बंडगर वस्ती शाळा ठरली "रोल मॉडेल' 

सचिन गुरव 
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

मानांकनात दूरगामी परिणाम 
आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग (एआयएल) हे अभियान मुलांना खेळातून, कलेतून आनंददायी शिक्षण मिळावे, मुले आनंदी राहावीत, या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. अशा शाळांमुळे शैक्षणिक स्थिती भक्कम होऊन देशाचे शैक्षणिक मानांकन वाढेल. 
- डॉ. पवन सुधीर 

सिद्धटेक - बंडगर वस्तीशाळा (ता. कर्जत) कलात्मक शिक्षणामुळे देशपातळीवर झळकत आहे. आनंददायी शिक्षणामुळे ही शाळा शैक्षणिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहे. देशात अवघ्या अकराच शाळा रोल मॉडेल आहेत. त्यात बंडगर वस्ती शाळेचा समावेश झाला आहे. "एनसीईआरटी'च्या अधिकाऱ्यांनी नुकतीच शाळेची तपासणी करून तसे शिक्कामोर्तब केले. बंडगर वस्ती शाळेतील उपक्रम देशातील इतर शाळांमध्ये राबविले जाणार आहेत. 

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) ही शिक्षण विभागाची देशातील सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेने बंडगरवाडीची दखल घेतली आहे. शाळेतील विक्रम अडसूळ यांना आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कामाची "एनसीईआरटी'च्या प्रा. डॉ. पवन सुधीर यांनी भेट देऊन पाहणी केली. बंडगरवस्तीसारखा "कलात्मक शिक्षण' उपक्रम देशातील केवळ अकरा शाळांमध्ये राबविला जातो, असे त्यांनी सांगितले. शाळेच्या परिस्थितीचा वर्णनात्मक अहवाल तयार केला आहे. तो केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाला सादर करण्यात येईल. तेथील निष्कर्षानंतर हा "पॅटर्न' देशभरात राबविला जाईल, असेही ते म्हणाले. तसे झाल्यास एका वाडीतील शाळा देशाच्या शिक्षणास दिशा देईल. 

बंडगर वस्ती ही आता आडवळणाची शाळा राहिली नाही. तिचे भवितव्य उज्ज्वल आहे. आम्ही फक्त आमचे काम करीत आहोत. शाळेच्या विकासात विद्यार्थी व ग्रामस्थांची साथही मोलाची आहे. 
- विक्रम अडसूळ व कविता बंडगर, शिक्षक 
 

 

मानांकनात दूरगामी परिणाम 
आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग (एआयएल) हे अभियान मुलांना खेळातून, कलेतून आनंददायी शिक्षण मिळावे, मुले आनंदी राहावीत, या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. अशा शाळांमुळे शैक्षणिक स्थिती भक्कम होऊन देशाचे शैक्षणिक मानांकन वाढेल. 
- डॉ. पवन सुधीर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bundgar town school roll model