त्या करतात मालवाहू कंटेनरचा कायाकल्प

त्या करतात मालवाहू कंटेनरचा कायाकल्प

त्यांनी मजबूत, कलात्मक घरे झटपट उभारलेली पाहिली, की थक्क व्हायला होते. घर, कार्यालय, वाचनालय आदींसाठी लागणाऱ्या वास्तूरचना त्या मालवाहू कंटेनरमधून घडवतात. यावर विश्वासच बसत नाही. आपल्याला रस्त्यावरून अवजड वाहनांवर दिसतात, तेच मालवाहू कंटेनर वापरण्याजोगे राहिले नाही, की भंगारात टाकतात. धारा काबरिया व सोनाली फडके या तरुणी चक्क हाच चौकटीबाहेरचा व्यवसाय करतात. त्यांनी कायाकल्प करून घडवलेल्या अशा खोल्यांमध्ये आज काही ठिकाणी स्वच्छतागृह, बसचालकांसाठी वेटिंगरूम, वर्ग तसेच फिरते यंत्रप्रात्यक्षिक केंद्रही बघायला मिळते. जमिनीची नासधूस न करता, कमी वेळ व खर्चात तयार होणारी ही घरे दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येतात. त्यामुळे काही दिवसांपुरत्याच भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवरचे अख्खे घर उचलून हवे, तेव्हा दुसऱ्या ठिकाणी नेण्याची स्वप्नवत वाटणारी गोष्ट खरी करता येते. 

धारा ही मुळात इंटिरिअर डिझायनर आहे. "आल्टरनेटिव्ह यूज ऑफ मटेरिअल इन डिझाइन' या विषयात तिने यूकेमधून मास्टर्स डिग्री घेतलेली आहे. ती फोटोग्राफर बहिणीसह (डॉली) दोन वर्षे पुण्यातल्या औंध भागातल्या तिच्या स्टुडिओत, वाया गेलेल्या वस्तूंना पार बदलून टाकत होती. नंतर चार वर्षे बालेवाडीत तिने स्टुडिओ नेला. ते बघायला गेलेली सोनाली त्या कामाच्या आत्यंतिक प्रेमात पडली. धाराने केलेले कंटेनरचे रूपांतर पाहून सोनालीने हे काम वाढवायचा आग्रह धरला. इलेक्‍ट्रॉनिक इंजिनिअर असलेल्या सोनालीला धाराने या कामात ओढले . मग दोघी मिळून या उद्योगाचा विस्तार करू लागल्या. बघता बघता स्टाफ वाढत आठ जण पूर्ण वेळ व चार जण अर्धवेळासाठी मिळून जणू एक कुटुंबच तयार झाले. 

पुण्यातून कात्रजचा बोगदा ओलांडून आपण बाहेर पडलो, की मुंबई-बेंगळुरू हमरस्त्यावरील वेळू फाट्याजवळ सर्व्हे नंबर 627 हा या दोघींच्या 
"स्टुडिओ ऑल्टरनेटिव्हज' चा पत्ता. ही अर्धा एकर जागा त्यांनी पाच वर्षांसाठी भाडेकरारावर घेतली आहे. सध्या इथे एकावर एक ठेवलेल्या कंटेनरमधून साकारलेले दुमजली घर दिसते. त्यात स्वयंपाकाचा ओटा, बैठकीतील जागा, न्हाणी व स्वच्छतागृह आहे. वर जाण्यासाठी छोटासा जिना. खरे तर अशी रचना सुरवातीला धाराने कंटेनरच्या पुनर्वापरातून स्वत:पुरती केली होती; पण ध्यानीमनी नसताना त्याला मागणी येत गेली. 

आता या दोघींनी कचऱ्यातून नवे काही घडवू पाहणाऱ्यांसाठी स्क्रॅब लायब्ररी सुरू केली आहे. इच्छुकांना पूर्वनियोजित वेळेनुसार इथे काम करता येईल. अनघा देशपांडे- चांदवडकरनं फळांच्या बियांपासून तयार केलेले दागिनेही इथे आहेत. वाया गेलेल्या पीव्हीसी पाइपपासून तयार केलेल्या लॅम्प शेडस्‌, जुन्या वस्तूंपासून नवे फर्निचर, काचेच्या बाटल्या वापरून केलेले कलात्मक पार्टिशन, प्लॅस्टिक बाटल्यांपासून केलेल्या निरनिराळ्या वस्तूंचेही भांडार आहे. हे सारे इथं पाहणाऱ्याने तसं काही स्वत: घडवावे, कचऱ्यापासून मुक्तीचे उपाय योजावेत, ही धारा आणि सोनालीची प्रबळ इच्छाच त्यांनी कृतीतून साकार केली आहे. कामं बोलते ते असे!.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com