दगडखाण कामगार बनला फौजदार

दगडखाण कामगार बनला फौजदार

सोमेश्वरनगर - हॉटेलात कपबशा विसळत असताना आणि दगडखाणीत दगड फोडत असतानाही त्याने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. कन्नडवस्तीसारख्या दुर्लक्षित आणि वंचित वस्तीत राहत होता आणि दिव्यावर अभ्यास करत होता, तरीही खचला नाही. हाताशी पैसा नसल्याने त्याने सरकारी कोट्यातील जागा पटकावत आधी अभियांत्रिकीची पदवी मिळविली आणि आता तर तो फौजदार बनला आहे.

वाघळवाडी ग्रामपंचायतअंतर्गत कन्नडवस्ती (ता. बारामती) येथील दत्तात्रेय मुकेश अलगूर याच्या जिद्दीची ही गोष्ट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने कुठल्याही क्‍लासशिवाय पहिल्याच प्रयत्नात ३४० पैकी २२० गुण मिळवत पोलिस फौजदारपदाला गवसणी घातली आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून तो राज्यात सविसावा आला आहे. त्याच्या या यशाने कन्नडवस्तीत जणू जल्लोष होत आहे.

मुकेश व विजाबाई अलगूर या दांपत्याला चार मुले. मुकेश नामदेव शिंगटे यांच्या दगडखाणीवर काम करत आणि विजाबाई दररोज शेतात मजुरीस जात. चौघांना शिकवू शकत नसल्याने थोरल्या अनुसयाचे सातवीनंतर लग्न झाले. सचिन बारावीनंतर गवंडीकाम करत आहे. लक्ष्मी आणि दत्तात्रेय मात्र वाणेवाडीतील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत चमकत राहिले. लक्ष्मी सुट्यांमध्ये खुरपायला जात होती आणि दर शनिवार-रविवार दत्तात्रेय वडिलांसोबत दगड फोडण्यासाठी जात होता. उन्हाळी-दिवाळी सुटीत सोमेश्वर कारखान्यावरील हॉटेलमध्ये राबत होता. सातवीपासून दहावीपर्यंत त्याने ही कामे केली. दहावीत ८५.५३ टक्के गुण मिळाल्यामुळे पुण्यात शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात प्रवेश मिळाला. मेकॅनिकल डिप्लोमात ७६ टक्के गुण मिळाल्याने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला. राहणे, खाणे व शालेय खर्चासाठी आईवडील वर्षभर एकही सुटी न घेता आणि दहा रुपयेही वायफळ खर्च न करता राबत होते. दरम्यान, लक्ष्मी मुंबई पोलिस सेवेत भरती झाली. दत्तात्रेयनेही मग ७१ टक्के गुण मिळवून कष्टाचे चीज केले. अनेकांकडे खेटे घालूनही नोकरी न मिळाल्याने त्याने पुणे विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. विद्यापीठात मित्राकडे पॅरासाइट बनून एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. प्रा. पोपट माने यांनी त्याला मार्गदर्शन केले. प्रशांत कोळपे याने मैदानात तर पंकज लोखंडे याने अभ्यासात मदत केली. 

आईवडील दहा रुपयेही विचारपूर्वक खर्चून आम्हाला शिकवायचे. डेंगी झाला तरी वडिलांनी सुटी घेतली नव्हती. वस्तीचेही नाव व्हावे हा विचार होता. आता मागास घटकासाठी शक्‍य तितके काम करणार. 
- दत्तात्रेय अलगूर 

अभ्यासाला चौघांना चार दिवे होते. चप्पलसुद्धा नव्हती. आता पोरगं साहेब झालं. जीव मोठा झाला.
- विजाबाई अलगूर, आई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com