#ThursdayMotivation नारीशक्तीला कर्तृत्वाची जोड

Kavya-Ladkat
Kavya-Ladkat

क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये प्रामाणिकता, जिद्द, पुढे जाण्याची ताकद आणि अपार कष्ट घेतले की जीवनाला सुवर्ण झळाळी लाभल्याशिवाय राहत नाही. पुणे शहरातील प्रसिद्ध लडकत ब्रदर्स सर्व्हिस स्टेशन (पंप)च्या प्रमुख काव्या मनीष लडकत यांनी आपल्या कामातून यश प्राप्त झाल्याचे दाखवून दिले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःच्या नावाचा झेंडा उभारलेल्या काव्या लडकत मूळच्या मुंबई येथील. परंतु, १९९५ मध्ये मनीष लडकत यांच्याशी विवाह करून त्या पुणे शहरामध्ये स्थायिक झाल्या. पतीचा व्यवसाय पेट्रोल पंप असल्याने त्या गृहिणी म्हणूनच जगत होत्या. मात्र, २०१४ मध्ये पती आजारपणामुळे खूप दिवस हॉस्पिटलमध्ये होते. या वेळी त्यांनी पतीकडून व्यवसायाचे धडे घेतले. तसेच, या वेळी त्यांना त्यांचा व्यवसाय, घर आणि विशेष म्हणजे त्यांचा मुलगा पार्था हा दहावीची परीक्षा देत होता. ही तीनही कामे एका वेळी येऊन ठेपली होती. असे असूनही पार्थाला दहावीला (CBSE ) ९३% गुण पडले. मात्र, पतीचा आजार बरा न झाल्याने त्यांचे निधन झाले आणि दुःखाचा डोंगर कोसळला. तोच दुःखाचा डोंगर सावरत त्या आता आत्मविश्वासाने पेट्रोल पंप चालवणारी एकमेव महिला म्हणून पुणे शहरामध्ये ओळखली जाऊ लागली आहे.

कुटुंबासाठी  पडल्या घराबाहेर
पार्था हा त्यांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या शिक्षणासाठी तसेच पतीचा असणारा पेट्रोल पंप हा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागले. परंतु, अनेक वर्षे गृहिणीच असल्याने या व्यवसायाचे व्यवस्थापन करणे फार कठीण जात होते. कारण, पेट्रोल पंप हा व्यवसाय पुरुषप्रधान असल्याने त्याचा त्यांना त्रास होत होता. याचे कारण राजकारणी, स्थानिक गुंड तसेच उधारी वसूल करणे कठीण होत होते. मात्र ‘यामध्ये मी जिंकणारच’ यावर त्यांचा नेहमीच विश्वास होता. याच उद्देशाने पेट्रोल पंप व्यवसाय सुरूच ठेवला आणि त्याचे श्रेय म्हणून पेट्रोल डीलर्स असोसिएशन पुणे येथे सचिव म्हणून त्यांची निवड झाली.

कोर्टाची पायरी लागली चढायला
व्यवसाय करीत असताना त्या घराचा मुलगा बनल्याने त्यांच्याच नातेवाइकांनी मालमत्तेसंदर्भात टाकलेल्या खोट्या केसेसला त्या धाडसाने सामोऱ्या गेल्या. कोर्टाची कोणतीही माहिती नसताना त्यांना कोर्टात पाऊल ठेवावे लागले. या वेळी त्यांचे सासरे प्रभाकर लडकत यांनी या केसबाबत वेळोवेळी माहिती दिली, तसेच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मोठ्या धाडसाने व असत्य मार्गाने दाखल केलेल्या खोट्या केसही जिंकून दाखविल्या आणि आपली हक्काची प्रॉपर्टी मिळवली.

मुलगा पार्था सदैव पाठीशी 
मुलगा पार्था हा त्यांच्याबरोबर सदैव शक्ती आणि आधार म्हणून उभा राहत आहे. पुढे जाण्यासाठी त्याने नेहमीच प्रोत्साहन दिले व देत आहे. झाशीच्या राणीप्रमाणे त्या फक्त लढत राहिल्या. त्यामुळेच त्यांनी आता यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्यामुळे मुलालाही त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही, तसेच त्याला आदर्श व्यक्ती म्हणून समाजापुढे आणण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. सध्या तो कॅनडा येथे उच्च शिक्षण घेत आहे. व्यवस्थापक जयवंत सुरवशे त्यांच्या मोठ्या भावासारखे नेहमी मागे उभे राहत आले आहेत व भविष्यातही राहतील, यात शंका नाही. त्याचप्रमाणे प्रशांत काकडे यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्या विविध एनजीओबरोबर काम करतात आणि लवकरच स्वत:ची एनजीओ योजना आखत आहे. 

असे वाटते की, विश्व त्यांना प्रत्येक वेळी अपराजित ठेवून त्यांचे समर्थनच करीत आहे. आपल्या दैनंदिन जीवनात कितीही संकटाचा सामना करावा लागला, तरीसुद्धा आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे आणि आपण कधीही निराश होऊ नये. त्याऐवजी आत्मप्रेरित व अपराजित राहू नये, असा त्यांचा दृढविश्‍वास आहे.सध्या समाज त्यांच्याकडे सामाजिक, व्यावसायिक रोल मॉडेल म्हणून पाहत आहे. पूर्वी त्यांना जगाकडे जावे लागायचे; आता जग त्यांच्या कामामुळे त्यांच्याकडे येऊ लागले आहे. ही एक कष्टाचीच पावती म्हणावी लागेल. आगामी काळात त्यांनी वचन दिले आहे की, त्या यशाचा मार्ग न थांबता पूर्ण करणार आणि हे जग त्यांना ‘काव्या’ म्हणून नेहमी ओळखत राहील, यात तिळमात्र शंका नाही.
(शब्दांकन - महादेव पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com