esakal | झोपडपट्टीतील सन्मार्गाचा दर्शक
sakal

बोलून बातमी शोधा

Cadbury Dairy Milk thanks to Amar Pol for his outstanding work

झोपडपट्टीतच तो लहानाचा मोठा झाला. त्यामुळं तिथल्या मुलांच्या वेदना त्याने जवळून अनुभवल्या. शिक्षणाबद्दलची अनास्था अन् गुन्हेगारीकडे वळणारी पावले त्याने डोळ्यांनी पाहिली. या मुलांना सन्मार्ग दाखविण्यासाठी त्याने अभ्यासिका सुरू केली. दोन दशकानंतरही अमर पोळ या तरुणाचा हा यज्ञ अव्याहतपणे सुरू असून, यातून झोपडपट्टीतील मुले घडत आहेत.

झोपडपट्टीतील सन्मार्गाचा दर्शक

sakal_logo
By
जाहिरात

 पुणे: झोपडपट्टीतच तो लहानाचा मोठा झाला. त्यामुळं तिथल्या मुलांच्या वेदना त्याने जवळून अनुभवल्या. शिक्षणाबद्दलची अनास्था अन् गुन्हेगारीकडे वळणारी पावले त्याने डोळ्यांनी पाहिली. या मुलांना सन्मार्ग दाखविण्यासाठी त्याने अभ्यासिका सुरू केली. दोन दशकानंतरही अमर पोळ या तरुणाचा हा यज्ञ अव्याहतपणे सुरू असून, यातून झोपडपट्टीतील मुले घडत आहेत.

अमरचे बालपण गुलटेकडी येथील झोपडपट्टीत गेले. आई घरकाम करायची. वडील रिक्षाचालक. प्रतिकूल परिस्थिती असतानाही अमरने प्रारंभी महापालिकेच्या व नंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण, तर गरवारे महाविद्यालयात पुढचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरू असतानाच अमरने साक्षरता अभियानात भाग घेऊन घराजवळच्या महिलांसाठी रात्रीचा वर्ग सुरू केला. या वर्गात कष्टकरी महिला दिवसभराची कामे, घरची कामे उरकून शिक्षण घेत होत्या. पुढे वस्तीमधील निरक्षरांना शिकविण्याची संधी त्याला मिळाली. मात्र हे काम एकट्याने करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्याने "इच वन-टीच वन'नुसार वस्तीमधील शाळेत जाणारे विद्यार्थी शोधले. त्यांना प्रशिक्षण देऊन अमरने त्यांच्यावर निरक्षर असणारे आपले आईवडील व शेजाऱ्यांना शिकविण्याची जबाबदारी दिली. या मुलांनीही हे काम मनापासून केले. हे काम करत असताना अमरचा वस्तीमधील मुलांशी संपर्क वाढला. त्यातून त्याला या मुलांच्या अडचणी लक्षात आल्या. 

मुलांना वस्तीमध्ये छोटी घरे असल्याने तसेच आजूबाजूचे वातावरण पूरक नसल्याने अभ्यास करायचा कसा, ही त्यांची सर्वांत मोठी अडचण होती. त्यातूनच या मुलांसाठी अभ्यासिका सुरू करण्याची संकल्पना त्याला सुचली. त्यानुसार त्याने वसाहतीमध्ये छोटीसी अभ्यासिका सुरू केली. झोपडपट्टीतील गोरगरिबांची मुले रात्री याच अभ्यासिकेत शिकू लागली. काही दिवसांनंतर जवळच्याच महापालिकेच्या एका शाळेत शिक्षण मंडळाच्या परवानगीने सायंकाळचे वर्गही त्याने सुरू केले. साक्षरता अभियानामध्ये काम केलेल्या स्वयंसेवकांसाठी सुरू केलेला हा वर्ग सार्वजनिक झाला आणि ज्याला अभ्यास करायचा आहे, त्याने यावे, असे स्वरूप त्याला आले.

गुलटेकडी परिसरात 1998 साली सुरू झालेल्या या उपक्रमाला 21 वर्षे होत आली. लॉकडाउनमुळे सध्या हे वर्ग बंद आहेत. आतापर्यंत एक हजाराहून अधिक विद्यार्थी या अभ्यासिकेतून बाहेर पडले आहेत. त्यातील अनेक जण चांगल्या हुद्द्यावर नोकरी करीत आहेत. दरवर्षी 50 नवे विद्यार्थी अभ्यासिकेशी जोडले जात आहेत आणि तेवढेच बाहेर पडतात. या अभ्यासिकेमुळे वस्तीमधील विद्यार्थी महाविद्यालयापर्यंत शिकू लागले आहेत. त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रांची ओळख होऊ लागली आहे. मनपाच्या शाळेतील मुलांना वाचन, लेखन कमी येते हा गैरसमज या अभ्यासिकेच्या मुलांनी खोटा ठरविला आहे.

 मुलांचे आयुष्य यातना आणि कष्टाने भरलेले आहे. माझी रोजची संध्याकाळी सहा ते रात्री दहा ही वेळ केवळ त्यांच्यासाठी असते. या मुलांना माझी गरज आहे. "एकच ध्यास आणि विद्यार्थी विकास' या ब्रीद वाक्यानुसार आम्ही कार्य करत आहोत - अमर पोळ
 

वर्षभर विविध उपक्रम

अभ्यासिकेचे आता बाल शिक्षण मंचमध्ये रूपांतर झाले आहे. अभ्यासिकेत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. शालेय साहित्यवाटप, विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, दीपोत्सव, आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा, पुण्याजवळील एका गावामध्ये निवासी उन्हाळी शिबिराचे आयोजन आदी उपक्रमांचा त्यात समावेश आहे.

loading image