रक्तदानाला कर्तव्य मानणाऱ्या जागरूक ‘सुश्‍मिता’!

राजेश सोनवणे
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

‘सिव्हिल’मध्ये दीड वर्षांपासून रक्‍तदान
रक्‍तदानातून रुग्णाचे प्राण वाचतात, याचा आनंद प्रत्यक्ष अनुभवता येतो. यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून दर तीन महिन्यांनी स्वतः जाऊन किंवा संपर्क झाल्यास रक्‍तदानाचे कार्य सुश्‍मिता करीत आहेत. रक्‍तदानाची सुरवात त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षांपासून केली. सुरवातीला ठिकठिकाणी आयोजित शिबिरात जाऊन रक्‍तदान केले; परंतु दीड वर्षांपूर्वी सुश्‍मिता यांचा मित्र संदीप रायपुरे यांचे नातेवाईक असलेल्या बावीस वर्षीय तरुणाचे वजन कमी झाल्याने तब्येत बिघडली होती. त्याला रक्‍ताची आवश्‍यकता असताना संदीप रायपुरे यांनी सुश्‍मिता यांना फोन करून रक्‍तदानाबाबत सांगितले. त्यावेळी सुश्‍मिता व त्यांचे पती यांनी दोघांनी ‘सिव्हिल’मध्ये रक्‍तदान करून त्या युवकाचे प्राण वाचविले होते. त्यावेळपासून हे कार्य नियमितपणे सुरू आहे.

जळगाव - रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते; परंतु नियमित रक्‍तदान करणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. त्यातही महिला रक्तदात्या अगदी नगण्यच आहेत. मात्र, याला अपवाद ठरलीय एक जागरूक महिला. गरीब, गरजू रुग्णाला उपयुक्त ठरेल म्हणून दर तीन महिन्यांनी रक्तदान करणाऱ्या सुश्‍मिता भालेराव या रक्तदानाला कर्तव्यच मानतात. 

रक्‍तदान केल्यानंतर आपल्यामुळे रुग्णाचे प्राण वाचविणे खूप मोठे मानले जाते. शहरात रक्‍तपेढ्या असल्या तरी बऱ्याचदा रुग्णांना त्याच्या गटातील रक्‍त मिळू शकत नाही किंवा त्यासाठी खूप फिरावे लागत असते. अशा स्थितीत रक्‍त उपलब्ध होण्यासाठी गटानुसार रक्‍तदात्यांची यादी जवळपास सर्वच रक्‍तपेढ्यांमध्ये आहे. रुग्णांसाठी दातेदेखील लागलीच धावून येतात. यात पुरुषांची संख्या अधिक आहे. कारण हिमोग्लोबिनचा त्रास लवकर जाणवत असल्याच्या भीतीमुळे महिलावर्ग यात पुढाकार घेत नाही; परंतु, याला सुश्‍मिता विश्‍वास भालेराव या अपवाद ठरल्या आहेत. श्रीमती भालेराव या गरीब रुग्णांसाठी दर महिन्यांनी रक्‍तदान करतात.

जिल्ह्यातील एकमेव महिला
रक्‍तदान करण्यात महिलांचा देखील सहभाग असतो; पण तो शिबिरापुरता किंवा रक्‍तपेढीतून संपर्क झाल्यापुरता मर्यादित असतो. परंतु, ‘जिंदगी फाउंडेशन’च्या अध्यक्षा असलेल्या सुश्‍मिता या जिल्हा रुग्णालयात दर तीन महिन्यांनी रक्‍तदान करणाऱ्या जिल्ह्यातील एकमेव आहेत. संस्था चालवत असताना संस्थेच्या नावाप्रमाणे रुग्णाला जिंदगी (आयुष्य) देण्यासाठी रुग्णालयाच्या रक्‍तपेढीत रक्‍तदान करून गरिबांना कमी दरात ते उपलब्ध होते. शिवाय रक्‍तदान केल्यानंतर मिळालेल्या कार्डाच्या साहाय्याने ते गरीब रुग्णाला मोफत उपलब्ध होते.

जळगावच्या जिल्हा रुग्णालयात नियमितपणे रक्तदान करते. याचा अभिमान आणि आनंदही आहे. एका गरजूला माझे रक्त कामी येते. शिवाय, माझ्या कार्डामुळे त्याचे चारशे रुपये देखील वाचतात. 
- सुश्‍मिता भालेराव, रक्तदात्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blood Donation Duty Sushmita Bhalerao Initiative