देवगावच्या कारभारणी सक्षमपणे पेलताहेत गावचा कारभार

दत्ता देशमुख
गुरुवार, 13 जुलै 2017

‘स्वच्छता नांदे जिथे लक्ष्मी वसे तिथे’ या प्रचलित म्हणीचा प्रत्यय देवगाव (ता. वडवणी, जि. बीड) येथे गेल्यानंतर येतो. गावाच्या नावासारखीच मंडळी गावात राहतात. महिला ग्रामपंचायतीच्या कारभारी असलेल्या या देवगावात विविध विकास कामांत अन्य महिलांचाही सक्रिय पुढाकार असतो.ग्रामस्थही हिरीरिने त्यात भाग घेतात. त्यातून विविध पुरस्कारांवर गावाने मोहर उमटवली आहे. मान्यवरांनीही पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.  

सुमारे तेराशे लोकसंख्या असलेल्या देवगावचे शिवार (ता. वडवणी, जि. बीड) हलक्या, मध्यम आणि उच्च अशा विविध प्रतिचे आहे. बाजूला तलावही असल्याने सिंचनाची बऱ्यापैकी सोय आहे. मात्र, देवगावला एकेकाळी जणू कसली नजर लागली. गावातील काही जण व्यसनात बुडून गेले. संसाराची घडी विस्कटण्याएवढी परिस्थिती काहीवेळा महिलांवर आली. चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत (ग्रामपंचायत) गावची सूत्रे महिलांच्या हाती आली. सात सदस्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये चार महिला आणि तीन पुरुष आहेत. यामध्ये सरपंचपदी कैवल्या रघुनाथ सुरवसे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांनी गावगाडा हाकताना प्रत्येक बाबतीत महिलांना सोबतीला घेतले आणि हळूहळू गावचे चित्र पालटू लागले. आता नावाप्रमाणे गावाला आकार येऊ लागला आहे. गावात सर्वच राजकीय पक्षांचे समर्थक आणि पुढारी आहेत. मात्र गावच्या विकासात आणि एकतेत सर्वांचा एकच सूर असतो. श्रमदान असो वा लोकवर्गणी सर्वजण एकत्र असतात.  

व्यसनाधीन झालेल्यांनी  धरला शेतीचा रस्ता 
गावातील काही कर्त्या पुरुषांसह काही युवक विविध व्यसनांच्या आहारी गेले होते. मात्र आता परिस्थिती पालटू लागली आहे. दोन वर्षांपूर्वी युवकांनी पुढाकार घेऊन व्यसनमुक्तीची शपथ घेतली. आजतागायत ती शपथ कोणी मोडलेली नाही. युवकांना शेतीची ओढ लागली आहे. त्यांनी गटशेती सुरू केली आहे. त्यातून शेतीसाहित्यांची एकत्रित खरेदी केल्याने पैशांची बचत होत आहे. शेतीत अाधुनिक प्रयोग सुरू झाले आहेत. बँक ऑफ इंडियाच्या अर्थसहाय्याने अख्ख्या शिवारात ठिबक सिंचन अवतरले. त्यामळे पाण्याची बचत होत  आहे. 

पुरस्कारांवर मोहोर
गावाला मागील चार वर्षांत २०१२ - १३ या वर्षी निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला. तर २०१२ पासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारात गाव चार वर्षांत वडवणी तालुक्यात प्रथम आहे. तर याच पुरस्कारात जिल्हा स्तरावर २०१३- १४ मध्ये जिल्ह्यात प्रथम, २०१४ - १५ मध्ये द्वितीय तर २०१५- १६ मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. 

मान्यवरांची पाठीवर थाप 
देवगावात शिक्षक वगळता सरकारी अधिकारी, प्रतिनिधी आदी कोणी फारसे फिरकत नसत. मात्र स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, आदर्श गाव अशा उपक्रमांत चांगली आघाडी घेतल्यानंतर आता गावाची पाहणी करण्यासाठी आणि कौतुकाची थाप मारण्यासाठी मान्यवरांचा राबता सुरू झाला आहे. शासनाच्या आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनीही गावाला भेट देऊन कौतुक केले. यासह मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, तत्कालीन उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) मधुकर वासनिक, तत्कालीन तहसीलदार राजाभाऊ कदम यासह विविध बँकांचे अधिकारीही गावात आले. 

अख्ख्या गावचे जनधन खाते
केंद्र सरकारच्या जनधन योजनेत सक्रिय सहभाग नोंदवत गावातील सर्वच शेतकरी, युवक, महिलांचे या योजनेद्वारे खाते उघडण्यात आले आहे. यासाठी बँक ऑफ इंडियाने गावात मोहीम राबवली.

