मूकबधिर मुलं बनली कुटुंबाची आधारस्तंभ

हेमंत पवार
शनिवार, 25 मार्च 2017

डॉ. द. शि. एरम विद्यालयाने ३३ वर्षांत तब्बल १६६ मुले आणली प्रवाहात 

डॉ. द. शि. एरम विद्यालयाने ३३ वर्षांत तब्बल १६६ मुले आणली प्रवाहात 

कऱ्हाड - ज्यांच्या घरात येण्यानेच निराशा पसरते, कालांतराने ती मोठी झाल्यावर कुटुंबाला ज्यांचा बोज वाटू लागतो, अन्य मुलांकडून ज्यांना सातत्याने हिणवले जाते, ज्यांना सांगायची भरपूर इच्छा, ऊर्मी असतानाही वाचा नसल्याने बोलता येत नाही, अशा लेकरांचा सांभाळ करण्याचे काम गेली ३३ वर्षे येथील डॉ. द. शि. एरम अपंग साह्य संस्थेचे मूकबधिर विद्यालय करत आहे. विद्यालयाच्या माध्यमातून १६६ मुला- मुलींत संवेदना जाग्या करून त्यांना जग काय असते, याची जाणीव करून देवून समाजाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठीचे धाडस निर्माण करण्याचे मोठे काम आजपर्यंत झाले आहे.    

(कै.) डॉ. द. शि. एरम यांनी १९८४ मध्ये मूकबधिर विद्यालय सुरू केले. केवळ १६ विद्यार्थ्यांवर सुरू झालेली ही शाळा आज तब्बल ३३ वर्षे यशस्वीपणे सुरू राहू शकते हे संस्थाचालक, मार्गदर्शक आणि शिक्षकांनी दाखवून दिले आहे. ज्यांना जन्म झाल्यापासून आईसुद्धा म्हणता येत नाही, ज्यांना कानाने ऐकूही येत नाही, अशा मुला-मुलींचा सांभाळ आणि त्यांना शिक्षित करण्याचे काम या विद्यालयात केले जाते. त्यासाठी विशेष शिक्षकांची तेथे नेमणूक करण्यात आली आहे. कऱ्हाड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, संस्थेचे माजी अध्यक्ष आणि अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, संस्थेच्या अध्यक्षा रश्‍मी एरम, उपाध्यक्ष मोहन माळी, कोषाध्यक्ष चिन्मय एरम, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, संस्थेचे सचिव माधव माने यांच्यासह संचालक, शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी मोठा हातभार लावला. विद्यालयातून १६६ विद्यार्थी दहावीपर्यंतचे शिक्षण घेवून बाहेर पडले आहेत. त्यांना शाळेत अभ्यासाबरोबरच भरतकाम, विणकाम, शिवणकाम, घडीकाम, स्क्रीन प्रिटिंग, चित्रकलाही शिकवली जाते. मुलांवर शाळेत करण्यात आलेल्या चांगल्या संस्कारामुळे ती मुले समाजात सामान्य मुलांपेक्षाही चांगल्या पध्दतीने वागतात. त्याचबरोबर संबंधितांपैकी अनेक मुलांना नोकरी लागल्यामुळे त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचेही मोठे काम या संस्थेच्या माध्यमातून झाल्याने अनेक कुटुंबांना बोजा वाटणारी मुले आता त्या कुटुंबाची खऱ्या अर्थाने आधारस्तंभ बनली आहेत.  

शिक्षणाची पद्धत वेगळी 
मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलता येत नाही. यातील अनेकांना कानाने ऐकताही येत नाही. त्यामुळे त्यांना शिकवणे, समोरची व्यक्ती काय बोलते याचे ज्ञान त्यांना देणे अशा अवघड कामाचे शिवधनुष्य विद्यालयातील शिक्षकांनी पेलले आहे. त्यांच्यासाठी ‘इंडक्‍शन लुप सिस्टिमद्वारे ग्रुप हिअरिंग सिस्टिम’ सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्पीच थेरपीही दिली जाते. त्यामुळे त्यांना समोरची व्यक्ती काय बोलते, हे समजताना कोणत्याही अडचणी येत नाहीत.

मूकबधिर मुला-मुलींच्या जीवनाला नवे पंख देण्याचे काम डॉ. द. शि. एरम अपंग साह्य संस्थेच्या मूकबधिर विद्यालयात केले जाते. त्यासाठी संस्थाचालक, अर्बन ग्रुप, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभते.
- वृषाली घोरपडे, प्राचार्या, मूकबधिर विद्यालय 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deaf children become the backbone of the family

टॅग्स