कर्करोगाबाबत जागृतीसाठी जवानाची सायकल यात्रा

संजय राऊत
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

टेंभुर्णी - कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी माहोरा (ता. जाफराबाद) येथील सैन्यदलातील जवान गजानन काळे तब्बल १ हजार ४८० किलोमीटर अंतराची सायकल यात्रा काढणार आहेत. ओडिशातील बऱ्हाणपूर ते पुणे यादरम्यानच्या या सायकल यात्रेत ते नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. 

टेंभुर्णी - कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी माहोरा (ता. जाफराबाद) येथील सैन्यदलातील जवान गजानन काळे तब्बल १ हजार ४८० किलोमीटर अंतराची सायकल यात्रा काढणार आहेत. ओडिशातील बऱ्हाणपूर ते पुणे यादरम्यानच्या या सायकल यात्रेत ते नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. 

भारतीय सैन्यदलातील गजानन काळे यांच्या मातोश्री कलाबाई काळे यांचे कर्करोगाने निधन झाले होते. तेव्हापासून ते (कै.) कलाबाई काळे फाउंडेशनच्या माध्यमातून ते कर्करोगाबाबत जनजागृती करीत आहेत. येत्या ता. ३० नोव्हेंबरला ते सेवानिवृत्त होत आहेत. तर ता. दोन डिसेंबरपासून त्यांच्या सायकल यात्रेला सुरवात होणार आहे. ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील गंजम, श्रीकाकुलम, विजयनगरम्‌, विशाखापट्टणम्‌, ईस्ट गोदावरी, नलगौडा, हैदराबाद, संगरारेड्डी, बिदर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे असा श्री. काळे यांचा २३ दिवस प्रवास होणार आहे. विविध गाव-शहरांत त्यांचा मुक्काम राहील. दिल्ली येथील ग्रामीण स्नेह  फाउंडेशनच्या स्नेहा गंगा कुमार आणि त्यांचे पती भारतीय प्रशासन सेवेतील आधिकारी गंगा कुमार यांचेही सायकल यात्रेला सहकार्य लाभणार आहे. सायकल यात्रेसह एक व्हॅन असणार आहे. यातील संगणक, प्रोजेक्‍टरद्वारे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, अभिनेत्री मनीषा कोईराला, युवराजसिंग, स्नेहा गंगा कुमार यांनी कशा पद्धतीने कर्करोगावर मात केली याचे व्हिडिओ शाळा, कॉलेजामधून दाखविण्यात येणार आहेत. या पाच राज्यांतील हौशी सायकल क्‍लबसुद्धा श्री. काळे यांच्यासमवेत या यात्रेत सहभागी होणार आहेत. पुण्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत या सायकल यात्रेचा समारोप होईल, असे श्री. काळे यांनी सांगितले.

कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कर्करोगाबाबत जनजागृती करणे हा या यात्रेचा उद्देश आहे. या यात्रेसाठी अनेकांचे सहकार्य लाभत आहे. 
- गजानन काळे, सैनिक, माहोरा

समाजात कर्करोगाबाबत जनजागृती व्हावी, यासाठीचा सैन्यदलातील गजानन काळे यांचा संकल्प, उद्देश आणि तळमळ वाखाणण्याजोगी आहे. 
- विनोद कळंबे, अध्यक्ष, युगंधर प्रतिष्ठान, टेंभुर्णी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancer Public Awareness Jawan Gajanan Kale Cycle yatra