# WednesdayMotivation : नेपाळच्या देवधरासाठी देवकर कुटुंब बनले देवदूत

दिलीप कुऱ्हाडे
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

डॉक्‍टरांकडून देवकर कुंटुबीयांचे कौतुक
प्रसूतीनंतर देवधरा यांना राजीव गांधी रुग्णालयात दाखल केले. वैशाली देवकर यांनी पुर्वी नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले होते. यामुळे त्यांना देवधरा यांची प्रस्ूती सुरक्षित करण्यात यश आले. दरम्यान देवकर कुंटुबीयांच्या प्रसंगावधानाचे डॉक्‍टर व परिचारिकांनी कौतुक केले.

येरवडा - नगर रस्त्यावरील एका सोसायटीतील सुरक्षारक्षकाच्या लहानशा खोलीत नेपाळच्या ‘देवधरा’ला प्रसूतिकळा सुरू झाल्या. बाळ पायाळू असल्यामुळे बाळ व मातेच्या जिवाला धोका निर्माण झाला. वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्यामुळे वैशाली देवकर यांनी मोठ्या धैर्याने ‘देवधरा’ यांची प्रसूती करून बाळ व मातेला वाचविले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हर्म्स टुविन्स सोसायटीतील सुरक्षारक्षक ललित बिस्ता यांची मेहुणी देवधरा व त्यांचे पती निराजन त्यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते. देवधरा गरोदर असल्यामुळे त्यांनी राजीव गांधी रुग्णालयात तपासणी केली. तेव्हा त्यांना बाळ पायाळू असून, त्याच्या गळ्याभोवती नाळ असल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्याची सूचनासुद्धा केली होती. मात्र, देवधरा व त्यांचे पती घाबरून ससूनमध्ये गेलेच नाहीत. त्यामुळे सोमवारी (ता. ३) रात्री पावणेदहाच्या सुमारास त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्या.

देवधरा यांच्यासोबत त्यांची बहीण सरस्वतीही होत्या. मात्र, बाळ पायाळू असल्यामुळे प्रसूती अर्धवट झाल्यामुळे त्या घाबरल्या. ललित यांनी सोसायटीतील राजू देवकर यांना घडलेला प्रसंग सांगितला. त्या वेळी देवकर यांची पत्नी वैशाली यांनी देवधराकडे धाव घेतली. वैशाली यांनी मोठ्या प्रयत्नाने देवधरा यांची प्रसूती केली. पण, बाळ निपचित पडल्यामुळे त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी बाळाची नाळ कापून त्याला उलटे धरल्यानंतर त्याने हंबरडा फोडला. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devkar becomes an angel for the goddess of Nepal motivation humanity