बालगुन्हेगारांची पावले करिअरच्या दिशेने

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 8 जानेवारी 2019

उत्तमनगर - अनेक गुन्ह्यांत लहान मुलेदेखील असतात. त्यांच्याकडून अजाणतेपणी गुन्हे घडतात. भविष्यात त्यांच्या वाट्याला गुन्हेगाराचं जिणं येऊ नये, म्हणून उत्तमनगर पोलिस ठाण्याने पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन सुरू केले आहे.

उत्तमनगर - अनेक गुन्ह्यांत लहान मुलेदेखील असतात. त्यांच्याकडून अजाणतेपणी गुन्हे घडतात. भविष्यात त्यांच्या वाट्याला गुन्हेगाराचं जिणं येऊ नये, म्हणून उत्तमनगर पोलिस ठाण्याने पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी करिअर मार्गदर्शन सुरू केले आहे.

या पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांत २३ विधी संघर्षित (बालगुन्हेगार) मुलांचा समावेश आहे. बालसुधारगृहातून परतल्यावर पोलिस निरीक्षक अनघा देशपांडे, सतीश डहाळे, फौजदार के. के. कांबळे संबंधित मुले व त्यांच्या पालकांची एकत्रित बैठक घेतात. गुन्हेगारीचा शेवट कसा होतो, हे समजावून सांगतानाच ‘चांगले नागरिक म्हणजे काय, शिक्षण पूर्ण करा, त्यातून अनेक छोटे उद्योग-व्यवसाय, नोकरी करून करिअर घडवा,’ असे हे अधिकारी मुलांना मार्गदर्शन करतात. 

गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर मुलांना बालसुधारगृहात पाठविताना देशपांडे यांनी करिअरबद्दल मार्गदर्शन केले होते. यातील एका मुलाने १०वीचे शिक्षण पुढे सुरू ठेवले आहे. एक जण डिप्लोमाचा कोर्स करणार आहे. त्या दोघांसह सर्वांनी ‘आम्ही या चुकीच्या मार्गाला परत येणार नाही,’ असा निश्‍चय केल्याचे सांगितले. या मुलांसाठी देशपांडे मायेची सावली बनल्या आहेत.  या मुलांचे पालक मजूर, कामगार, किरकोळ व्यवसाय करणारे आहेत. पालक दिवसभर घरात नसल्याने मुलांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे ही मुले गुन्ह्यांकडे वळत असल्याची माहिती पुढे आली. चोरी, मारामारी असे हे गुन्हे असून, मौजमजेसाठी चोरी केली, तर काही जणांनी मोठ्या गुन्हेगारांच्या बरोबरीने राहून, त्यांचे ऐकून गुन्हे केले होते. दरम्यान, मोठे गुन्हेगार या बालकांना पुन्हा प्रवृत्त करीत असतील किंवा ही बालके पालकांचे ऐकत नसतील, तर त्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी पालकांना केले आहे.

गुन्ह्यातील बालकांचे पुढे काय होते, त्यांचे भावी आयुष्य कसे असेल माहीत नाही; परंतु त्यांच्यासाठी प्रयत्न करण्यास देशपांडे व त्यांच्या टीमने टाकलेले पहिले पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे.  

या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समुपदेशन, ग्रंथालय सुरू करणे, शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना संगणक शिक्षण देण्याची आमची योजना आहे. त्यासाठी परिसरातील विविध संस्थांची मदत घेणार आहोत. 
- अनघा देशपांडे, पोलिस निरीक्षक, उत्तमनगर पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Criminals steps towards career