esakal | फुलपाखरे येती दारी 
sakal

बोलून बातमी शोधा

pratik-more

प्रतीकच्या घराभोवती पिंगा घालणारी फुलपाखरं हा परिसरातील अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो आहे. फुलपाखरांच्या अधिवासासाठी अनुकूल ठरणाऱ्या वनस्पती प्रतीकने घराभोवती लावल्या आहेत.  

फुलपाखरे येती दारी 

sakal_logo
By
नीला शर्मा

कोकणातील संगमेश्वर तालुक्‍यातील देवरुख गावातल्या प्रतीक मोरेच्या घराभोवती फुलपाखरांची वर्दळ असते. प्रतीकने त्यांच्या संवर्धनासाठी अनुकूल झाडं लावली आहेत. या अधिवासातील फुलपाखरांचं निरीक्षण, नोंदी, छायाचित्रण, चित्रफिती वगैरेमध्ये प्रतीक गढलेला असतो. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रतीकच्या घराभोवती पिंगा घालणारी फुलपाखरं हा परिसरातील अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो आहे. फुलपाखरांच्या अधिवासासाठी अनुकूल ठरणाऱ्या वनस्पती प्रतीकने घराभोवती लावल्या आहेत. तो म्हणाला, ""सह्याद्री पर्वतरांगेजवळील देवरुख गाव म्हणजे मुबलक जैवविविधतेचा भाग. गेल्या काही वर्षांत मात्र इथली समृद्ध जैवविविधता धोक्‍यात आली आहे. तिच्या संदर्भात फारसा अभ्यास तसंच नोंदी फारशा उपलब्ध नाहीत. मित्रांबरोबर इथल्या देवालयांमध्ये भटकंती करताना लक्षात आलं की, महाधनेशसारखे इथले कित्येक पक्षी व फुलपाखरंही प्रदेशनिष्ठ आहेत. यांच्या नोंदी ठेवण्यासाठी आम्हाला आढळणाऱ्या प्रजातींची छायाचित्रं काढून ती समाजमाध्यमात प्रसारित करू लागलो.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रतीकने असंही सांगितलं की, फुलपाखरांचं सर्वेक्षण केलं, तेव्हा जाणवलं की, सुमारे दीडशे प्रकारच्या प्रजाती निव्वळ फुलपाखरांच्या आहेत. मात्र त्या सर्वांच्या नोंदी राष्ट्रीय पातळीवरील अधिकृत माहितीकोशात नाहीत. त्यानंतर घराभोवती फुलपाखरांना पोषक अशी बाग उभी केली. सोनचाफा, उंबर, लिंबू अशी काही झाडं फुलपाखरांसाठी "होस्ट प्लॅंट्‌स' ठरतात. यावर फुलपाखराच्या मादीने घातलेल्या अंड्यांमधून बाहेर येणाऱ्या अळ्यांना उपयुक्त अन्नपुरवठा होतो. अळी, सुरवंट व नंतर पूर्ण वाढून कोशातून बाहेर येणारं फुलपाखरू या अवस्थांसाठी ही झाडं लागतात. याचप्रमाणे उडणाऱ्या फुलपाखरांना जीवनक्रम चालवण्यासाठी मधुरस पुरवायला पॅगोडा फ्लॉवर, तगर, घाणेरी यांसारख्या झाडांची गरज असते. मी ही झाडं तीन वर्षांपूर्वी घराभोवती लावली. हळूहळू फुलपाखरांची संख्या वाढत इथं त्यांचा अधिवास निर्माण झाला. आपण रानात फुलपाखरांच्या मागं धावण्यापेक्षा त्यांनाच आपल्या दारी आणूया असं ठरवलं. आता त्यांचं मनसोक्त निरीक्षण, अभ्यास, नोंदी व छायाचित्रणाचा आनंद घेतो आहे. आमच्या भागात खवले मांजराची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. ती रोखण्यासाठी जनजागृती आणि शिकाऱ्यांना उपजीविकेसाठी मधुमक्षिका पालन, रानमेवा आणि वनौषधींच्या माध्यमातून मार्ग शोधण्याची धडपड चाललेली आहे. बिबटे, रानगवे आदी वन्यप्राणी वस्तीत शिरकाव करत असल्याने माणूस आणि वन्यजीवांदरम्यान निर्माण झालेला संघर्ष मिटविण्याचे उपायही मित्राबरोबर शोधत आहे.