esakal | जळगावमधील अपघातग्रस्तांना भागवत बंधूंची 3 लाखांची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

accident

जळगावमधील अपघातग्रस्तांना भागवत बंधूंची 3 लाखांची मदत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

येवला : माणूसकी शून्य आणि माणूस स्वार्थी होतोय असे म्हणत असाल तर ते परिपूर्ण खरेही नाही.याची साक्ष दिलीय श्री नारायणगिरी महाराज फौंडेशनचे सर्वेसर्वा भागवत बंधूनी...परक्या भागात अपघात होऊन पैशांअभावी उपचारासाठी अडलेल्या जळगाव जिल्ह्यातील भादली येथील भाविकांना तब्बल तीन लाखांची मदत देत त्यांना जीवदान दिले आहे.  

जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक येथील सुमारे १५ भाविक तिरुपती बालाजीच्या दर्शनाला २१ जूनला गेले होते. त्यांच्या खाजगी टेम्पो ट्रॅव्हल्सला तिरुपतीजवळील थिरूवेंलूर या गावाजवळ एक कंटेरने धडक दिल्याने जोरदार अपघात झाला होता.यातील ५ भाविक जखमी झाले मात्र सर्वसामान्य शेतकरी असलेल्या विनायक कोळी (वय -३८) यांच्या डोक्याला जबर मार लागला.चेन्नईतील श्री रामचंद्र हॉस्पिटल प्रशासनाने उपचारासाठी २ लाख रुपये जमा करण्याची गळ घातली. त्यातच सोबत पैसे नाही व परिस्थिती बेताची असल्याने या भाविकांना काय करावे अशी चिंता सतावू लागली.

कोळी यांना केवळ २ एकर कोरडवाहू जमीन असून पत्नी कल्पना व दोन मुलांसह बेताच्या आर्थिक परिस्थितीत जगताय.मित्रांच्या ग्रामस्थांच्या आग्रहास्तव ते पत्नीसह तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले पण नियतीने असा सूड उगवला.

याच दरम्यान जळगाव येथील जिल्हा पोलिस पथकातील सहाययक पोलीस निरीक्षक मिलिंद केदार यांना अपघाताची माहिती समजली.त्यांनी तत्काळ नासिक येथील श्री नारायनगिरी महाराज फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भागवत यांच्याशी संपर्क करत घटनेची माहिती दिली. ओढवलेले संकट व बेताची परिस्थितीचा विचार करता कोळी यांच्या मदतीची भावना विष्णू भागवत व येथील पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत या बंधूंच्या मनात जागी झाली.त्यांनी तत्काळ रामचंद्र हॉस्पिटलच्या बँक अकाउंटवर २२ जूनला २ लाख तर २६ जूनला १ लाख १० हजार रुपये जमा केले.यामुळे हॉस्पिटलने उपचार सुरु केले आणि आज कोळी यांची तब्बेत ठणठणीत असून त्यांना भागवत बंधूच्या रूपाने जणू 'बालाजी'च पावल्याचे आता सगळेच म्हणत आहेत.

“आम्ही केवळ समाज कार्यासाठी फौंडेशनची स्थापना केली आहे.कोळी यांच्या जीवावर प्रंसग बेतल्याने पोलीस अधिकारी केदार यांनी माहिती देताच आम्ही ३ लाख रुपयांची मदत दिली.वेळेत मदत व उपचार मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाल्याने अवर्णनीय समाधान मिळालेय.”
-विष्णू भागवत,
अध्यक्ष, नारायणगिरी महाराज फौंडेशन

loading image