युवकांना प्रेरणा देणारी 'गौतम'ची वाटचाल...!

दगाजी देवरे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

प्रत्येक तरुणाला आयुष्यात यशस्वी होण्याची आकांक्षा असते. त्यासाठी ते शिक्षण घेत नोकरीची संधी शोधत असतात. सर्वच यशस्वी होतातच असे नाही. काही तरुण स्वतःच्या हुशारीने, मेहनतीने स्वतःचा व्यवसाय शोधून वेगळी वाट शोधून इतरांसमोर प्रेरणा उभी करतात.

धुळे : येथील एका बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या तरुणाने दुचाकी (मोटार सायकल) दुरुस्तीच्या कामातून स्वत:सह इतर तीन तरुणांना शिकता-शिकता व्यवसायीची वाट दाखवली आहे. शिकून नोकरी न मिळणा-या तरुणांनी नक्कीच बोध घेण्यासारखे आहे. त्या तरुणाविषयी...

अवघ्या दीड महिन्यात शिकला काम. . . . ?
कामात राम आहे असे म्हटले जाते. काम ते कोणतेही असो करण्याची तयारी असावी. येथील तरुण गौतम रामराव ह्याळीस याने साक्रीत दुचाकी-मोटरसायकल दुरुस्तीचे दुकान थाटले आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने बारावीनंतर पुढील शिक्षण इच्छा असूनही घेणे अवघड होते. वडील टेलर काम करत प्रपंचाचा गाडा हाकत होते. घरात कमावणारे एकमेव म्हणजे वडील. मोठा भाऊ आणि बहीण असतानाही गौतमची काहीतरी वेगळे करण्याची जिद्द होती. अवघ्या एक एकर कोरडवाहू शेतीत काहीच करता येणार नाही. हे ओळखून गौतमने दुचाकी वा अन्य वाहने दुरुस्त करणे शिकावे अशी इच्छा टेलर काम करणारे वडील रामराव झिपरू ह्याळीस यांच्याकडे व्यक्त केली. मुलगा कोणतेही काम सहज करेल किंवा परिस्थिती पुढे हतबल वडीलांनी होकार दिला. आत्याच्या गावी म्हणजे कासोदा (जि. जळगाव) येथे गौतमने विजय दोधू वाघ उर्फ जिभा या कारागीराकडे दीड वर्षे थांबून दुरुस्तीचे काम शिकला. तथापि उपजत कला अवगत असली तर वायू वेगाने कामात यश मिळते. त्यानंतर सलग चार वर्षे दुचाकीच्या शोरूमवर दुरुस्ती कामाचा अनुभव घेतला. 2009 पासून साक्रीत स्वत:चे दुकान सुरू करत कुटुंबाला पाठबळ दिले आहे.

यामाहा कंपनीकडून घेतले प्रशिक्षण
यामाहा कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात गौतमने सुमारे दीड महिने दुचाकी दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले आहे. कंपनीने दुकान लावण्याचे प्रशिस्त पत्र देण्यात आले. यात केवळ यामाहा कंपनीच्या प्रशिक्षणात केवळ यामाहा दुचाकी दुरुस्ती करण्याचे तंत्रज्ञान मिळाले असले तरी इतर दुचाकी दुरुस्त करण्यासाठी केवळ अनुभव आणि जिद्द कामी येत असल्याचे गौतम ह्याळीसने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. अलीकडे तरुणांना शिकून नोकरी न लागल्यामुळे नैराश्याचे जीवन जगावे लागते. परंतु तरुणांनी जे काम शक्य ते करावे. कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न केले तर यश हमखास येतो असा विश्वास तो व्यक्त करतो.

साई भक्ती
काम कोणतेही असो करण्याची चागंली मानसिकता असली तर जाहीरात वा प्रसिद्धी करण्याची आवश्यकता नसल्याचे त्याचे मत आहे. गौतमची साईबांबावर मोठी श्रद्धा आहे. म्हणूनच त्याने दुकानाचे नाव 'साईश्रध्दा 'असे ठेवले आहे. साईबांबाप्रमाणेच वडिलांना तो श्रध्दास्थान मानतो. तरुण पिढी बिघडत आहे असे म्हटले जात असले तरी तरुणांमुळे अनेकांची घरे सावरल्याची उदाहरणे आहेत. दुचाकी दुरुस्त करणारा हा फिटर दुचाकीवरच साक्रीला जात आपल्या व्यवसायासाठी धडपड करत होता. याच व्यवसायातून कुटुंबाला सावरत त्याने सहा महिन्यांपूर्वी चारचाकी वाहन घेतले. आई-वडिलांना त्याचा सार्थ अभिमान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhule news gautam hyalis inspiring success story