दृष्टिहीनांसाठी प्रकाशाचे बेट

Cadbury Dairy Milk thanks to Rahul Deshmukh for his outstanding work
Cadbury Dairy Milk thanks to Rahul Deshmukh for his outstanding work

पुणे: उमलत्या वयातच त्याची दृष्टी गमावली. आईवडिलांनी खूप प्रयत्न करूनही यश आले नाही. ओढवलेल्या परिस्थितीने तो खचला नाही. जिद्दीने शिक्षण पूर्ण करून त्याने चांगली नोकरीही मिळविली; पण तिथपर्यंत पोचण्यासाठी आलेल्या अनंत अडचणीतूनच त्याच्यातला समाजसेवक जागा झाला. अंध, दिव्यांगांसाठी संस्था उभी करून त्यांच्यासाठी तो खऱ्या अर्थाने प्रकाशाचे बेट ठरला. या बेटाचं नाव आहे राहुल देशमुख.

नगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या राहुलची उमलत्या वयातच दृष्टी गेली. त्याची दृष्टी परत यावी म्हणून आईवडिलांनी जंगजंग पछाडले; पण उपयोग झाला नाही. स्वत:वर आभाळ कोसळले असतानाही राहुल खचला नाही. अंधत्व वाट्याला आलेले असतानाही त्याने पुण्यात शिक्षण घेण्याचे ठरविले. कोरेगाव पार्कमधील अंध मुलांच्या शाळेत त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले, ब्रेल लिपीचे धडे गिरविले. दहावीत 70 टक्के गुण मिळवून एसपी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला; पण तिथे राहण्याची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे दिवसा कॉलेज आणि रात्री झोपायला पुणे रेल्वे स्टेशन. तिथेही पोलिसांचा मार खावा लागायचा. पुढे उच्च शिक्षण घेताना तो कायम "टॉपर" राहिला.

उच्च शिक्षणानंतर त्याला नोकरी मिळाली. आपल्यासारखेच पुण्यात येणाऱ्या अंध, अपंगांचे काय होत असेल, हा प्रश्न त्याला कायम सलत होता. त्यातून त्याने "एनएडब्ल्यूपीएस' ही संस्था सुरू केली. त्याद्वारे त्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील अंध, अपंग मुलांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली. तसेच त्यांना चांगले शिक्षण, संगणक प्रशिक्षण देत स्पर्धेत टिकण्याची उमेदही दिली. राहुलच्या संस्थेतील अंध मुले-मुली विविध क्षेत्रांत कार्यरत असून, स्वत:च्या पायावर खंबीर उभ्या आहेत. तब्बल 21 वर्षांपासून स्वत: दृष्टी गमावलेल्या राहुलने त्याच्यासारख्या इतरांच्या आयुष्याला मात्र नवी "दृष्टी' दिली.

"स्नेहांकित' ही संस्था सुरू करून अनेक अडचणींवर मात करीत राहुलने मुलांच्या वसतिगृहासाठी कुमठेकर रस्त्यावरील महापालिकेच्या शाळेत जागा मिळविली. तिथेच 100 ते 150 अंध मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. तेथेच अंधासाठी संगणक प्रशिक्षण केंद्र, अपंगासाठी "एमएससीआयटी' अभ्यासक्रम सुरू केला.

वसतिगृहातील मुलांसाठी डिजिटल लायब्ररी, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षेची तयारी असे विविध उपक्रम त्याने राबविले. आतापर्यंत त्याच्या संस्थेतून 1650 मुले-मुली शिक्षण घेऊन बाहेर पडल्या. त्यापैकी बहुतांश जण सरकारी अधिकारी, खासगी कंपन्या, रेल्वे, बॅंकिंग अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. दुसरीकडे राहुलने बीएड, एमएसडब्ल्यू, एम फील व संगणकाशी संबंधित अनेक पदव्या घेतल्या. राहुलच्या या कामाची दखल घेऊन त्यास अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अभिनेते अमीर खान यांच्या हस्ते राहुलला "बजाज आलियांन्स सुपर आयडॉल' या पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.

दरम्यान, आयटी कॉर्पोरेट, खासगी, सरकारी क्षेत्रात काम करणारे तरुण-तरुणी त्याच्या संस्थेमध्ये आठवड्यात काही तास स्वयंसेवक म्हणून काम करू लागले. त्यातूनच कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या देवता अंदुरे या देखील स्वयंसेवक म्हणून काम करू लागल्या. देवता यांनी आपली मोठ्या पगाराची नोकरी सोडून राहुलसमवेत अंध, अपंगांसाठी काम करण्यास सुरुवात केली. पुढे दोघांनी लग्न करून संस्थेचा संसार सांभाळण्यास सुरुवात केली. दृष्टिहीन व दिव्यांग मुला-मुलींचे सक्षमीकरण करून त्यांची चांगली पिढी निर्माण करण्याचे स्वप्न राहुलने उराशी बाळगले असून, त्यासाठी त्याची निरंतर धडपड सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com