समाजसेवेसाठी ‘बजाज’चे ‘अर्पण’

समाजसेवेसाठी ‘बजाज’चे ‘अर्पण’

पिंपरी -  देश-विदेशामधील वाहन उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बजाज ऑटो उद्योग समूहाच्या आकुर्डी उद्योगातील १८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘बजाज-अर्पण’ समूहाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य-सुरक्षा, सामाजिक विकास तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी पुढाकार घेतला आहे. ‘बुलंद भारत की नई तस्वीर’ घडविण्यासाठी ‘बजाज-अर्पण’चे स्वयंसेवक समर्पित भावनेने सहकुटुंब पुढे येत आहेत.  

दोन वर्षांपूर्वी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत आकुर्डी प्रकल्पातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाकडे नाव नोंदणी केली होती. त्यामधूनच हा समूह आकाराला आला. व्यवस्थापक (संशोधन व विकास) चंद्रकांत चौधरी म्हणाले, ‘‘उद्योग समूहाचे संस्थापक-अध्यक्ष राहुल बजाज, व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज आणि जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे (जेबीजीव्हीएस) अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी, सरव्यवस्थापक पंकज बल्लभ (समाजसेवा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली समूह कार्यरत आहे. ‘जेबीजीव्हीएस’च्या अंतर्गतच उपाध्यक्ष व्ही. रमेश यांच्या नेतृत्वाखाली या समूहाची मध्यवर्ती समिती स्थापन झाली असून, पर्यावरण संवर्धन, आरोग्य-सुरक्षा, सामाजिक विकास आणि शिक्षण क्षेत्रात आम्ही काम करत असून शनिवारी-रविवारी स्वयंसेवक सामाजिक कार्य करतात.’’

या समूहाच्या माध्यमातून घोरवडेश्‍वर आणि पुण्यातील वारजे टेकडीवर देशी वृक्षांची लागवड करून तिची जोपासना केली जात आहे. खडकवाडी येथील शाळेत मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधली आहेत. खडकवाडी, टाकवे खुर्द, अवसरी, कडुस येथे ग्रंथालयांचे काम पूर्ण झाले आहे. तेथील शिक्षकांना आवश्‍यक प्रशिक्षणही दिले जाते. लोणावळा येथील संपर्क बालकाश्रमातील दीडशे मुलांना जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या आदी वस्तू दिल्या आहेत. दरवर्षी दिवाळी-दसऱ्याला महिला बचत गटाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. तसेच गंगापूर, खडकवाडी, कडुस, गावडेवाडी, अवसरी येथील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेतले. जुने कपडे जमा करून गरजूंपर्यंत पोचविण्याचेही काम समूह वर्षभर करते.

व्याप्ती वाढणार
बजाज अर्पणच्या कार्यांसाठी ‘रूम टू रीड’, ‘भूमी’, ‘गुंज’, ‘गुडविल’, ‘व्हिजन स्प्रिंग इंडिया’ आदी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जात आहे. भविष्यात बजाज उद्योगसमूहाच्या वाळूंज (औरंगाबाद), पंतनगर (उत्तराखंड) आणि चाकण प्रकल्पातही समूहाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com