विशेष मुलांसाठी पालिकेचे ‘मोबाईल टीचर’

आशा साळवी
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

पिंपरी - शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी महापालिकेने अकरा ‘मोबाईल टीचर’ नियुक्त केले आहेत. या विशेष शिक्षकांनी महापालिका क्षेत्रातील वाड्यावस्त्यांत पाहणी करून ६०१ दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध घेतला. या चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे गिरविण्यासाठी त्या मार्गदर्शन करीत आहेत.

पिंपरी - शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी महापालिकेने अकरा ‘मोबाईल टीचर’ नियुक्त केले आहेत. या विशेष शिक्षकांनी महापालिका क्षेत्रातील वाड्यावस्त्यांत पाहणी करून ६०१ दिव्यांग विद्यार्थ्यांचा शोध घेतला. या चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे गिरविण्यासाठी त्या मार्गदर्शन करीत आहेत.

या दिव्यांग विद्यार्थ्यांना किमान आठवीपर्यंतचे शिक्षण मिळावे, यासाठी केंद्र व राज्य सरकारतर्फे समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या प्रक्रियेत दिव्यांग, बहुविकलांग, अस्थिव्यंग, पोलिओग्रस्त, कर्णबधिर, वाचादोष, मतिमंद, दृष्टिदोष, अंशतः दृष्टिहीन, पूर्ण दृष्टिहीन, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न अशा २१ विविध व्याधिग्रस्त मुलांच्या शिक्षण हक्काचा गांभीर्याने विचार करण्यात आला. महापालिकेच्या शिक्षण विभागाने गेल्या वर्षी नियुक्ती केलेल्या विशेष शिक्षकांच्या माध्यमातून शहरातील शाळा, वाड्या वस्त्यांवर राहणारी अशी मुले शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. 

या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत ने-आण करण्यासाठी पालकांना मदतनीसभत्ता म्हणून दरमहा अडीचशे रुपयेप्रमाणे वर्षाला अडीच हजार रुपये देण्यात येतात. मुलांनाही २५० प्रमाणे प्रवासभत्ता दिला जातो.

‘सेरेब्रल’साठीही सुविधा
सेरेब्रल पाल्सी व बहुविकलांग गटातील ज्यांना शाळेत येणे शक्‍य नाही, अशा विशेष दक्षता आवश्‍यक असलेल्या मुलांना ‘फिरते शिक्षक (मोबाईल टीचर) सुविधा पुरविण्यात आली. शहरात सध्या अशी ७१ विशेष मुले आहेत. त्यांच्यापैकी दहा मुलांना ‘बेडरेस्ट’ आहे. अशा मुलांना शिक्षक आठवड्यातील ठराविक दिवशी दोन तास गणित, इंग्रजी, भाषा विषयाचे प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्या सृजनतेला वाव देण्याचा प्रयत्न करतात.

समावेशित शिक्षण उपक्रमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना विविध योजनेचा लाभ होतो. विशेष शिक्षक प्रत्यक्ष शाळेवर जाऊन अध्यापन करतात. त्याचबरोबर त्यांच्यासाठीच साहित्यही पुरवले जाते. 
- दत्तात्रेय खुटवड, समन्वयक, समावेशित शिक्षण उपक्रम

उन्हाळी शिबिर वर्ग
या विद्यार्थ्यांसाठी शाळाप्रवेशापूर्वी अध्ययन पूर्वतयारीसाठी वर्षातून एकदा उन्हाळी शिबिर वर्ग घेण्यात येतो. त्यानंतर शाळा सुरू झाल्यावर शिबिर घेऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यांच्या व्यंगाची नोंद घेत, शिक्षण विभागाकडून त्यांना आवश्‍यक शैक्षणिक साहित्यासह कॅलिपर, व्हीलचेअर, चष्मे यासह अन्य साहित्य दिले जाते.

२० केंद्रांत मिळते शिक्षण 
शहरातील पिंपळे गुरव, दापोडी, निगडी, थेरगाव, रहाटणी, वाकड, संत तुकारामनगर, काळेवाडी, भोसरी अशा २० केंद्रांत या मुलांना शिक्षण दिले जाते. सध्या या केंद्रातून बालवाडी ते बारावीपर्यंतच्या ३ हजार ११८ मुले शिकत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Education Municipal Mobile Teacher Municipal