेला उद्योग आज वाढतच गेला आहे. पहिल्या महिन्यात १० हजारांची उलाढाल असलेला मशिन निर्मिती आणि वाहनांचे भाग तयार करण्याचा उद्योग आज कोट्यवधींच्या घरात गेला आहे. ऑटो उद्योगात पाऊल ठेवताना त्यांना साथ मिळाली ती औरंगाबादच्या व्हेरॉक ग्रुपची. व्हेरॉकने त्यांच्या बुद्धिमत्तेवर आणि जिद्दीवर विश्वास ठेवत मदतीचा हात दिला. देशातील सगळ्याच वाहन उद्योगांना ‘एक्‍झॉस्ट सिस्टीमची मॅन्युफॅक्‍चरिंग असेंब्ली’ तयार करून देणारी कंपनी म्हणून काम करताना या कंपनीने दोन राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले आहेत. 

वर्ष २००४ मध्ये सुरु केलेल्या नव्या उद्योगाचे आता अनेक युनिट झाले आणि त्यावर ३०० कामगारांचा उदरनिर्वाह आहे. मशिन डिझाईनच्या कामात आता किर्दक ऑटोकॉम आणि टूल-टेक टुलिंगने अशी प्रगती साधली आहे की, त्यांनी तयार केलेल्या मशिन अमेरिका आणि चीनच्या कंपन्यांमध्ये कर्तव्य बजावत आहेत. आगामी दहा वर्षांत आता कंपोनंट स्पेशलिटी, ॲग्रो प्रोसेसिंग आणि ऊर्जा क्षेत्रात लागणाऱ्या मशिन्सची निर्मिती आणि त्यांच्यावर संशोधन करण्याचा ‘रोडमॅप’ या कंपनीने आखला आहे. चांगल्या माणसांना उद्योगात उभे करून कंपनी आपल्या उत्पादनांची निर्यात वाढवण्यावरही भर देणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad news Sunil Kirdak