बोन्साय मास्टर काळे यांचे गिनेस रेकॉर्ड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

पुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली. 

पुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली. 

राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, वन खात्याचे सचिव विकास खर्गे, उद्योग विभागाचे उपसचिव संजय इंगळे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार, डॉ. के. एच. संचेती, उद्योजक गिरिधारी काळे या वेळी उपस्थित होते. प्राजक्ता काळे यांनी पुणे जिल्ह्यातील परंदवडी येथे तीन हजार ३३३ बोन्साय झाडांचा जगातील मोठा संग्रह केला आहे. यापूर्वी म्हैसूर येथील गणपती सच्चिदानंद यांनी २०१६ मध्ये दोन हजार ६४९ बोन्साय झाडांच्या प्रदर्शनाचे रेकॉर्ड केले होते. बोन्सायमधील एवढा मोठा संग्रह करणाऱ्या त्या पहिल्या महिला तज्ज्ञ आहेत. 

मुनगंटीवार म्हणाले, ‘‘बोन्सायचा समावेश महाराष्ट्र शासन कौशल्य विकास योजनेमध्ये करणार असून, त्याबाबत अभ्यासक्रम तयार करण्यात येईल. तसेच, रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला जाईल.’’ या वेळी पवार, खर्गे, डॉ. संचेती, मणियार आणि इंगळे यांनी काळे यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. 

गिरिधारी काळे प्रास्ताविकात म्हणाले, की बोन्साय कला जपान-चीनमधील असल्याचे मानले जात होते. पण, भारतात ही ‘वामनवृक्ष कला’ या नावाने प्रसिद्ध होती.

ज्या क्षेत्रात मनापासून काम केले, त्यात जागतिक दर्जाचे अव्वल स्थान मिळाल्याचा खूप आनंद आहे. आजपर्यंत मी एकही बोन्साय विकलेले नाही. पण, या कलेतून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी यापुढेही काम करणार आहे. 
- प्राजक्ता काळे, बोन्साय मास्टर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bonsai Tree grinich record Prajakta Kale