कचऱ्याचे व्यवस्थापन 
गावातील मुख्य रस्त्यांवर कचरा कुंड्या बनवल्या आहेत. ओला आणि सुका अशी कचऱ्याची वर्गवारी करून कुंड्या वेगवेगळ्या ठेवल्या आहेत. गावच्या विकासासाठी सुरवातीला श्रमदानातून गावांतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. गावकऱ्यांचा सहभाग पाहून शासनानेही या ठिकाणी अंगणवाडी, शाळा खोल्या, नाली, रस्ते, ग्रामपंचायत इमारत आदींसाठी निधी दिला. त्यामुळे गावचे रूपडेच पालटले आहे. गावासाठी सिमेंट रस्ते नसले तरी गावकऱ्यांनी पुनर्वसन योजनेतून मातीचे चांगले रस्ते तयार केले आहेत. 

वृक्षगणना आणि वर्गीकरण 
जिल्ह्यातील माजलगाव येथील कै. सुंदरराव सोळंके महाविद्यालय आणि वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांच्या पुढाकारातून मागील वर्षी वृक्षगणना आणि वृक्षांचे वर्गीकरण करण्यात आले. सावलीचे झाड, फळांचे झाड, शोभेची व फुलांची झाडे अशी ही वर्गवारी होती. प्रत्येक झाडाच्या बुंध्यावर संकेतांक लिहिला आहे. 

स्वच्छतेतून जपला समृद्धीचा वसा
कचऱ्याचे वर्गीकरण
आठवड्यातून दोनदा गावाची स्वच्छता
विविध पुरस्कारांवर कोरले नाव
व्यसनमुक्तीमुळे गावाचा होतोय कायापालट

महिलांचा पुढाकार
विद्यमान सरपंचांसह ग्रामपंचायतीत चार महिला सदस्या आहेत. आपल्या हक्कांची जाणी व्हावी, कर्तव्ये कळावीत आणि आपला हक्क बजवावा याबाबत महिलांमध्ये चांगली जाणीव तयार झाली आहे. महिलांच्या नियमित ग्रामसभा होताहेत. इतर कार्यक्रमांनाही त्यांची चांगली उपस्थिती असते. या महिलांना ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानननेही बळ दिले.

स्वच्छता, पाणंदमुक्ती 
चार वर्षांपूर्वी गावातील युवकांनी एकत्र येऊन राळेगण सिद्धी (ता. पारनेर, जि. अहमदनगर) व हिवरेबाजार (ता. जि. अहमदनगर) या गावांची पाहणी केली. तेथील योजनांची माहिती घेतली आणि आपले गाव याच पद्धतीचे सुधारायचे असा चंग बांधला. यात शिक्षकांनीही सहभाग घेतला. नियमित स्वच्छता आणि पाणंदमुक्तीचा निर्धार केला. सुमारे महिनाभरात गाव पाणंदमुक्त झाले. स्वच्छतागृहांचा नियमित वापर व्हायला तीन महिने लागले. मागील चार वर्षांपासून नित्याने प्रत्येक रविवार आणि गुरुवारी महिला आणि गावकरी एकत्र येतात. हातात झाडू घेऊन गावातील संपूर्ण रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करतात. गावातील प्रत्येक घरात स्वच्छतागृह असून त्याचा वापरही सुरू आहे. यासाठी शासनाने अनुदानही दिले आहे. 

विकासकामांच्या बाबतीत गावाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. नियमित स्वच्छता, सर्व कामांसाठी सर्वांचा पुढाकार, व्यसनमुक्ती, पाणंदमुक्तीमध्ये गाव अव्वल आहे. लोकवर्गणीत सर्वांचा हात सैल असतो. शासन म्हणून आमच्याकडूनही गावच्या विकासाठी प्रयत्न होत आहेत.  
- नामदेव ननावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड
 

शाळाच आमचे मंदिर
ग्रामीण भागात विजयादशमीला (दसरा) आपल्या घराला रंगरंगोटी करण्याची पूर्वापार परंपरा आहे. मात्र गावकऱ्यांनी शाळा जणू आपले घर आणि मंदिर समजले. दीड लाख रुपयांची लोकवर्गणी जमा करून शाळेला पूर्ण रंगरंगोटी केली. बाकडी, ई लर्निंग आदी सुविधा बाहेरून आलेल्या व्यक्तींचे लक्ष वेधून घेते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devgaon village women