शेणाच्या पावडरीपासून कलात्मक वस्तूंची निर्मिती

शेणाच्या पावडरीपासून कलात्मक वस्तूंची निर्मिती

सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील यामिनी अंबीलवाडे यांनी आपल्या या आवडीचे रूपांतर व्यवसायात केले आहे. शेणापासून दिवे, कलात्मक व दैनंदिन गरजेच्या वस्तू, गणेश व लक्ष्मी मूर्ती आदींची कुशलपूर्ण निर्मिती त्यांनी केली आहे. कमी किंमतीत उपलब्ध केलेल्या या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. संपूर्ण कुटुंबाची या व्यवसायात साथ असून सुमारे १९ जणांसाठी त्यातून रोजगारनिर्मितीही झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हे माहेरघर असलेल्या यामिनी अंबीलवाडे नागपूर येथे राहतात. वकील नितीन अंबीलवाडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आवडीपोटी दोन देशी गायींचा सांभाळ हे कुटुंब करीत होते. देवलापार (जि. नागपूर) येथील गोविज्ञान संशोधन केंद्राशी नितीन यांचा संपर्क होता. एकेदिवशी या दांपत्याला केंद्राला भेट देण्याचा योग आला. तेथे तीन दिवसीय शिबिरात यामिनीताई सहभागी झाल्या. त्या वेळी भोपाळ येथील प्रशिक्षकाने शेण, गोमूत्रापासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती दिली. हेच प्रशिक्षण आयुष्याला कलाटणी देणारे ठरले असे यामिनीताई सांगतात. सुरेश ढवले, सुनील मानसिंहका यांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले. 

व्यवसायाची वाटचाल 
आपल्या गोसंगोपनाच्या आवडीचे रूपांतर यामिनीताईंनी व्यवसायात करायचे ठरवले. कारण केवळ पैसे कमावणे हा हेतू नव्हताच. तर देशी गोवंशाला चालना, पर्यावरण संवर्धन, ग्राहकांना किफायतशीर दरांत वस्तू उपलब्ध करणे असे विविध हेतू त्यांनी ठेवले. गायींची संख्या वाढविताना शेणापासून विविध उत्पादने तयार करण्यास सुरवात केली. पूर्वीपासूनच कलाकौशल्याची हातोटी जपल्याने कलात्मक वस्तू तयार करणे फार अडचणीचे गेले नाही. 

घरातील सर्वांचे योगदान 
सुमन गो उद्योग, मोर्शी या ब्रॅण्डखाली उत्पादनांची विक्री होते. अर्थात नोंदणी अद्याप केलेली नाही. यामिनीताईंना संपूर्ण व्यवसायात आई, पतीसह वहिनी प्रतीक्षा नगरकर, गिरीश, राम, शाम ही भावंडे व्यवसायात आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळतात. त्यातूनच व्यवसाय प्रगतिपथावर आहे. यामिनीताईंचे वडील निवृत्त पशुवैद्यक असल्याने ते वैद्यकीय जबाबदारी सांभाळतात. 

रोजगारनिर्मिती
व्यवसायाच्या माध्यमातून सुमारे १९ जणांना स्थानिक रोजगार उपलब्ध झाला आहे. हनुमान नगर येथे अनाथ मुलींचा आश्रम आहे. तेथील मुलींना या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार देण्याचेही प्रस्तावित आहे. त्यासाठी उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे. 

दूध, तुपाचीही किफायतशीर विक्री 
शेणापासून तयार केलेल्या सर्वच उत्पादनांच्या किंमती अत्यंत कमी वा रास्त ठेवल्या आहेत. त्याचबरोबर  देशी दूध देखील ७० रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते. त्याची दररोज सुमारे चार लिटरपर्यंतच विक्री होते. काही प्रमाणात ताक तर तूपही केवळ १२०० रुपये प्रतिकिलो दराने देण्यात येते.  

व्यवसाय दृष्टिक्षेपात प्रक्रियायुक्त शेणाचा वापर 
उत्पादनांच्या निर्मितीपूर्वी शेणातील पाणी वेगळे करण्यात येते. या प्रक्रियेला चार दिवस लागतात. त्यानंतर ते छोट्या गिरणीतून बारीक केले जाते. त्याचे जुने यंत्र १२ हजार रुपयांना खरेदी केले आहे. तयार झालेल्या पावडरपासून उत्पादने बनविली जातात.  

अन्य कलात्मक वस्तू 
की स्टॅंड, फोटो फ्रेम, पेन स्टॅंड, तोरण, फोटो हार, जपमाळ, की रिंग, छोटी कुंडी, डेकोरेटीव्ह माठ, तुपाचे दिवे.  (किंमती १५० ते २०० रुपयांपुढे)

पर्यावरणपूरक दिवे   
शेणापासून तयार केलेले हे दिवे एकदाच वापरता येतात. ते पर्यावरणपूरक असल्याने त्याला अधिक मागणी आहे. एकदाच त्याचा वापर करता येतो. संपूर्ण जळून गेल्यानंतर त्याचे राखेत रूपांतर होते. त्यानंतर भांडी घासण्यासाठी किंवा कुंडीत खत म्हणूनही त्याचा वापर होतो. 
अशी केली बाजारपेठ विकसित : पुण्यातील एका मित्राने शेणापासून पणत्या, दिवे व अन्य  उत्पादनांना मागणी असल्याचे सांगत तुम्ही तयार करून देणार का  असे विचारसे. इथेच अशी उत्पादने तयार करण्याला चालना मिळाली. आज नातेवाईक, परिचित, व्हॉटस ॲप ग्रुप यांच्या माध्यमातून उत्पादनांचे ‘प्रमोशन’ होते. अनेकवेळा पुरेशा मनुष्यबळाअभावी मागणीची पूर्तता करणे शक्‍य होत नसल्याचे यामिनीताई सांगतात. गणपती, नवरात्री तसेच दिवाळीच्या काळात उत्पादनांना मागणी अधिक राहते असेही त्या म्हणाल्या. 

गोसंगोपन 
  सध्या मोर्शी येथे सुमारे ३० गायींचे संगोपन. बहुतांश गीर, दोन राठी, एक लाल कंधारी   नागपूर येथील घरात गोकुटी उभारली आहे. या ठिकाणी साहिवाल गाय आणि वासराचे संवर्धन होते.    विरली (जि. नागपूर) येथे सहा ते सात गायी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com