उमेदवारांसाठी जेवण, राहण्याची सुविधा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

नागपूर - रेल्वेच्या मेगाभरती परीक्षेसाठी देशभरातील उमेदवार उपराजधानीत दाखल होत आहेत. घरापासून शेकडो मैल लांब आलेल्या उमेदवारांना कुडकुडत्या थंडीत माणुसकीची ऊब देण्यासाठी मीणा समाज बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे. शेकडो उमेदवारांच्या राहण्याची व जेवणाची नि:शुल्क व्यवस्था संस्थेने केली आहे.

नागपूर - रेल्वेच्या मेगाभरती परीक्षेसाठी देशभरातील उमेदवार उपराजधानीत दाखल होत आहेत. घरापासून शेकडो मैल लांब आलेल्या उमेदवारांना कुडकुडत्या थंडीत माणुसकीची ऊब देण्यासाठी मीणा समाज बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे. शेकडो उमेदवारांच्या राहण्याची व जेवणाची नि:शुल्क व्यवस्था संस्थेने केली आहे.

उमेदवारांना घरच्यासारखे वातावरण मिळावे. या दृष्टीने समाजाने रामण विज्ञान केंद्राजवळील श्रीगुरुदेव सेवाश्रम भाड्याने घेऊन राहण्याची व्यवस्था केली आहे. दररोज अडीचशे ते तीनशे उमेदवार या सुविधेचा लाभ घेत आहेत. उमेदवारांना राहण्यासोबतच सकाळी नाश्‍ता, दुपारी व रात्री जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. रात्री उशिराही येणाऱ्या उमेदवारांचे स्वागत केले जाते.

मीणा समाज बहुउद्देशीय संस्थेचे जवळपास सर्वच सदस्य केंद्रीय कर्मचारी आहेत. नोकरी मिळविण्यासाठी त्यांनाही अशाच परिस्थितीतून जावे लागले होते. त्यांना आलेल्या अडचणींचा सामना या उमेदवारांना करावा लागू नये या भावनेतून ही व्यवस्था केली आहे. या उपक्रमामागे कोणताही स्वार्थ नसून उमेदवारांना नोकरी मिळून त्यांचे व कुटुंबाचे भविष्य सुरक्षित व्हावे  एवढाच हेतू आहे. धर्म, जात, संप्रदाय असा कोणताही भेद न करता हे सेवाकार्य सुरू असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मिश्रीलाल मीणा यांनी सांगितले.

मुलींसाठी घरीच व्यवस्था
परीक्षेसाठी बाहेरून येणाऱ्या तरुणी, युवतींसाठी समाज बांधवांनी त्यांच्या घरांची दारे उघडी ठेवली आहेत. दोन दिवसांत एकही महिला उमेदवार आली नाही. परंतु, बाहेरून येणाऱ्या मुलींना सुविधा व सुरक्षा देण्यासाठी समाजबांधव आणि त्यांचे कुटुंबीय तत्पर आहेत. समाजातर्फे देशभरातच अशाप्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. गरजूंना या सेवाकार्याची माहिती व्हावी यासाठी फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप यासारख्या सोशल मीडियाचा उपयोग केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Candidates for meals lodging facilities