ग्रामविकासासाठी समाज कलश

शिवाजी आतकरी 
गुरुवार, 10 मे 2018

कलशात जेवढी रक्कम जमा होईल तितकीच रक्कम आम्ही दलाल कुटुंबीय टाकणार. गरज ओळखून समाजासाठी कायमस्वरूपी उपयोग होईल, असे काम करणार आहोत. 
- ॲड. प्रतिभा दलाल, प्रवर्तक, समाज कलश

निगडी - ग्रामीण भागातील वंचित घटकांशीसाठी ‘समाज कलश’ हा अभिनव उपक्रम प्राधिकरणातील प्रतिभा आणि अर्जुन दलाल या दांपत्याने सुरू केला आहे. 

ग्रामीण, दुर्गम भागातील समाजाला मूलभूत सुविधा मिळाव्यात या इच्छेने त्यांना ही संकल्पना सुचली. या संकल्पनेअंतर्गत ग्रामीण भागात सुसज्ज प्रयोगशाळा, विज्ञान कार्यशाळा, आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा, महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक साक्षरता, व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती, बाजारपेठेशी संलग्नता स्थापणे, ग्रामविकासासाठी आरोग्य शिबिरे, शेतीविषयक मार्गदर्शन, स्वच्छतागृह बांधणी, व्यसनमुक्ती, कृषी पर्यटन, जलसंवर्धनासाठी विहीर खोदाई, जलयुक्त शिवार प्रकल्प, वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ग्रंथालये आणि अभ्यासिका यांची उभारणी, असा सर्वांगीण ग्रामविकासाचा आराखडा त्यांनी तयार केला आहे. आपल्या वैयक्तिक योगदानाबरोबरच समाजातील प्रतिष्ठित आणि मान्यवर घटकांचा सहयोग या प्रकल्पासाठी लाभावा म्हणून त्यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत समाज कलश उपक्रमाला अनेकांनी भरीव योगदान दिले आहे.

या कार्यक्रमास ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे उपप्रमुख मनोज देवळेकर, ज्ञानप्रबोधिनी संचालक गिरीश बापट, आंतरराष्ट्रीय पखवाजवादक अनुजा बोरुडे, आंतरराष्ट्रीय स्तंभलेखक अनुपम कपिल, वास्तुविशारद उषा रंगराजन, नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेविका डॉ. गीता आफळे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Community Kalash for Rural Development