धन्यवाद शहाजी चव्हाण

जाहिरात
गुरुवार, 30 जुलै 2020

आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात आपल्याला असे अनेक लोक भेटतात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत वेगवेगळ्या मार्गाने मदत करीत असतात. कॅडबरी डेअरी मिल्क तुम्हाला असे क्षण दाखवेल की जेणेकरून जमिनीवर राहून केलेले हे उत्तुंग काम कधीच वाया जाणार नाही. शहाजी चव्हाण यांनी ज्या प्रकारे गरजूंना मदत केली त्याबद्दल कॅडबरी डेअरी मिल्ककडून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. 

पुणे: आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनात आपल्याला असे अनेक लोक भेटतात जे कोणतीही अपेक्षा न ठेवता सतत वेगवेगळ्या मार्गाने मदत करीत असतात. कॅडबरी डेअरी मिल्क तुम्हाला असे क्षण दाखवेल की जेणेकरून जमिनीवर राहून केलेले हे उत्तुंग काम कधीच वाया जाणार नाही. शहाजी चव्हाण यांनी ज्या प्रकारे गरजूंना मदत केली त्याबद्दल कॅडबरी डेअरी मिल्ककडून त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. 

ऊसतोड मजूर ते दिव्यांग मुलींचे संगोपन करणारा सामाजिक कार्यकर्ता असा शहाजी चव्हाण यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. दिव्यांग-विकलांग मुलांचे जन्मदात्यांनाही ओझं वाटावं; पण अशा मुलांचे मायबाप बनून शहाजी चव्हाण त्यांना मायेचा घास भरवताहेत. ऊसतोड मजूर म्हणून राबणाऱ्या त्यांच्या हातांनी समाजसेवेचा वसा घेतला अन्‌ तोच त्यांचा श्‍वास बनलाय. शहाजी चव्हाण यांचा जन्म पानगाव (ता.कळंब, जि.उस्मानाबाद) येथील एका सामान्य कुटुंबात झाला. कुटुंबाला केवळ तीन एकर शेती होती. तिघे भावंडे असल्याने घरात दोनवेळचे जेवण मिळण्यासाठी रोजंदारीचा आधार घ्यावा लागत होता.

घरच्या गरिबीमुळे ते वडील-भावांबरोबर ऊसतोड मजूर म्हणून काम करायचे. त्यातही त्यांनी हार मानली नाही. ऊसतोडणीवर जास्त पैसे मिळत असल्याने एक वर्षभर ऊसतोडणी मजूर म्हणून काम केले. आलेल्या पैशातून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यासोबतच पुढील शिक्षण, रोजगाराच्या संधी शोधत पूर्ण केले. त्याचवेळी एका बालविकास संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांना समाजकार्याची गोडी निर्माण झाली. आपल्यापेक्षा खडतर जिणे नशीबी आलेल्या मुलांचे जीवन बदलण्याच्या निर्धाराने त्यांनी स्वतःची संस्था तयार केली. त्यातून बालकांचे संगोपन सुरू केले.
त्यासोबतच स्वाधार प्रकल्पाअंतर्गत मतिमंद मुलींचे संगोपन करण्याचा प्रकल्प सुरू केला.

दिव्यांग मुलींचा हा प्रकल्प कायम सुरू ठेवत त्यांच्यासाठी आळणी (ता. उस्मानाबाद) येथे संस्थेच्या नावे जमीन घेऊन सुसज्ज इमारत उभी केली आहे. पाच ते सहा मुलींवर सुरू केलेल्या या संस्थेत आता 105 मुली आहेत. या सर्व मुलींसाठी चव्हाण मायबाप बनले आहेत. संस्थेच्या परिसरात त्यांच्यासाठी सुंदर फळबाग फुलवितानाच विविध प्रकारची खेळणीही चव्हाण यांनी बसवली आहे. या खेळणीचा पुरेपूर आनंद घेतानाच त्यातून या मुलींची बौद्धिक पात्रता वाढत आहे.

यातील बहुतेक मुली आता स्वावलंबी बनल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आकर्षक राख्या, इकोफ्रेंडली गणपती, विविध प्रकारच्या ज्वेलरी बनविल्या जातात. समाजापासून दुरावलेल्या मायेची उब देण्याचे काम शहाजी चव्हाण पार पाडीत आहेत. त्या मुलींच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम होत असल्याचा आनंद मोठा असल्याची त्यांची भावना आहे. 

सध्या स्वआधार प्रकल्पात १०५ मुली आहेत. यामध्ये त्यांच्या कार्यक्षमतेवरून वर्गवारी केली आहे. शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असणाऱ्यांची काही फारशी काळजी नसते. परंतु, काही मुली जन्मतः अधिकच विकलांग असतात. त्यांना सातत्याने हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागते. अनेक मुलींना पौष्टीक आहार देऊन त्यांची तंदुरुस्ती वाढविण्याचे काम प्रकल्पातील कर्मचारी आणि स्वतः शहाजी करतात. अनेक मुलीं स्वतःच्या हाताने जेवणही करू शकत नाहीत. देवाने जे दोन हात दिले आहेत, ते या मुलींसाठी आहेत, या भावनेतून चव्हाण स्वतः या मुलींना भरवतात.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cadbury Dairy Milk thanks to Shahaji Chavan for his outstanding work