नारळविक्रेता बनला निर्माता!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

चित्रपट बघण्याच्या वेडाने झपाटलेल्या नवनीत फोंडकेने मित्रांच्या मदतीने बनवलेला ‘तलाव’ शुक्रवारी प्रदर्शित होत आहे...

मुंबई - खारमध्ये वडिलोपार्जित नारळविक्रीचा व्यवसाय सांभाळता सांभाळता तो आवड म्हणून चित्रपट पाहायचा. शिक्षण, नारळांचे दुकान अन्‌ चित्रपटाची आवड अशी तिहेरी कसरत करताना आपणच चित्रपट काढायचा, असा विचार त्याच्या डोक्‍यात आला. प्रबळ इच्छाशक्ती आणि पॅशनच्या जोरावर त्याने मराठी ‘तलाव’ चित्रपटाची निर्मिती केली. या नारळविक्रेत्याचे नाव आहे नवनीत मनोहर फोंडके. शुक्रवारी (ता. १०) त्याचा चित्रपट प्रदर्शित होतोय.

नवनीतचे खारमध्ये नारळविक्रीचे छोटेसे दुकान आहे. नारळविक्रीतून त्याच्या कुटुंबाचा खर्च भागतो. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, अंकुश चौधरी आदी कलाकारांचे मराठी चित्रपट पाहून तो प्रभावित झाला आणि आपणही चित्रपटात काम करायचे, असे त्याने ठरविले. त्याची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याची चित्रपटसृष्टीत मुशाफिरी सुरू झाली. स्ट्रगल करता करता आता त्याने स्वतःच चित्रपट काढला. ‘तलाव’ नावाच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन जयभीम अनंत कांबळेने केले आहे. सौरभ गोखले, संजय खापरे, प्रियांका राऊत आदी कलाकारांनी त्यात काम केले आहे. ‘तलाव’ ही एक लव्ह स्टोरी आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सफाळे आणि उरणमध्ये झाले आहे. एकेक रुपया साठवून आणि हौसेमौजेला काहीशी मुरड घालून नवनीतने चित्रपटनिर्मितीची इच्छा पूर्ण केली आहे. 

दादांच्या मिमिक्रीने दिला विश्‍वास
नवनीत फोंडके म्हणतो, ‘खारमधील अनियोग विद्यालयात शिकत असतानाच मला मिमिक्री करण्याची आवड होती. एका कार्यक्रमात मी दादा कोंडके यांच्यासारखा आवाज काढला आणि सगळ्यांनी माझे कौतुक केले. तेव्हाच आपणही चित्रपटसृष्टीत जायचे आणि काहीतरी काम करायचे, असा निश्‍चय केला. दादांच्या मिमिक्रीने विश्‍वास दिला; मात्र मनासारखे काम मिळाले नाही. ‘भुताची शाळा’ चित्रपटात छोटी भूमिका केली. मित्र जयभीम कांबळेने मला ‘तलाव’ची कथा ऐकविली. ती कथा घेऊन आम्ही काही जणांना भेटलो; परंतु कुणीही दाद दिली नाही. मग आम्ही मित्रांनीच एकत्र येऊन चित्रपट बनविण्याचे ठरविले. आता आमचा चित्रपट प्रदर्शित होतोय त्याचा आनंद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coconut seller Became a producer