#Lockdown2.0 : ...त्याने मुलांची भूक भागवून केले ‘बर्थ डे सेलिब्रेशन’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

गिफ्ट म्हणून दुधाच्या बाटल्या...
निवारागृहांतील सगळ्या मुलांना रोज दूध आणि खाऊ देणार आहोत. त्यामुळे रचितचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला आणि त्याला गिफ्ट म्हणून दुधाच्या बाटल्या आणि या मुलांसाठीची खेळणी आणली आहे. त्यातून निवारागृहातील मुलांना रोज सकाळी आठ आणि सायंकाळी सात वाजता दूध दिले जाणार आहे, असे रचितचे वडिल विशाल यांनी सांगितले.

पुणे - रस्त्यांवर राहणाऱ्या मात्र आता वेगवेगळ्या निवारागृहांत असलेल्या ५८ बाळांना रोज दूध पुरविण्यासाठी बारा वर्षांच्या रचितने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या बाळांना निवारागृहांत दूध, बिस्किटे आणि खाऊ मिळणार आहे. त्यांची रोजची भूक भागवून रचित आपला वाढदिवस साजरा करणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रचित सिंबायोसिस स्कूलमध्ये सहावीत आहे. त्याचा वाढदिवस दरवर्षी जोरात साजरा होतो. मात्र, यंदा कोरोनामुळे ‘बर्थ डे सेलिब्रेशन’ न करण्याची भूमिका रचितच्या कुटुंबियांनी घेतली आहे. ते रचिनेही समजून घेतले. रस्त्यांवर वस्तू विकून पोट भरणाऱ्या मात्र, आता निवारागृहांत असलेल्या कुटुंबांतील सहा वर्षांपर्यंतच्या बाळांना दूध आणि खाऊ पुरविण्याचा निर्णय रचितचे आई-बाबा विशाल आणि रुपाली अगरवाल यांनी घेतला आहे. 

ही मुले रात्री-अपरात्री दूध पिण्याचा हट्ट धरतात. त्यांना पोटभर दूध मिळावे, यासाठी निवारागृहांत रोज सकाळी-सायंकाळी दूध देण्याची व्यवस्था रचितच्या आई-बाबांनी केली आहे. त्यासाठी खास दुधाच्या बाटल्या, ज्यामध्ये दूध खराब होणार नाही, ते गरम राहू शकेल, अशी व्यवस्था केली आहे. यासाठी विक्रेता नेमून रोज दहा लिटर दूध पुरविणे सुरू केले आहे. तसेच, या मुलांना बिस्किटे आणि खेळणीही दिली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: birthday celebration with child help by rachit agarwal humanity initiative